सुश्री सुलू साबणे जोशी
इंद्रधनुष्य
☆ ““सेंगोल — राजदंड” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
“सेंगोल” – या राजदंडाची उंची ५ फूट आहे. तो चांदीचा असून त्यावर सोन्याचे पाणी दिलेले आहे. त्याच्या माथ्यावर शिवाचे प्रिय वाहन “नंदीबैल” विराजमान आहे, ज्याला निष्पक्षता आणि न्यायाचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे. हा राजदंड राजाने हाती धारण करणे म्हणजे धर्माशी अतूट, अविचल आणि तत्त्वनिष्ठ राहून शासन करण्याची जबाबदारी पार पाडणे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी, शेवटचा ब्रिटिश व्हॉईसरॉय – लॉर्ड माऊंटबॅटन यांना सत्तांतराचे प्रतीक म्हणून काही दृष्यस्वरूपातील चिन्ह हवे होते. तसे त्यांनी पं.नेहरूंना सुचवले. त्यावेळी ब्रिटिश भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल होते – माननीय सी. राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी. ते थोरापल्ली, जिल्हा कृष्णगिरी, तामिळनाडू (तेव्हाचे मद्रास राज्य) येथील रहिवासी होते. त्यांच्या मनावर चोल राजवंशाचा मोठा प्रभाव होता. राजसत्तेच्या सत्तांतराच्या समारंभात हा ‘सेंगोल’ (राजदंड) विधिपूर्वक नव्या शासकाच्या हाती सुपूर्द करण्यात येई. राजाजींनी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील “थिरूवदुथुराई अधिनाम (मठ), (Thiruvaduthurai Adheenam (Mutt) या धर्मपीठाशी संधान साधून चेन्नईतील “व्युमिडी बंगारू चेट्टी” या सराफी-पेढीकडून हा “सेंगोल” तयार करून घेतला. त्यावेळी त्याची किंमत रू.१५,०००/- होती.
अशा रीतीने १४ ऑगस्ट १९४७ रोजी हा “सेंगोल” (राजदंड) पं. नेहरूंच्या घरी त्यांचे हाती या मठाच्या साधूंकडून विधीपूर्वक सुपूर्द करण्यात आला.
तो ‘सेंगोल’ (राजदंड) अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील संग्रहालयात वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रदर्शित करण्यात आला होता.
मात्र आता, कालच उद्घाटन झालेल्या नव्या संसद-भवनामध्ये, लोकसभा अध्यक्षांच्या सन्मान्य आसनाशेजारी त्याची सन्मानपूर्वक स्थापना होत असून, ती तामिळनाडूतील त्याच मठाच्या साधूंकडून विधिपूर्वक केली जाईल.
माहिती संग्रहिका :: सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈