सौ. यशश्री वि. तावसे
इंद्रधनुष्य
☆ ।।गङ्गा दशहरा।।… ☆ सौ. यशश्री वि. तावसे ☆
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध दशमी पर्यंत गंङ्गा नदीचा जो उत्सव करतात, त्याला दशहरा किंवा गङ्गोत्सव म्हणतात.
भगीरथांच्या प्रदीर्घ प्रयत्नांती , ज्येष्ठ शुद्ध दशमीस, मंगळवारी, हस्त नक्षत्रावर गङ्गा नदीचे पृथ्वीवर अवतरण झाले.
या १० दिवसांमधील, गङ्गा- स्नानाच्या योगाने 10 पातकांचे, रोज एक याप्रमाणे क्षालन होते, म्हणून याला “दश-हरा” म्हणतात.
यालाच “गङ्गावतरण” असेही म्हणतात. गङ्गेचे अवतरण, हिंदू लोक, हा “दशहरा-काल” एक सण म्हणून साजरा करतात. गङ्गेचे, स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले. हा सण दहा दिवस साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा ते दशमी.
माँ गङ्गा नदीला, संपूर्ण विश्वात सर्वात पवित्र नदी मानले जाते.
सर्व नद्यांचे , मनुष्य जातीवर खूपच उपकार आहेत. सर्व नद्या पवित्र व साक्षात जलदेवता आहेत. त्यांचे प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी, नद्यांची पूजा केली जाते.
गङ्गा नदीने आपल्या पिताश्रींना, म्हणजे श्री शिवजींना विचारले, की सर्व लोक माझ्या मध्ये येऊन स्नान करून आपली पापे धुवून टाकतात. माझ्याकडे, साठलेल्या या सर्व पापांचे, निर्मूलन करण्यासाठी, मी काय करू? तेव्हा श्रीशिवजींनी सांगितले, की तू श्रीनर्मदा- मैया मध्ये जाऊन स्नान कर. व त्यायोगे, तू , स्वतःला शुद्ध करून घेऊ शकशील; कारण श्रीनर्ममदा ही स्वतःच पापनाशिनी आहे. त्यामुळेच या दशहराच्या कालखंडात श्री नर्मदा मैया मध्ये स्नान केल्यामुळे गङ्गास्नानाचेही पुण्य लाभते.
काही ऋषींनी असेही पाहिले आहे की, श्री श्रीगङ्गा- मैय्या ही काळ्या गाईच्या रुपाने, श्री नर्मदा मैया मध्ये स्नानासाठी येते व परत जाताना ती शुभ्र रंगाची होऊन जाते. म्हणून या गङ्गा दशहराच्या काळात, गङ्गामैया, नर्मदा मैया किंवा त्यांच्या किनारी जाणे शक्य नसेल, तर कोणत्याही नदीमध्ये त्या दोघींचे नाव घेऊन स्वतःच्या पापनाशनासाठी स्नान करावे. पुण्यशालिनी अशा सप्त नद्यांचे स्मरण करावे.
आपल्या निवासाच्या ठिकाणी जी नदी आहे, तिचेसुद्धा आपल्यावर खूप मोठे ऋण असते. तिची पूजा करावी. मैय्याला खस (वाळा), कापूर, सुगंधी द्रव्ये अर्पण करावीत. ओटी भरावी. नैवेद्य दाखवावा. ऋतुकालोद्भव अंबा अर्पण करावा. मैय्याला भरवावे. काठावर दिवे लावावे. त्यांची स्तोत्रे म्हणावीत.
गावातील सांडपाणी नदीत जाणार नाही यासाठी प्रयत्न करावेत.
आद्य श्री शंकराचार्यांनी गङ्गाष्टक, गङ्गा स्तोत्र, यमुनाष्टक, नर्मदाष्टक, मणिकर्णिकाष्टक अशा स्तोत्रांची रचना केलेली आहे. नद्यांवरती इतरही बरीच काही स्तोत्रे आहेत. त्यांचे पठण करावे. श्री जगन्नाथ पंडित यांनी गङ्गालहरी स्तोत्र याची सुंदर रचना केलेली आहे. श्री शंकराचार्य व श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी नर्मदा लहरींची रचना केलेली आहे. श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी कृष्णा लहरींची पण रचना केलेली आहे. या स्तोत्रांमध्ये या नद्यांची स्तुती केलेली आहे, महती सांगितलेली आहे व फलश्रुती पण सांगितलेली आहे. तरी या दहा दिवसात अशा प्रकारे उपासना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा. श्री जगन्नाथ पंडितांनी गङ्गा लहरी रचताना गङ्गास्तुतीच्या सहाय्याने स्वतःचा उद्धार करून घेतलेला आहेच. ज्या लोकांना, योग मार्गाने आपल्या शरीरातील नाड्यांची शुद्धता करून घेता येणे जवळ जवळ अशक्य असते, त्यांना या नद्यांच्या उपासनेमुळे, स्तवनामुळे, त्या प्रकारची नाडी शुद्धी प्राप्त करून घेता येत असते, असे शास्त्र वचन आहे, भागवत पुराणात याचा उल्लेख आहे. या काळामध्ये नदीमध्ये स्नान, जप जाप्य उपासना व दान करणे या गोष्टींमुळे उच्च दर्जाची अध्यात्मिकता प्राप्त होते.
पूर्वीचे काळी, म्हणजे सुमारे 60-70 वर्षांपूर्वी, मंदिरांमधून, जसे आपण नवरात्र साजरे करतो, तसे गङ्गा दशहरा काळांत, दहा दिवस कीर्तन, जागरण, भागवत श्रवण, भगवत्कथा, जप जाप्य, अभिषेक होत असत.
माझी आई “मंगला कुलकर्णी” ही, कीर्तनकार असल्याने या दशहराच्या काळात लहानपणी, तिची कीर्तने अनेक वेळा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते. कारण मी तिला पेटीची साथ करत असे. ती उच्च विद्या विभूषित असल्याने व प्रोफेसर असल्याने तिचे अर्थार्जन बऱ्यापैकी उच्च प्रतीचे होते. कीर्तनातून मिळालेले पैसे, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे नाहीत, असे तिने ठरवले असल्याने, त्या संपत्तीचा, तिने विविध प्रकारच्या दानांसाठी विनियोग केला होता.
अशा दशहराच्या काळात, एक प्रकारचे वाचिक तप म्हणून, कोणाचीही निंदा तसेच चहाडी, न करणे यांसारखी बंधने, स्वतःवर लादून घेणारी बरीच मंडळी असतात.
या दहा दिवसांच्या काळात प्रामुख्याने श्री गङ्गामैया, श्री नर्मदा मैया, श्री शिवशंभू व भगवान श्री विष्णू यांची उपासना जास्तीत जास्त प्रमाणात करण्याचा प्रघात आहे. अशाप्रकारे या पवित्र कालावधीमध्ये जास्तीत जास्त उपासना करून आपण आपला अध्यात्मिक उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करू या.
या काळात ज्या सोप्या मंत्रांचा जप करावा ते असे…
१) हरगङ्गे भागीरथी।।
२) नर्मदे हर।।
३) नमः शिवाय।।
४) राम कृष्ण हरी गोविंद।।
ज्यांना येते त्यांनी इतर विविध प्रकारची गीते, स्तोत्रे, मंत्र यांचे पठण करावे.
या काळात गंगाकिनारी किंवा नर्मदा किनारी स्थित असलेल्या तीर्थस्नानांचे दर्शन घ्यावे.
तसेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एखाद्या ज्योतिर्लिंगाचे आणि श्री महाविष्णूंच्या एखाद्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यावे.
ज्यांना यज्ञयाग इ. पुण्यकर्मे करणे, कोणत्याही कारणांमुळे करणे अशक्य असेल त्यांनी निदान अशी कर्मे जिथे नेहमी/ मोठ्या प्रमाणात केली जातात, अशा ठिकाणी स्वतःच्या आर्थिक कुवतीनुसार त्या हवनासाठी ज्या वस्तू लागतात, त्यांचे दान अवश्य करावे.
तेही खूप पुण्यवर्धक असते.
२० मे ते ३० मे पर्यंत या वर्षीचा गंगा दशहराचा पुण्यकाल आहे.
© सौ. यशश्री वि. तावसे
पुणे
दूरभाष क्र. 9552906006
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈