श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

?इंद्रधनुष्य? 

☆ डिग्निटी ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

चितळे काका म्हणजे आमच्या बिल्डिंगची शान होते. सत्तरीच्या आसपास वय… पण गडी अजूनही फुल्ल टू एनर्जेटीक होता. 

कलप लावून केलेले काळे केस… टिपिकल कोब्रा गोरा रंग, आणि पिढीजात घारे डोळे. 

रोज नेमाने योगा करुन मेंटेन्ड अशी सडपातळ, उंच शरिरयष्टी. आणि हसल्यावर आपल्या उजव्या गालावर कातिलाना खळी पडते हे जाणून असल्याने, प्रयत्नपुर्वक हसरा ठेवलेला चेहरा. 

घरात शाॅर्ट्स आणि मलमलचे शुभ्र कुर्ते… तर बाहेर म्हणजे अगदी थाटच… जिन्सची पँट, त्यावर लीवाईज्, यू.एस. पोलो, रोडस्टर पैकी कुठलासा ब्रँडेड टी-शर्ट, पायात रेड टेपचे शूज, डोळ्यांना रे-बॅनचा गाॅगल…

असे हे चितळे काका कोपर्‍यावरुन मिरच्या-कोथिंबीर आणायलाही, इतक्याच तामझामात बाहेर पडायचे… ते ही त्यांची पल्सर काढत. 

खरंच पण… त्यांना हे असं पल्सरवरुन कुठे जातांना पाहिलं की, आम्हा मुलांना वेस्टर्न मुव्हीजमध्ये घोडा दौडवत येणारा क्लिंट ईस्टवुडच आठवे. 

प्रकरण एकंदर रंगीन तर होतंच पण… विशेषतः आम्हा तरुण, बिन लग्नाच्या मुलांत उठ-बस करण्याची क्रेझ फार होती त्यांना. कदाचीत आमच्याकडून मिळणार्‍या वाईब्ज, हेच त्यांच्या सदैव चिरतरुण रहाण्याचं टाॅनिक असावं. 

पण एवढं असूनही चितळेकाका मुली वा बायकांबाबतीत प्रचंड सोवळे होते. कधीही कुठलीही वात्रट कमेंट वगैरे पास केली नव्हती त्यांनी. आणि त्यामुळेच कदाचित आम्ही मुलं-मुली, खूप कन्फर्टेबल होत असू काकांबरोबर…

तर अशा ह्या आमच्या सदाबहार चितळे काकांची अर्धांगीनी… म्हणजेच चितळे काकू. काकांच्या अगदीच विरुद्धार्थी व्यक्तिमत्व. पासष्टीच्या असाव्यात काकू. एकन् एक पिकलेला केस… त्या पिकल्या तरिही दाट अशा केसांचा, सैलसर बांधलेला शेपटा. 

त्या माहेरच्या गोगटे… त्यामुळे त्याही तुकतुकीत गोर्‍या नी घार्‍याही. कपाळावर चार आण्याच्या आकाराचं ठसठशीत कुंकू. घरी व बाहेर पण. अंगावर एक साधीशी काॅटनची साडी. 

फरक इतकाच की बाहेर असतांना पदर दोन्ही खांद्यांवरुन घट्ट गुंडाळून घेत, त्याचं टोक एका हाताने पकडलेलं. पायात साध्याशा चपला… आणि एका हातात कायम मोठाली पिशवी… जातांना रिकामी, तर येतांना टम्म फुगलेली. 

आम्ही मुलांनी काकूंना कधी, काकांच्या मागे बाईकवर बसलेलंही पाहिलं नव्हतं. काकू फार कोणांत मिसळतही नसत. अगदी तीन-चार त्यांच्याच वयाच्या आसपास असलेल्या, बिल्डिंगमधल्या बायका. त्यात एक माझी आई असल्याने, माझ्याशी येता जाता फक्त हसत… बस्स. 

एकूणच आम्हा मुलांचच काय पण बिल्डिंगमधल्या प्रत्येकाचंच हे मत होतं की, काकांना अगदीच म्हातारी बायको मिळाली. घरातून बाहेर पडलं की मठात, नी तिथून परत घरात… हे एवढंच विश्व होतं काकूंचं. 

पण हे असं अरसिक प्रकरण गळ्यात पडलं असूनही काकांना मात्र आम्ही कधीच काकूंबद्दल, एका शब्दानेही खंत व्यक्त करतांना पाहिलं नव्हतं. चार खोल्यांतून त्या दोघांचा संसार, नेटाने चालू होता. काका कायमच ‘जाॅली गुड फेलो’ वाटत आलेले आम्हाला. 

तर एकदा आमच्या सातव्या फ्लोअरवरच्या रेफ्युजी एरियात रात्रीची आम्हा मुलांची पार्टी चालू होती. बिल्डिंगमधल्याच एका मुलाची एंगेजमेंट ठरल्याची पार्टी होती ती. आम्ही जवळ जवळ वीसेक मुलं-मुली होतो… आणि होते अर्थातच एकमेव चितळे काका. 

पिझ्झा, पावभाजीचा बेत होता… साॅफ्ट ड्रिंक्स होती… आम्हा चार-पाच जणांसाठी, बिअरचा एक क्रेटही होता. थोडक्यात धमाल चाललेली… मजा, मस्ती चाललेली. 

किशोर कुमारची दोनेक गाणी ऐकवून, वाहवा मिळवून काका पावभाजीची प्लेट हातात घेऊन खुर्चीवर बसले होते. आणि… 

…आणि अचानक काका खाली कोसळले! छातीला हात लावत कळवळत होते ते. आम्हा मुलांचं अक्षरशः धाबं दणाणलं. कोणीतरी जाऊन चितळे काकूंना कळवलं. 

दोन्ही खांद्याभोवती पदर गुंडाळलेल्या काकू, गडबडीतच वर आल्या. एव्हाना चितळे काकांची हालचाल पूर्ण बंद झाली होती. आणि पुढे जे काही आम्ही मुलांनी पाहिलं, ते निव्वळ अविश्वसनीय होतं…

काकांच्या मानेखाली हात घालत त्यांना, काकूंनी सरळ रेषेत झोपवलं. खाली गुडघ्यांवर बसत त्यांनी दोन्ही हातांनी काकांच्या ब्रँडेड शर्टची बटणं अक्षरशः तोडली आणि स्वतःची बोटं ईंटरलाॅक्ड करत काकांना चेस्ट कम्प्रेशन द्यायला सुरुवात केली. 

तीस कम्प्रेशन्सचा एक सेट दिल्यावर, काकूंनी त्यांना रेस्क्यू ब्रिदिंग दिलं. पुढच्या तीसच्या सेटकडे त्या वळणार तोच… अचानक काका एक दिर्घ श्वास घेत, शुद्धीवर आले. 

काकूंनी पटकन उभं रहात, गुंडाळलेल्या पदराने तोंडावरचा घाम पुसला. माझ्याकडे बघून मला विचारलं… 

“गाडी काढशील?” 

मी आधीच बेदम घाबरलेलो… माझे पायच थरथरू लागले. काकूंनी माझी अवस्था ओळखत, माझ्याकडे गाडीची किल्ली मागितली. मी थरथरत्या हातांनी खिशातून काढत अवाक्षरही न बोलता ती काकूंसमोर धरली. 

काकूंनी खांद्याभोवती गुंडाळलेला पदर खाली घेत, कंबरेला खोचला. केसांचा सैलसर शेपटा सोडत केस दोन्ही हातांनी एकत्र आणत, घट्ट शेपटा बांधला. आणि बोलल्या एकदम आॕथिरीटीने… 

“Lets move…”

आम्ही पाच-सहा जणांनी काकांना उठवून धरत धरत लिफ्टमधून खाली नेत माझ्या गाडीत मागच्या सीटवर झोपवलं. एक मुलगा काकांचं डोक मांडीवर घेऊन मागे बसला. 

मी काकूंकडे पाहिलं… त्यांनी डोळ्यांनीच मला खूण केली ‘रिलॅक्स’ अशी… आणि डोळ्यांनीच सांगितलं “बाजूला बस.”

ड्रायव्हींग सीटवर स्वतः काकू बसल्या… अतिशय स्मुथली, लिलया गाडी चालवत त्या गाडी हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. वाटेत एका हाताने स्टेअरींग सांभाळत त्यांनी हाॅस्पिटलमध्ये फोन करत, स्ट्रेचर रेडी ठेवायला सांगितलं. त्यांच्या फॅमिली डाॅक्टरलाही फोन करत त्यांनी हाॅस्पिटलमध्ये बोलावून घेतलं…

गाडी पार्किंग लाॅटमध्ये पर्फेक्टली पार्क करत त्यांनी काकांना ताबडतोब अॕडमीट करवून घेतलं. आणि तातडीने त्यांच्यावर उपचारही सुरु करवले. 

सगळं मार्गी लागल्यावर काकू, लाॅबीमध्ये आम्ही दोघं बसलेलो तिथे आल्या. माझ्याकडे गाडीची चावी देत, माझ्या डोक्यावरुन त्यांनी हात फिरवला. आम्हा दोघांच्याही गालांना दोन्ही हातांनी टॅप करत, मंदशा हसल्या आमच्याकडे बघत नी म्हणाल्या… 

“Doctor said he is out of danger now… thank you so much for all your support… तुम्ही निघा आता… मी आहे इथे…” 

मघा कंबरेला खोचलेला पदर काढत, त्यांनी तो पुन्हा दोन्ही खांद्यांभोवती गुंडाळला. केसांचा चाप सोडत, ते पुन्हा सैलसर बांधले. आणि पाठ करुन आमच्याकडे, त्या चालू पडल्या काकांच्या रुमकडे. 

अगदी त्या क्षणी चितळे काकूंचं पिकलेपण… मला चितळे काकांच्या स्वतःला न पिकू देण्याच्या अट्टाहासासमोर, प्रचंड मोठं भासलं होतं. 

तारुण्य तर सगळेच गोंजारतात आपापलं, अगदी चितळे काकांसारखे म्हातारेही. पण असं एखादंच कोणी असतं चितळे काकूंसारखं… जे आपलं म्हातारपणही ‘डिग्निटी’ने मिरवू शकतं, कुठलाही उसना आव न आणता! 

काकू चालत चालत दिसेनाशा झाल्या… नी अचानक मला जाणवलं की, मी चितळे काकांना पहिल्यांदाच ‘म्हातारा’ म्हणालो होतो.

– अनामिक  

संग्राहक : श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments