सौ अंजली दिलीप गोखले
इंद्रधनुष्य
☆ श्रीपती (इ.स.१०१९ ते १०६६)… लेखिका – सुश्री लीना दामले(खगोलीना) ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆
श्रीपती (इ.स.१०१९ ते १०६६)
(प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिष जाणकार आणि गणिती.)
श्रीपती यांचा जन्म रोहिणीखंड या आताच्या महाराष्ट्रातील गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नागादेवा/ नामादेवा असे होते तर त्यांच्या आजोबांचे नाव केशव. ( जन्मदात्रीचे नाव माहीत नाही.)
श्रीपती यांनी श्री. लल्ला यांच्या शिकवणीनुसार अभ्यास केला. त्यांचा मुख्य भर ज्योतिषशास्त्रावर होता. त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास त्यांच्या ज्योतिषशास्त्रावरच्या संशोधनासाठी केला. आणि गणिताचा अभ्यास किंवा त्यातील संशोधन खगोलशास्त्रावरच्या त्यांच्या संशोधनाला पुष्टी देण्यासाठी केला. उदाहरणार्थ ग्रहगोलांचा अभ्यास.
श्रीपती यांनी ज्योतिषशास्त्रातील कुंडलीतील घरांच्या विभाजनाची पद्धत शोधून काढली, त्याला ‘ श्रीपती भव पद्धती’ म्हणतात.
श्रीपती यांची ग्रंथ संपदा :
धिकोटीडा- करणं
धिकोटीडा- करणं (१०३९) या ग्रंथात एकंदर २० श्लोक आहेत ज्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणा संबंधी माहिती आहे.
या ग्रंथावर रामकृष्ण भट्ट (१६१०) आणि दिनकर (१८२३) यांनी टीका ग्रंथ लिहिले आहेत.
ध्रुव- मानस
ध्रुव- मानस (१०५६) यात १०५ श्लोक असून त्यात ग्रहांचे अक्षांश, ग्रहणे आणि ग्रहांची अधीक्रमणे यावर भाष्य केले आहे.
सिद्धांत-शेखर
सिद्धांत-शेखर यात त्यांचं6अ खगोलशास्त्रा वरील महत्वाच्या कामाचा उहापोह १९ प्रकरणांमध्ये केला आहे. त्यातली काही महत्वाची प्रकरणे :
प्रकरण १३: Arithmetic (अंकगणित) यावर ५५ श्लोक आहेत.
प्रकरण १४: Algebra (बीजगणित)
यात बीजगणिताच्या अनेज नियमांची चर्चा केली आहे. पण त्यात सिद्धता किंवा प्रमाण असे दिलेले नाही आणि बीजगणिताची चिन्हे वापरलेली नाहीत.
ऋण आणि धन संख्यांची बेरीज ,वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. बद्दल माहिती आहे.
Quadratic समिकरणे सोडवण्याचे नियम इथे दिले आहेत.
प्रकरण १५: Sphere
Simultaneous indeterminate equations सोडवण्याचे नियम यात दिले आहेत. हे नियम ब्रह्मगुप्ताने दिलेल्या नियमामप्रमाणे आहेत.
गणित- तिलक
गणित- तिलक हा एक अपूर्ण असा ग्रंथ आहे. हा अंकगणितावरील १२५ श्लोकांचा प्रबंध आहे जो ‘श्रीधर’ यांच्या कामावर आधारित आहे. याच्या न सापडलेल्या भागात सिद्धांत शेखरच्या १३ व्या प्रकरणातील १९ ते ५५ श्लोकांपर्यंतचा भाग असावा.
ज्योतिष-रत्न-माला
ज्योतिष-रत्न-माला हा ज्योतिषशास्त्रावरचा २० प्रकरणे असलेला ग्रंथ असून लल्ला यांच्या ज्योतिष-रत्ना-कोषा वर आधारित आहे. श्रीपती यांनी या ग्रंथावर मराठीत टीका लिहिली आहे. मराठी भाषेतील हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे असे मानले जाते. या ग्रंथावर अनेकांचे टीका ग्रंथ आहेत.
जातक- पद्धती
जातक- पद्धती यालाच श्रीपती पद्धती असेही म्हटले जाते. हा एक ८ प्रकरणे असलेला ज्योतिषशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ असून त्यावर अनेक टीका ग्रंथ आहेत.
दैवज्ञ – वल्लभ
हा ग्रंथही ज्योतिषशास्त्रावर आहे, ज्यात शेवटाला वराहमिहिरांच्या ग्रंथातील उतारे आहेत. दैवज्ञ – वल्लभ याची हिंदी आवृत्ती श्री. नारायण यांनी लिहिली आहे.
कल्याण ऋषी यांच्या नावे असलेल्या ‘मानसगिरी किंवा जन्म-पत्रिका-पद्धती’ या ग्रंथात श्रीपती यांच्या ‘रत्नमाला’ ‘श्रीपती पद्धती’ या ग्रंथातील असंख्य उतारे आणि अवतरणे आलेली आहेत.
लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना).
संग्रहिका : अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈