डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १ ते ४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ (अनेक देवता सूक्त)
ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – १ ते ४ अश्विनीकुमार; ५ ते ८ सवितृ;
९ ते १० अग्नि; ११ – देवी; १२ – इंद्राणी; १३, १४ द्यावापृथिवी;
१६ ते २१ विष्णु; : छंद – गायत्री
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बावीसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या चार ऋचा अश्विनीकुमारांचे, पाच ते आठ या ऋचा सवितृ देवतेचे, नऊ आणि दहा ऋचा अग्नीचे आवाहन करतात. अकरावी ऋचा देवीचे, बारावी ऋचा इंद्राणीचे तर तेरा आणि चौदा या ऋचा द्यावापृथिवीचे आवाहन करतात. कण्व ऋषींनी या सूक्तातील सोळा ते एकवीस या ऋचा विष्णू देवतेच्या आवाहनासाठी रचलेल्या आहेत.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अश्विनीकुमारांना उद्देशून रचलेल्या पहिल्या चार ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद
प्रा॒त॒र्युजा॒ वि बो॑धया॒श्विना॒वेह ग॑च्छताम् । अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑ ॥ १ ॥
प्रातःकाळी शकट जोडुनी सिद्ध होत अश्विन
जागृत करि निद्रेतुनिया त्यांच्या जवळी जाउन
झणी घेउनी यावे त्यांना अमुच्या यज्ञाला
आम्हा हो ते प्राप्त कराया अर्पण सोमरसाला ||१||
या सु॒रथा॑ र॒थीत॑मो॒भा दे॒वा दि॑वि॒स्पृशा॑ । अ॒श्विना॒ ता ह॑वामहे ॥ २ ॥
महारथी ते चंडप्रतापी अजिंक्य असती रणी
दिव्य रथावर आरुढ होती सहजी रणांगणी
द्युलोकाप्रत जाऊन भिडती कुमार ते अश्विनी
उभय देवतांनो झणी यावे हो अमुच्या या यज्ञी ||२||
या वां॒ कशा॒ मधु॑म॒त्यश्वि॑ना सू॒नृता॑वती । तया॑ य॒ज्ञं मि॑मिक्षतम् ॥ ३ ॥
ऐकुनिया रव अश्विनांच्या शकट प्रतोदाचा
सोमरसाला सिद्ध करूनी तुमच्या स्वागताला
आशा जागृत होइल सत्य तत्वांचा लाभ
तुम्हा कृपेने वाहुदेत सुखसमृद्धीचे ओघ ||३||
न॒हि वा॒मस्ति॑ दूर॒के यत्रा॒ रथे॑न॒ गच्छ॑थः । अश्वि॑ना सो॒मिनो॑ गृ॒हम् ॥ ४ ॥
आरूढ होउनि रथावरती तुम्ही अश्विन देवा
त्वरित धावता ज्या भक्ताने केला तुमचा धावा
भक्ताचा त्या निवास आहे जवळी सन्निध
ज्याने तुमच्यासाठी केले सोमरसाला सिद्ध ||४||
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. )
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 1 to 4
Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 1 to 4
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈