सौ. यशश्री वि. तावसे
इंद्रधनुष्य
☆ जगद्गुरू आद्य श्री शंकराचार्य – भाग – ३ … ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆
(त्यामुळे काम या पुरुषार्थाशी माझा दूरान्वयानेही संबंध आला नाही. मला सहा महिन्यांचा कालावधी द्या. मी सहा महिन्यांचे आत कधीही येईन.) – इथून पुढे —
भारती-माता, यांचे दुसरे नाव सरस्वती होते. दुर्वास ऋषींच्या शापामुळे सरस्वती देवींना भूलोकी जन्म घ्यावा लागला होता. भगवान शिव जेव्हा भूलोकी जन्म घेतील, तेव्हा त्यांच्या दर्शनाने या सरस्वती देवी मुक्त होतील, असा श्री विष्णूंनी भारती देवींच्या वडिलांना दृष्टांत दिला होता. आचार्य दुसऱ्या दिवशी महिष्मती सोडून निघणार होते. त्या रात्री मंडन अत्यंत शांत व मूक होते. त्यांच्या मनात कोणतीच शंका उरली नव्हती. कोणत्याच कामाची आसक्ती उरली नव्हती. त्यांनी मनाने केव्हाच संन्यास स्वीकारला होता. त्या रात्री भारतीने आपल्या मुलाची करावी तशी आचार्यांची सेवा केली. ती मनोमन समजली होती की आता आपले जीवन संपले आहे. आचार्यांना निरोप देण्यासाठी रस्ते सजवले होते. सारे याज्ञिक, वेदज्ञ, प्रतिष्ठित नागरिक, ईश्वर भक्त मंडन मिश्रांच्या निवासाकडे आले होते.
आचार्य पुढे जात असता, अमृतपूरच्या राजाचे निधन झालेले दिसले. पर्वतावरील एका गुहेत आचार्यांनी , मी, देह ठेवणार असल्याचे व त्या राजाच्या शरीरात मी प्रवेश करणार असल्याचे सुखाचार्य, पद्मपादाचार्य व हस्तामलकाचार्य या तीनच शिष्यांना सांगितले. त्या गुहेत त्यांच्या शरीराचे रक्षण करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवली. कोणत्याही संकटाची चाहूल लागली तरी मला म्हणजे राजाला येऊन एक श्लोक सांगितला तो म्हणा. त्याक्षणी मी माझ्या शरीरात प्रवेश करेन.
तिकडे राजाचे अंत्यदर्शनासाठी राजाला फुलांचे गादीवर ठेवले. इतक्यातच राजाने हालचाल केल्याचा भास झाला. झोपेतून उठावे तसे राजा उठून बसला अंत्यविधी करण्यासाठी आलेल्या ब्राह्मणांनी प्रसंगावधान दाखवून कणकेची प्रतिमा करून तिचे दहन केले. सर्व राज्यात आनंद झाला. दुसऱ्या दिवशी राजपुरोहिताने योग्य तो अभिषेक केल्यावर, राज्यकारभार सुरू झाला. वेळच्यावेळी राज्यसभा सुरू व्हायची. पटापट निर्णय दिले जायचे. राज दरबारात नवचैतन्य निर्माण झाले होते. राज्यातील प्रजेत अपूर्व आत्मविश्वास निर्माण झाला. सर्वजण चांगले वागू लागले. मंदिरांचे पुनरुज्जीवन झाले. हरिभक्ति फुलून जाऊ लागली.
राणी पहिल्याच भेटीत मोहरून गेली. राजा प्रेमाने वागतो, पण तो अलिप्त असल्याचे तिला जाणवत होते. राजा पूर्वीप्रमाणे दासींकडे पहात नसे. त्यामुळे राणी स्वतः सर्व सेवा करू लागली.
हळुहळू मंत्रिमंडळाला संशय येऊ लागला की आपला राजा इतका कसा बदलला? वीस दिवसांनी मंत्रिमंडळाने गुप्त बैठक घेतली. त्यांना जाणवले की कोणीतरी योग्याने राजाच्या शरीरात प्रवेश केला असावा. मच्छिंद्रनाथांनी जसे आपले शरीर लपवून ठेवले होते, तसे काही घडले का? असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे गुप्तपणे शोध घेण्याचे व अशा योग्याचे ते शरीर शोधून अग्नी दिला पाहिजे, म्हणजे हा योगी राजाचे शरीर सोडून कुठेही जाणार नाही व आपला राजा चक्रवर्ती होईल असे त्यांनी ठरवले.
ही बातमी चित्सुखानंदांनी राजवाड्यात येऊन, ठरल्याप्रमाणे खुणेचा श्लोक म्हणून, राजाला सांगितली. आचार्य काय समजायचे ते समजले व परत गुहेत ठेवलेल्या शरीरात प्रवेश करून त्या स्थानापासून दूरवर निघून गेले.
हे शरीर ठेवले होते, ती जागा, नर्मदेकाठी, मंडलेश्वर या गावी, गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आहे.
दीड-दोन महिन्यातच ते परत महिष्मतीला आले. चर्चेमध्ये आचार्यांनी भारती देवींचे पूर्ण समाधान केले. त्या म्हणाल्या, आपण साक्षात सदाशिव आहात. आपणास माझा नमस्कार. आपण साक्षात जगद्गुरुच आहात. मी माझ्या पतीला संन्यास दीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे. आचार्यांनी मंडन मिश्रांना संन्यास दिला.
त्या काळात काश्मीर म्हणजे पंडितांचे आगर होते. श्रीनगर मध्ये फार पूर्वी सर्वज्ञ पीठ स्थापन झाले होते. त्या पीठाचे, तीन दिशांचे दरवाजे उघडलेले होते. पंडितांनी तो मान मिळवला होता. पण दक्षिणेकडचा दरवाजा बंद होता. आचार्य दक्षिणेकडून आले होते. तेथील विद्वानांमध्ये चर्चा होऊन, आचार्यांसाठी दक्षिणेकडील दार उघडले गेले व त्या सर्वज्ञ पिठावर बसण्याचा त्यांना मान मिळाला.
बौद्ध व जैन पंथीय आचार्यांनी शंकराचार्यांना मनोमन मान्यता दिली. पण सभा सोडून चालते झाले.
नंतर त्यांनी द्वारकेमध्ये पहिल्या धर्मपीठाची स्थापना केली. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांचे दर्शन घेतले. तेव्हा अच्युताष्टकाची रचना केली. नंतर प्रभास व उज्जैनीस भेट दिली. नेपाळला दर्शनासाठी गेले. वैदिक सनातन धर्माच्या पताका, नेपाळच्या सर्व मंदिरांवर उभारल्या. आचार्य यांना कैलास पर्वतावर जाऊन शिवदर्शनाची ओढ लागली होती. त्यांनी केलेल्या प्रार्थनेवर प्रसन्न झालेल्या दत्तगुरूंनी, आचार्य यांचा उजवा हात धरला व आपल्या योगसामर्थ्याने एका क्षणात त्यांना भगवान शिवांच्या समीप कैलासावर आणले. तिथे शतश्लोकी शिवानंद लहरींची रचना झाली. आचार्यांनी केलेल्या, या भक्तीमय स्तोत्राने प्रसन्न झालेल्या भगवान शिवांनी आचार्यांना पाच स्फटिकलिंगे दिली व सांगितले, यांच्या पूजनाने तुला अमोघ ज्ञान प्राप्त होईल.
आचार्यांनी जगन्नाथ पुरी येथे मठ स्थापन केला.
नंतर आचार्य, महाराष्ट्रातल्या वैकुंठाकडे म्हणजेच पंढरपूरला आले. पांडुरंगाचे दर्शन होताच पांडुरंगाष्टक म्हणून प्रार्थना करू लागले.
आचार्यांनी चौथ्या
धर्मपीठाची स्थापना शृंगेरी येथे केली.
शेवटी, कांची येथे
धर्मपीठाची स्थापना केली.
अशा प्रकारे चार दिशांना चार धर्मपीठांची स्थापना केली.
कांचीमध्ये कोण, कोणत्या धर्मापीठावर राहील, ते सांगितले.
त्यांनी धारण केलेला दंड, नर्मदा मातेने पावन केलेला कमंडलू, त्यांच्या पादुका…. यांच्यावर कोणाचा हक्क राहील, हे सांगितले.
ते म्हणाले माझा बहिश्चर प्राण, म्हणजे कैलासावर भगवान शिवांकडून प्राप्त झालेल्या त्या सौंदर्य लहरी,
माझ्या शिवानंद लहरींसह, प्राणरूपाने आपणा सर्वांसाठी ठेवून जात आहे. व आपल्या मधुर वाणीने
भज गोविंदम्
भज गोविंदम।।
हे आपल्या गुरूंचा उल्लेख असलेले व गुरुगोविंदयतींना प्रिय असलेले भजन म्हणायला सुरुवात केली.
सर्व शिष्यांच्या एका सुराने कांची मठाचा आसमंत भरून गेला. एका क्षणी धून थांबली; व सर्वत्र, नीरव शांतता पसरली. कारण आचार्य आसनावर नव्हते.
दंड तेजाळला होता. कमांडलू प्रभावी दिसत होता.
पादुका तेजःपुंज दिसत होत्या.
आणि सौंदर्य लहरीच्या पोथीतून व त्याखाली असलेल्या शिवानंद लहरींच्या पोथीतून, दिव्य असा, शीतल प्रकाश बाहेर पसरत होता.
आचार्यांचे आसन रिकामे होते.
चित्सुखाचार्य कातर स्वरात म्हणत होते….
चिदानंद रूप, शिवोsहम् शिवोsहम।।
— समाप्त —
(संदर्भ ग्रंथ…. “जगद्गुरु श्रीमद् आद्य शंकराचार्य “ – लेखक… श्री.अविनाश महादेव नगरकर.)
© सौ. यशश्री वि. तावसे
पुणे
दूरभाष क्र. 9552906006
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈