डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आंतरराष्ट्रीय मातृदिन – एक बाजू अशीही…  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

Anna Reeves Jarvis

नमस्कार मित्रांनो,  

आंतरराष्ट्रीय मदर्स डे (मे महिन्याचा दुसरा रविवार) अर्थात मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

हा मातृदिन आजच्याच दिवशी का साजरा करतात, या प्रश्नाचा मी मागोवा घेत असता काही मनोरंजक तसेच विचारणीय माहिती हाती लागली. मदर्स डेचा सर्वात जुना इतिहास ग्रीसशी जोडल्या जातो. तिथे ग्रीक देवी देवतांच्या आईची आदराने पूजा केल्या जात होती. हे मिथक असल्याचे देखील बोलल्या जाते. मात्र आज अस्तित्वात असलेल्या मदर्स डे ची सुरुवात करण्याचे श्रेय बहुतेक जण अॅना रीव्ह्ज जार्विस (Anna Reeves Jarvis) हिलाच देतात. तिचे आपल्या आईवर (अॅन मारिया रीव्ह्ज- Ann Maria Reeves) नितांत प्रेम होते. जेव्हां तिच्या आईचे ९ मे १९०५ ला निधन झाले, तेव्हा स्वतःच्या आईबद्दल आणि सर्वच मातांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस असावा असे तिला प्रकर्षाने वाटायला लागले. यासाठी तिने खूप पाठपुरावा करून वेस्ट व्हर्जिनियामध्ये चळवळ सुरू केली. तीन वर्षांनी (१९०८) अँड्र्यूज मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चमध्ये प्रथम अधिकृत मदर्स डे सेलिब्रेशन आयोजित केल्या गेला. १९१४ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अॅना जार्विसच्या कल्पनेला मान्यता देत मे महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता देणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली. हा दिवस मग हळू हळू अमेरिकेतून युरोपीय आणि इतर देशात आणि नंतर जगभर आंतरराष्ट्रीय मदर्स डे म्हणून मान्यता पावला.

कवी आणि लेखिका ज्युलिया वॉर्ड होवे (Julia Ward Howe) हिने या आधुनिक मातृदिनाच्या काही दशके आधी वेगळ्या कारणासाठी ‘मातृशांती दिन’ साजरा करण्याचा प्रचार केला. अमेरिका आणि युरोप मध्ये युद्ध सुरु असतांना हजारों सैनिक मारले गेले, अनेक प्रकाराने नागरिक पोळले गेले आणि आर्थिक हानी झाली ती वेगळीच. या पार्श्वभूमीवर एखादा दिवस युद्धविरोधी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मातृदिन साजरा करण्याची कल्पना जगभरात पसरली पाहिजे असे ज्युलियाला वाटत होते. तिची कल्पना होती की महिलांना वर्षातून एकदा चर्च किंवा सोशल हॉलमध्ये एकत्र येण्यासाठी, प्रवचने ऐकण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, ईश्वरभक्तीची गीते सादर करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करावे व त्यांच्यासाठी असा एखादा दिवस नेमून द्यावा. या कृतीमुळे शांतता वाढेल आणि युद्धाचे संकट टळेल असे तिला वाटत होते.

मात्र ‘एकसंध शांतता-केंद्रित मदर्स डे’ साजरा करण्याचे हे सुरुवातीचे प्रयत्न मागे पडले, कारण तोंवर व्यक्तिगतरित्या मातृदिन साजरा करण्याची दुसरी संकल्पना रुजली. याला कारण होते व्यापारीकरण! नॅशनल रिटेल फेडरेशनच्या २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, आजकाल मदर्स डे हा अमेरिकेत $२५ अब्ज इतका महागडा सुट्टीचा दिवस बनला आहे. तिथे लोक या दिवशी आईवर सर्वात जास्त खर्च करतात. ख्रिसमस आणि हनुक्का सीझन (ज्यू लोकांचा ‘सिझन ऑफ जॉय’) वगळता मदर्स डेसाठी सर्वात जास्त फुले खरेदी करण्यात येतात. या व्यतिरिक्त गिफ्ट कार्ड, भेटवस्तू, दागिने यांवर $५ अब्ज पेक्षाही अधिक खर्च केल्या जातो. या शिवाय विविध स्कीमच्या अंतर्गत स्पेशल आउटिंग सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे.

अॅना रीव्ह्ज जार्विसला याच कारणास्तव तिच्या मातृप्रेमावर आधारित कल्पनेबद्दल खेद वाटत होता. तिच्या हयातीत, ती फ्लोरिस्ट्स (फुले विकणारी इंडस्ट्री) यांच्या आक्रमक व्यापारीकरणाविरुद्ध एकाकी लढली. मात्र दुर्दैवाने त्यासाठी तिलाच तुरुंगवास घडला. या निमित्ताने मातेप्रती असलेल्या भावभावनांचा राजनैतिक गैरवापर करणे, धर्मादाय संस्थांच्या नांवाखाली निधी गोळा करणे, हे प्रकार सुद्धा तिच्या डोळ्यादेखत घडत होते. जार्विसने १९२० साली एक अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडला. ती म्हणाली, ‘हा विशेष दिवस आता बोजड आणि फालतू झालाय. आईला महागडे गिफ्ट देणे, हा मदर्स डे साजरा करण्याचा योग्य मार्ग नाही.’  १९४८ साली, वयाच्या ८४ व्या वर्षी, जार्विस एका सॅनेटोरियम मध्ये एकाकी रित्या मरण पावली. तोवर तिने आपला सर्व पैसा मदर्स डे च्या सुट्टीच्या व्यापारीकरणाविरुद्ध लढण्यासाठी वापरून खर्च केला होता. मातृदिनानिमित्त मी या धाडसी आणि प्रगत विचारांनी समृद्ध अशा वीरांगना स्त्रीला नमन करते. तिचे छायाचित्र लेखाच्या सोबत जोडले आहे.

मैत्रांनो, मी ही माहिती वाचली तेव्हां माझ्या मनांत विचार आला की, खरंच या दिवशी आईची ही अपेक्षा असते कां? खरे पाहिले तर निरपेक्ष प्रेम करणे हाच स्थायी मातृभाव असतांना ते व्यक्त करण्यासाठी या तद्दन व्यापारी मनोवृत्तीला खत पाणी घालणे योग्य आहे कां? बहुतेक मातांना वाटत असते की, या दिवशी त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी फक्त वेळ काढावा, त्यांच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आईबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींना उजाळा द्यावा, गप्पा गोष्टी कराव्या अन सोबत असावे, बस! यात काडीचाही खर्च नाही.  माझ्या मते हेच सर्वात बहुमूल्य गिफ्ट असावे मदर्स डे चे अर्थात मातृदिनाचे !  

धन्यवाद !   

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments