सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ चांगदेव पासष्ठी – भाग-10… ☆भावानुवाद- सुश्री शोभना आगाशे ☆
पाण्याची खोली मोजण्यासि
मीठ तेथ जाई बुडी मारण्यासि
स्वतःच तेथे विरघळून ते जाता
कशी पाण्याची खोली, मोजे हाता
आत्मभाव तुझा मापु न शकतो
माझा आत्मभाव तयात विरतो
एकरूप होता पाणी व लवण
कोण कोणा करी उपदेश जाण॥४६॥
नसे जिथे मी स्वतः, तुज जातो पाहू
आत्मरूपी लीन तूही, तुज कैसे पाहू॥४७॥
जागा राहुनिया निद्रेसि कसा पाहू
स्वरूपी एकरूप तुला कसा पाहू॥४८॥
अंधार असता प्रकाश नसे, परि
स्वतः असण्याची जाणीव उरी
अंधार दूर करि जरी सूर्यप्रकाश
पाहू न शके तो कधी अंधारास
जंव पाही मी तुजकडे चांगदेवा
मज दिसे केवळ आत्मस्वरूप ठेवा
मम स्वरूपे, पहावे तव स्वरूप
मम देह, तव देहाचे न पाही रूप
इंद्रियस्थ केवळ पाहणे, दिसणे
आत्मतत्वी भेटता, विरून जाणे॥४९॥
तव आत्मस्वरूपा मी शोधू जाता
माझे मीपण, तुझे तूपण नष्ट होता
अशा भेटी, अद्वैत आत्मतत्वांचे
घेशील सुख आत्मसाक्षात्काराचे॥५०॥
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈