श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “शेक्सपिअरचं स्ट्रॅटफोर्ड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆
प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते हेच खरं ! २०१४ ते २०१९ या पाच वर्षात आमची चार वेळा इंग्लंड भेट झाली; पण शेक्सपिअरच्या गावाला भेट द्यायचा योग आला तो २०१९ सालीच ! प्रत्येक भेटीत माझ्या मुलाला, आशिषला स्ट्रॅटफोर्ड अपऑन ॲव्हॉनला नेण्याविषयी सांगायचो; पण काही ना काही कारणानं जमत नव्हतं. मात्र, या वर्षी त्या दोघांनी तिथं जाण्याचा चंगच बांधला आणि योग आणलाच.
ॲव्हॉन नावाच्या नदीवरील स्ट्रॅटफोर्ड हे शेक्सपिअरचं जन्मगाव…साउथ वार्विक शायरमधील हे गाव. इथं ज्या इमारतीत शेक्सपिअरचा जन्म झाला त्या वाड्यावजा इमारतीत ‘शेक्सपिअर जन्मस्थान ट्रस्ट’ नं उत्तमरित्या त्यांच्या जन्माच्या वेळच्या गोष्टी जतन करून ठेवल्या आहेत. मुळात इंग्रज हा परंपरावादी, त्यामुळेच त्यांनी या जगप्रसिध्द नट, लेखक आणि थिएटर मॅनेजरची १६/१७ व्या शतकातली, त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं अनुभवलेली जीवनविषयक माहिती जतन करून, प्रदर्शनाव्दारे त्याची आजच्या पिढीला ओळख करून दिली आहे. या संग्रहालयाने शेक्सपिअर आणि त्यांच्या कुटुंबानं अनुभवलेल्या प्रसंगावंर टाकलेल्या प्रकाशामुळे, हा एक मोठा माणूस आणि लेखक, म्हणून आपणास जास्त समजू शकतो.
शेक्सपिअरच्या वयाच्या ३७ व्या वर्षी, म्हणजे १६०१ मध्ये ही जन्मस्थानची जागा त्याला वडिलांकडून मिळाली. मुळात शेक्सपिसरला राहायला भरपूर जागा असल्यानं त्यानं वडिलांकडून मिळालेल्या जागेतून काही पैसे कमवावेत असा विचार केला आणि त्यानं ती जागा एलिझाबेथ फोर्ट नावाच्या बाईला हॉटेलसाठी भाड्यानं दिली. एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर १८४६ मध्ये इमारत विक्रीला काढली गेली. तेव्हा ‘शेक्सपिअर जन्मस्थळ ट्रस्ट’ नं ती विकत घेऊन हे संग्रहालय उभं केलं. आजही त्या जन्मस्थळाची देखभाल ते करत आहेत. हे संग्रहालय उभं करण्यात आणि असे राष्ट्रीय स्मारकामध्ये अंतर्भूत करण्यासाठी जी चळवळ उभारली गेली, त्यात डिकन्सचा सहभाग महत्त्वाचा होता. त्यानं १८३८ मध्ये या जन्मस्थळास भेट दिली होती आणि त्यापासूनच त्याला स्फूर्ती मिळाली. शेक्सपिअरच्या जन्माच्या खोलीत एका खिडकीच्या काचेवर प्रेक्षक आपली आठवण म्हणून नावं लिहून ठेवत. त्यात प्रसिध्द स्कॉटिश लेखक वॉल्टर स्कोंट, तत्त्ववेत्ता थॉमसर कार्लाईल, चार्ल्स डिकन्स, शेक्सपिअरच्या काळातील दोन महान नट एलन टेटी आणि हेन्नी आयर्विंग यांचा समावेश आहे. या संग्रहालयातील वस्तूंवर म्हणजे कपडे, बिछाने आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरून शेक्सपिअरची माहिती मिळते.
शेक्सपिअर ३७ नाटके, १५४ सुनीते (sonnets), ५ पदविधारी काव्यं (titled) लिहू शकला आणि आपल्यासाठी अक्षरशः लाखो शब्दांमधून विचारांचा अमूर्त ठेवा ठेवून गेला. त्याची नाटकं शाळा, विद्यापीठे, नाट्यगृहे, बागा आणि तुरुंगातही सादर केली जातात. शेक्सपिअरचा हा अमूल्य साहित्यिक ठेवा जतन करण्याचं कार्य ट्रस्टनं केलं असलं, तरी इंग्लंडमधील एका दैनिकात आलेली बातमी वाचून मन विषण्ण होतं. ती बातमी म्हणते, की ‘ विद्यार्थ्यांसाठी शेक्सपिअर खूप कठीण आहे! ‘डिजिटल टेक्नॉलॉजी ॲडॉब’ ने २००० साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, २९ टक्के विद्यार्थ्यांना असं वाटतं, की शेक्सपिअरची नाटकं आधुनिक तंत्रात बसवली, तर ती चटकन समजतील. शेक्सपिअर चांगला समजायचा असेल, तर व्हिडिओ आणि ॲनिमेशनचा उपयोग करायला हवा असेही काहीजण म्हणतात.’ असो. मी मात्र माझं १९७० सालापासूनचं स्वप्नं पूर्ण झाल्यानं आनंदात होतो.
©️ श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈