सुश्री मंजुषा सुनीत मुळे
इंद्रधनुष्य
☆ “I want to be able to be alone” ☆ माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे ☆
I want to be able to be alone, to find it nourishing- not just waiting. –SUSAN SONTAG
साधारणपणे साठपासष्ठीच्या वयाच्या व्यक्ती कोणत्याही कारणाने एकत्र आल्या तरी त्यांच्या बोलण्यात एकटेपणाचा विषय आल्याशिवाय राहत नाही. —- या दृष्टीने सध्याचे समाज जीवन पाहिले तर त्यात सरळ सरळ दोन गट दिसून येतात. वेगाने बदलत चाललेल्या जीवनशैलीची नवी मूल्ये, नवे विचार अगदी सहजी आत्मसात करून, भावनिक गोष्टींमध्ये न गुंतता स्वतःला जो विचार सोयीचा आणि फायद्याचा वाटतो तो पटकन स्वीकारून पुढे चालणारा एक गट- तरुण आणि मध्यमवयीन लोकांचा !…… तर झपाट्याने बदलत चाललेली परिस्थिती समजत असली, अनुभवाला येत असली, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून, पुढे सर्व काही ठीकच होणार आहे -असणार आहे असा सोयीचा विचार करून, काळाची पावले न ओळखता, बेसावधपणे जगणारा एक गट— अर्थातच वृद्धांचा !
हे प्रकर्षाने जाणवण्याचे कारण म्हणजे, ६ मे २०२३ च्या टाइम्स ऑफ इंडियाचा अग्रलेख ! विषय आहे– एकाकीपणा —- Loneliness. संपादकीयामधे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की, ‘ Young people prefer new age autonomy over some idealised intergenerational families cohesion’.
वृद्ध, मुले आणि नातवंडे सगळ्यांनी एकत्र बरोबर राहणे आता जवळजवळ नाहीसे होताना दिसते. एवढेच नव्हे तर एका शहरात किंवा एका देशात पण ज्येष्ठांबरोबर रहात असणारे तरुणांचे प्रमाण प्रचंड वेगाने कमी होताना दिसते आहे. भारतामध्ये तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे जो फायदा देशाला आणि मुलांना होतो आहे, त्याच्या चर्चा होताना आपण वाचतो आणि ऐकतो आहे. तरुणांची, काम करणाऱ्यांची संख्या इतर देशांमध्ये खूप कमी झाली आहे. त्यामुळे ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना अक्षरशः रेड कार्पेट ट्रीटमेंट आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. या पार्श्वभूमीवर मनाने अजूनही भूतकाळातच राहणाऱ्या, आपले म्हातारपण विनात्रासाचे जाणारच आहे असा ठाम विश्वास असणाऱ्या वृद्धांनी खरोखरीच जागे होण्याची गरज आहे. अमेरिकेच्या वैद्यकीय क्षेत्रात सर्वात उच्चपदस्थ व्यक्ती म्हणजे US Surgeon General. सध्याचे सर्जन जनरल विवेक मूर्ती (एम.डी) यांनी एक ॲडव्हायझरी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, धूम्रपानासारखाच आणि तितकाच, एकाकीपणाही धोकादायक आहे. त्यामुळे व्यक्तीला हृदयविकार, अर्धांग वायू, डिमेन्शिया यासारखे रोग होण्याची शक्यता वाढते. पण सध्या घरात बोलायला माणसे नाहीत आणि असली तरी त्यांना गप्पा मारायला वेळ नाही अशी परिस्थिती ! मग वेळ घालवण्यासाठी वृद्ध मोबाईलच्या विळख्यात सापडतात. अशा व्यक्तींना मानसिक रोग होण्याचा धोका अधिक आहे हे स्वतः ज्येष्ठांनी लक्षात घ्यायला हवे.
घरात माणसे उपलब्ध नसतील तर आपल्याला चार चौघांमध्ये सुरक्षितपणे राहता येण्यासाठी निवासाचे काही वेगळे पर्याय शोधण्याची गरज आहे. तसेच जे या क्षेत्रात काम करत आहेत त्यांनीही वृद्धांना ती जाणीव प्रकर्षाने करून द्यायला हवीच आहे. ही जाणीव केवळ आर्थिकच नाही, तर अनेक स्तरावर करून घेणे आवश्यक आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी बरोबर कोणीतरी असणे, किंवा अशी व्यक्ती वेळेवर उपलब्ध होणे, ही आजची मोठी गरज आहे. पण त्याची शक्यताही कमी होत चाललेली आहे. त्यासाठी सुरक्षितता आणि सोय यांची सांगड घालून पुढची वाटचाल करायला हवी आहे. यासाठीचा सध्या उपलब्ध असलेला एक मार्ग म्हणजे ‘ वृद्ध – निवास ! ‘ पूर्वी त्याला वृद्धाश्रम म्हणत. पण आता मात्र वृद्धाश्रमापेक्षा वृद्धनिवासच म्हणणे योग्य ठरेल…. वृद्धनिवासांबद्दल एक नकारात्मक अशी भावना सर्वांच्याच मनात आहे. वृद्धांच्या , मुलांच्या आणि समाजाच्याही मनामध्ये ! त्याचं कारण म्हणजे वृद्धाश्रमात राहिले तर मुले काळजी घेत नाहीत असा अर्थ काढून जगाकडून आपल्या मुलांना/कुटुंबाला नावे ठेवली जातील अशी भीती वृद्धांना वाटते. ही भीती खरी आहे का नाही हे सुद्धा तपासून पाहण्याची गरज कोणाला वाटत नाही..
यासाठी खरंतर वृद्ध- निवासाचा पर्याय नेमका कसा आहे?..तो जास्त सुखकर आणि सोयीचा कसा होऊ शकतो? ते समजून घेणे आवश्यक आहे. संपूर्ण माहिती मिळाली तर वेळ आल्यावर असा निर्णय घेणेही सोपे होऊ शकते ..
(हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन यासाठी ‘वृद्धनिवास‘ या विषयावर ‘सनवर्ल्ड फॉर सिनीयर्स‘ या संस्थेतर्फे दि. २६ मे २०२३ रोजी पुण्यामध्ये सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. —
मार्गदर्शक:- वृद्ध कल्याण शास्त्र तज्ञ, वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनावर पीएच.डी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. रोहिणी पटवर्धन.—- स्वतः वृद्धांनी, पन्नाशीच्या पुढच्या होऊ घातलेल्या वृद्धांनी, वृद्ध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांनी ही माहिती जाणून घेणे नक्कीच उपयुक्त ठरेल.)
संपर्क : प्रमोदिनी 8806180011 मृणालिनी 8767628468 ) — केवळ वाचकांच्या माहितीसाठी.
माहिती संकलन : मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈