इंद्रधनुष्य
☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
समर्थ रामदासजींनी दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी ग्रंथ रचले आहेत, तसेच शेकडो ‘अभंग’ही लिहिलेले आहेत. यासोबतच समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ९० पेक्षा अधिक आरत्या महाराष्ट्रातील घरा- घरात म्हटल्या जातात.
समर्थांचा गायनीकलेचा अभ्यास होता. ‘धन्य ते गायनी कला’ असे म्हणून समर्थांनी गायनीकलेचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत लयीचा गोडवा अनुभवता येतो. पारमार्थिक विचार असो, आत्मनिष्ठ, अभ्यासपूर्ण चिंतन असो, ते लयीत मांडण्याची खुबी रामदास स्वामींजवळ आहे. याचा प्रत्यय त्यांनी रचलेल्या आरत्यांतून घेता येतो.
गणपती उत्सवात रामदासांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या जातात. त्या आबालवृद्धांच्या तोंडी सहजपणे येतात. त्या आरत्यांची लोकप्रियताही वर्षानुवर्षे टिकून राहिली आहे. याला कारण म्हणजे त्या आरत्यांतील गेयता, चपखल शब्दरचना, लयबद्धता, शब्दांचे माधुर्य, आघात, भाषेतील ठसका..!
वीररसाने युक्त अश्या हनुमंताची ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’चा भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे.
आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.
हनुमंताच्या ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ या आरतीतील शब्दरचना मारुतीची प्रचंड शक्ती, अद्भुत कार्य नजरेसमोर उभे करतात. त्यातील शब्द हृदयावर आघात करीत आपले बल वाढवतात. समर्थ भाषाप्रभू होते. गेयता, लय, उचित शब्दयोजना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात.
हनुमंताचे कार्य जेवढे अफाट, तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतू , या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.
समर्थ रामदास रचित, म्हणायला अवघड परंतू आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ —-
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर, त्या झाल्या पळणी ।। १ ।।
(आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊ या. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.)
भावार्थ :-समर्थ रामदास वर्णन करतात- मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।
जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता,
तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।
(कठीण शब्दांचा अर्थ:- ‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.)
भावार्थ :- अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।
दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।
(कठीण शब्दांचा अर्थ – ‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला. ‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक. ‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.)
भावार्थ :– सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतू, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे ! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरलीस, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे.
— ‘दुमदुमले पाताळ’ किंवा ‘थरथरला धरणीधर’, ‘कडकडिले पर्वत’ या शब्दांतून वीररसाचा आविर्भाव होतो. हा वीरमारुती होय.
— ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈