डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ : ऋचा : ११ ते १५ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २४ (अनेक देवतासूक्त)
ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : ऋचा ११ – १५ : देवता वरुण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील चोविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले असल्याने हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिली ऋचा प्रजापतीला, दुसरी ऋचा अग्नीला, तीन ते पाच या ऋचा सवितृ देवतेला आणि सहा ते पंधरा या ऋचा वरुण देवतेला आवाहन करतात.
आज मी आपल्यासाठी वरुण देवतेला उद्देशून रचलेल्या अकरा ते पंधरा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
तत्त्वा॑ यामि॒ ब्रह्म॑णा॒ वन्द॑मान॒स्तदा शा॑स्ते॒ यज॑मानो ह॒विर्भिः॑ ।
अहे॑ळमानो वरुणे॒ह बो॒ध्युरु॑शंस॒ मा न॒ आयु॒ः प्र मो॑षीः ॥ ११ ॥
नमन करोनीया स्तवनांनी तुमच्या समीप येतो
अर्पण करुनी हविर्भाग हा भक्त याचना करतो
क्रोध नसावा मनी आमुच्या जवळी रहा जागृती
दीर्घायू द्या तुमची कीर्ती दिगंत आहे जगती ||११||
☆
तदिन्नक्तं॒ तद्दिवा॒ मह्य॑माहु॒स्तद॒यं केतो॑ हृ॒द आ वि च॑ष्टे ।
शुनः॒शेपो॒ यमह्व॑द्गृभी॒तः सो अ॒स्मान्राजा॒ वरु॑णो मुमोक्तु ॥ १२ ॥
अहोरात्र उपदेश आम्हा सारे पंडित करिती
मना अंतरी माझ्या हाची कौल मला देती
बंधबद्ध शुनःशेप होता तुम्हा आळविले
तुम्हीच आता संसाराच्या बंधनास तोडावे ||१२||
☆
शुन॒ःशेपो॒ ह्यह्व॑द्गृभी॒तस्त्रि॒ष्वादि॒त्यं द्रु॑प॒देषु॑ ब॒द्धः ।
अवै॑नं॒ राजा॒ वरु॑णः ससृज्याद्वि॒द्वाँ अद॑ब्धो॒ वि मु॑मोक्तु॒ पाशा॑न् ॥ १३ ॥
शुनःशेपाचे त्रीस्तंभालागी होते बंधन
धावा केला आदित्याचा तोडा हो बंधन
ज्ञानवान या वरूण राजा कोण अपाय करीत
तोच करी या शुनःशेपाला बंधातुन मुक्त ||१३||
☆
अव॑ ते॒ हेळो॑ वरुण॒ नमो॑भि॒रव॑ य॒ज्ञेभि॑रीमहे ह॒विर्भिः॑ ।
क्षय॑न्न॒स्मभ्य॑मसुर प्रचेता॒ राज॒न्नेनां॑सि शिश्रथः कृ॒तानि॑ ॥ १४ ॥
शांतावावया तुम्हा वरुणा अर्पण याग हवी
तुम्हा चरणी हीच प्रार्थना आम्हा प्रसन्न होई
रिपुसंहारक ज्ञानःपुंज वास्तव्यासी येई
करोनिया क्षय पातक आम्हा पुण्य अलोट देई ||१४||
☆
उदु॑त्त॒मं व॑रुण॒ पाश॑म॒स्मदवा॑ध॒मं वि म॑ध्य॒मं श्र॑थाय ।
अथा॑ व॒यमा॑दित्य व्र॒ते तवाना॑गसो॒ अदि॑तये स्याम ॥ १५ ॥
ऊर्ध्वशीर्ष मध्यकाया देहाच्या खाली
तिन्ही पाश आम्हा जखडती संसारी ठायी
शिथिल करा हो त्रीपाशांना होऊ पापमुक्त
आश्रय घेण्याला अदितीचा आम्ही होऊ पात्र ||१५||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 11-15
Rugved Mandal 1 Sukta 24 Rucha 11-15
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈