? इंद्रधनुष्य ?

☆ “महानायक “… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

” राम ” आणि ” कृष्ण ” हे भारतीय इतिहासातील दोन अतुल्य महानायक आहेत. !! 

एकाने “अयोध्या ते रामेश्वर”, तर दुसऱ्याने “द्वारका ते आसाम” पर्यंतचा भूभाग आपल्या चरित्राद्वारे सांधत गेली हजारो वर्षे या भारतभूमीला संस्कारांच्या अनोख्या बंधनात बांधून ठेवले आहे.!

तसं पाहिलं तर दोघांच्या चरित्रात जन्मापासूनच किती विरोधाभास आहे. एकाचा जन्म रणरणत्या उन्हाळ्यात दुपारी, तर दुसऱ्याचा मुसळधार पावसाळ्यात मध्यरात्री !! 

एकाचा राजमहालात तर दुसऱ्याचा कारागृहात !!

साम्य म्हणावं तर दोघांच्याही हातून पहिले मारल्या गेल्या त्या राक्षसिणी….. त्राटिका आणि पुतना ! 

शबरीची बोरे आणि सुदाम्याचे पोहे त्यांच्या मनमिळाऊ मैत्रीपूर्ण स्वभावाचे उदाहरण म्हणून आजही सांगितले जातात. 

ज्यांच्यामुळे त्यांच्या चरित्राला वेगळे वळण लागले, त्या कैकेयी आणि गांधारी एकाच प्रांतातल्या…ह्या दोघी मातांच्या कटू शब्दांना वंद्य मानत त्यांनी स्वीकारले.!! 

एकाने सुग्रीवाला त्याचे राज्य मिळवून दिले, तर दुसऱ्याने युधिष्ठिराला !

एकाने लोकापवादाखातिर पत्नीचा त्याग केला, तर दुसऱ्याने लोकापवादाची चिंता न बाळगता सोळा सहस्त्र स्त्रियांचा स्वीकार केला.!! 

एकाने पुत्रधर्मासाठी कुटुंबीयांचा त्याग करत वनवास स्वीकारला, तर दुसऱ्याने क्षत्रिय धर्मासाठीच कुटुंबियांवर शस्त्र उगारण्यास देखील गैर मानले नाही.

एकाने जन्मभूमीला स्वर्गासम मानले, तर दुसऱ्याने कर्मभूमीला स्वर्ग बनवले.

एकाने अंगदाकरवी, तर दुसऱ्याने समक्ष शत्रूच्या दरबारी जात, शिष्टाई करत, युद्धहानी टाळण्याचा प्रयत्न अखेरपर्यंत केला.

एकाने समुद्र ओलांडून सोन्याची लंकापुरी नष्ट केली, तर दुसऱ्याने समुद्र ओलांडून सोन्याची द्वारकापुरी उभारली.

एकाने झाडामागून बाण मारल्या गेलेल्या वालीच्या मुखातून झालेली निंदा स्वीकारली, तर दुसऱ्याने झाडामागुन बाण मारणाऱ्या व्याधाच्या हातून मृत्यू पत्करला.

एक Theory…. तर…दुसरा Practical !! 

दोन प्रचंड विरोधाभास असलेल्या ह्या व्यक्तीरेखा गेली हजारो वर्षे नाना विविध प्रक्षिप्त कथांचा स्वीकार करत, आपल्या चरित्राच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता, ह्या देशापुढे दीपस्तंभ बनून उभे आहेत आणि इथून पुढे देखील राहील.!!

जय श्रीराम … जय श्रीकृष्ण !!

इदं न मम …… 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments