इंद्रधनुष्य
☆ नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
नृसिंह अवतार प्रकट झालेला खांब पाकिस्तानात आहे …. पुण्याच्या सदाशिव पेठेतील जोशी वाड्यात श्री लक्ष्मीनृसिंह मंदिर आहे. या जोश्यांपैकी श्री अनंत जोशी यांना पाकिस्तानने त्यांच्या देशात येण्यास परवानगी दिली म्हणजेच व्हिसा दिला आणि हे जोशी मार्च २००४ मध्ये पाकिस्तानात गेले.
जिथे भगवान नरसिंह अवतरीत झाले, श्रीविष्णू यांचा हा अवतार ज्या ठिकाणी प्रकट झाला ती जागा त्यांना बघायची होती आणि ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. श्री जोशी पाकिस्तानी पंजाबच्या मुल्तान भागात आले. येथील प्रल्हादपुरी मंदिरात ही पावन जागा आहे. या फोटोत जो स्तंभ दिसत आहे, तो तोच स्तंभ आहे ज्यातून श्रीनरसिंह, श्रीविष्णू यांचा पाचवा अवतार प्रकट झाला होता.
बर्याच जोशी कुळांचं श्रीनरसिंह हे कुलदैवत असतं. कदाचित या जोश्यांचंही असेल आणि आपल्या कुळाच्या ईष्ट दैवताचं मूळ स्थान बघण्याची यांची इच्छा असेल. फोटोत बहुतेक ते कुलदैवताच्या मूळ स्थानी जिथे हा स्तंभ फाकलेला आहे, म्हणजेच जिथून श्री नरसिंह स्तंभ फाडून बाहेर आले तिथे जलाभिषेक करत असावेत.
या जोश्यांचे अनेक आभार कारण त्यांच्यामुळेच हा खांब फोटोत का होईना बघता येत आहे. त्यांच्या या मुल्तान भेटीत त्यांच्यासमोर मुन्शी अब्दुल रहमान खान यांनी लिहिलेलं आणि उलूम-इस्लामिया-चाहलक यांनी प्रकाशित केलेलं “तारीख-ए-मुल्तान” नावाचं एक उर्दू पुस्तक प्रस्तुत करण्यात आलं. यातील थोडी अनुवादित माहिती मध्यंतरी वाचनात आली होती.
सप्तपुरी म्हणजेच काशी, अयोध्या, उज्जैन, मथुरा, हरिद्वार, द्वारका, कांची अशी अतिशय पावन ठिकाणं आज आपल्या देशात आहेत, असंच एक ठिकाण होतं मूलस्थान म्हणजेच मुल्तान. श्रीविष्णू आणि सूर्यदेव यांची भूमी असलेल्या या आद्यस्थानाचा (आद्यस्थान हे या मुल्तानचं कितीतरी नावांपैकी एक नाव) इतिहास खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे. आज श्रीमंत देवस्थानांमध्ये तिरुपती बालाजी, पद्मनाभ स्वामी मंदिर यांची नावे घेतली जातात. पण यांच्यापेक्षाही संपन्न देवस्थान जर कुठलं होतं, तर ते हिंदूंसाठी सर्वात महत्त्वाचं असणारं आदित्याचं देवालय – मुल्तानचं सूर्य मंदिर.
संग्राहक : श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈