डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ ♻️ जागतिक पर्यावरण दिन-५ जून २०२३… 🌻 ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार मैत्रांनो,

युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम (UNEP) च्या नेतृत्वाखाली १९७३ पासून दर वर्षी ५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ आयोजित केला जातो. २०२३ च्या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे ‘Beat Plastic Pollution’ अर्थात ‘प्लास्टिक प्रदूषणावर मात करा’, कारण वाढते प्लास्टिक प्रदूषण हे पर्यावरण प्रदूषणाचे एक प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी ४०० दशलक्ष टनांहून अधिक प्लास्टिकचे उत्पादन केले जाते, त्यातील निम्मे प्लास्टिक एकदाच वापरण्यासाठी (एकल वापर प्लास्टिक अर्थात सिंगल यूज प्लास्टिक) डिझाइन केलेले आहे. म्हणूनच आजच्या काळाची नितांत गरज बनलेल्या २०२३ च्या थीमच्या अंतर्गत प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याविषयी सार्वजनिक व निजी क्षेत्र तसेच नागरिकांचा सहभाग असलेले जागतिक उपक्रम राबवल्या जातील.

प्लास्टिक प्रदूषणाची कारणे

प्लॅस्टिकचे उत्पादन करतांना जीवाश्म इंधन वापरतात, जे ग्रीन हाऊस गॅस (कार्बन डाय ऑक्साईड) बाहेर टाकते आणि जागतिक तापमान वाढवते. एकल वापर प्लास्टिक, मुख्यत्वे करून प्लॅस्टिकच्या पिशव्या, स्ट्रॉ आणि पाण्याच्या बाटल्या यांचा अतिरेकी वापर हे वाढत्या प्लास्टिक प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. प्लास्टिक कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन (मुख्यत्वे कचऱ्याचे वर्गीकरण न करणे), कचराकुंडीच्या बाहेर किंवा इतरत्र प्लास्टिक फेकल्यास प्लास्टिक जलमार्ग आणि महासागरांमध्ये प्रवेश करून सागरी जीवन आणि पर्यावरणास हानी पोहोचवू शकते. या प्लास्टिकचे विघटन होण्यास १००० हून जास्त वर्षे लागतात, शिवाय हे विषारी रसायनाच्या रूपात विघटित झालेले प्लास्टिक पर्यावरण कलुषित करीत राहते. सागरी जीवनावर प्लास्टिक प्रदूषणाचा परिणाम होतो. महासागरांतील कासव, मासे आणि इतर जलचरांच्या जीवांची हानी होते. तसेच जलमार्ग प्रभावित होतात. नद्या आणि नाले प्लास्टिकच्या कचऱ्याने तुंबू शकतात, ज्यामुळे पूर आणि प्रदूषण होते. यात आपल्या पिण्याचे पाणी देखील प्रदूषित होते. यामुळे जैवविविधता (biodiversity) कमी होत आहे. प्लास्टिकच्या विषारी रसायनांनी मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याचे मार्ग

प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्याकरता रिड्यूस, रीयूज और रीसायकल, हे तीन आवश्यक R अर्थात उपाय आहेत. एकल वापर प्लास्टिकचा वापर कमी करून त्याऐवजी शाश्वत पर्याय अर्थात नैसर्गिक साहित्य वापरावे. या लढ्यात जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. सामाजिक जागरूकता अभियान, तसेच समाज प्रबोधन यासाठी समाज माध्यमे खूप परिणामकारक ठरतात. एकल-वापरणाऱ्या प्लास्टिकचे उत्पादन आणि वापर मर्यादित करणारी सरकारी धोरणे आणि नियम यांचे पूर्ण कसोशीने पालन करणे गरजेचे आहे. तसेच प्लास्टिक प्रदूषणावर मात करण्यासाठी समुद्रकिनारे, बगीचे, इतर सार्वजनिक ठिकाणे आणि संकुलात स्वच्छता अभियान आयोजित करून आपण प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन करू शकतो.

‘स्वच्छ रुणवाल’ अभियान 

मैत्रांनो, आपण प्लास्टिकचा वापर करतोच, पण ते आपल्या घराबाहेर, संकुलाच्या परिसरात, रस्त्यांवर तसेच कचराकुंडीच्या असतानाही तिच्या बाहेर हा कचरा टाकतो. हे कचऱ्याचे योग्य नियोजन नाही. या दृष्टीने रुणवाल गार्डन सिटी, ठाणे पश्चिम या आमच्या संकुलात जानेवारी २०१७ पासून ‘स्वच्छ रुणवाल’ हा उपक्रम कार्यान्वित आहे. बिस्लेरी-बॉटल फॉर चेंज, अँटी प्लास्टिक ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्ट, परिसर भगिनी विकास संघ, उर्जा फाउंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्यासोबत ‘स्वच्छ रुणवाल’ हा प्रकल्प राबवल्या जात आहे. आजपावेतो आम्ही २७००० किलो पेक्षाही अधिक प्लास्टिक पुनर्वापर करण्याकरता दिलेले आहे, याचा रहिवासी आणि या मोहिमेत सहभागी असलेल्या स्वयंसेवकांना (मी यात स्वयंसेवक आहे) रास्त अभिमान आहे. याच उपक्रमात इलेक्ट्रॉनिक कचरा आणि थर्माकोलचाही पुनर्वापर केल्या जातो. वृक्षारोपण मोहिमेद्वारे हिरवळ आणि स्वच्छतेला प्रोत्साहन दिल्या जाते. ठाणे लगतच्या समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी स्वच्छता मोहीमेत आमच्या कांही स्वयंसेवकांनी योगदान दिलेले आहे.

जानेवारी २०१७ मध्ये आम्ही प्लॅस्टिक संकलनाची सुरुवात केली. यात गोळा केलेला प्लास्टिक कचरा स्वयंसेवक त्यांच्या स्वतःच्या वाहनातून पुनर्वापरासाठी ऊर्जा फाउंडेशन केंद्रांमध्ये नेत असत. संकुलाचे योगदान वाढत गेले, म्हणून आम्ही ‘बॉटल फॉर चेंज’ आणि ‘अँटी प्लास्टिक ब्रिगेड चॅरिटेबल ट्रस्ट’ शी करार केला. ऑगस्ट २०१९ पासून याला चांगलीच गती मिळाली. आता एका आठवड्याआडच्या शनिवारी रुणवाल गार्डन सिटीच्या रहिवाशांनी प्लॅस्टिक कचरा इमारतींच्या ठराविक ठिकाणी जमा करून प्लास्टिक पुनर्वापराची मोहीम सुरू ठेवली आहे. आमचे संकुल ‘बॉटल फॉर चेंज’ च्या प्रकल्पांतर्गत नोंदणीकृत आहे. यात ही संस्था तुमच्या सोसायटीमधून प्लास्टिक गोळा करण्यासाठी त्यांचे वाहन तुमच्या दारात पाठवते आणि त्यांच्या ऍपद्वारे हे काम करणे खूप सोपे असते. हे ऍप आमच्या सोसायटीने त्यांच्याकडे जमा केलेल्या प्लॅस्टिक कचऱ्याचे नेमके वजन सांगते.

प्लॉगिंग

मंडळी, आमच्या संकुलात ‘प्लॉगिंग’ (म्हणजेच जॉगिंग किंवा इतर व्यायाम करता करता प्लास्टिकचा कचरा गोळा करणे आणि त्याचे योग्य नियोजन करणे) देखील करण्यात येते. दर रविवारी आमच्या या प्रकल्पातील सदस्य आणि मुले हे विखुरलेले प्लास्टिक वेचून, तर कधी खोदून काढत सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणे ते जमा करीत असतात. या व्यतिरिक्त कांही खास दिवशी (उदा. धुळवडीचा दुसरा दिवस- ८ मार्च २०२३ आणि जागतिक वसुंधरा दिन-२२ एप्रिल २०२३) हे काम जोमात सुरु असते.

जनजागरण

हे स्वयंसेवक जनजागरण करण्याची कुठलीच संधी सोडत नाहीत. या संकुलातील प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमात यांचे आवाहन असतेच! कधी समाजमाध्यमातीळ संदेश, व्हिडीओ (मुख्यतः व्हाट्स ऍप आणि फेस बुक) कधी भाषण तर कधी सुंदर पथनाट्य, कधी पोस्टर, पेन्टिंग स्पर्धा! या सर्व माध्यमातून हे काम अव्याहत सुरूच असते. अत्यंत आशाजनक आणि आनंददायी गोष्ट ही की, या उपक्रमात लहान मोठी मुले खूप उत्साहात आणि हिरीरीने सहभागी होतात.

पुरस्कार

या अभियानाला कित्येक पुरस्कार आणि प्रमाणपत्रे मिळाली आहेत. २०२३ विषयी सांगायचे तर, ८ मार्च रोजी झालेल्या ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधत, संजय भोईर प्रतिष्ठान तर्फे ‘उषा सखी सन्मान’ या कार्यक्रमात माननीय श्री संजय भोईर आणि सौ उषा भोईर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन रुणवालच्या या प्रकल्पासाठी काम करणाऱ्या स्त्रियांचा गौरव करण्यात आला. ११ एप्रिल २०२३ ला गोदरेज आणि बॉयस यांच्या सहकार्याने ‘द बेटर इंडिया’ ने सादर केलेला ‘सर्वोत्कृष्ट गृहनिर्माण संस्था पुरस्कार’ (स्वच्छ पुढाकार श्रेणीतील विजेते) रुणवाल गार्डन सिटी, ठाणेला मिळाला आहे. शहरांना राहण्यायोग्य अशी चांगली ठिकाणे बनवण्याच्या दिशेने एकत्रितपणे काम करणे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये त्याची अंमलबजावणी आणि जागरूकता निर्माण केल्याबद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार आहे.

मंडळी सामाजिक उपक्रम सरकारी असो वा खाजगी, तो नागरिकांच्या सहभागाशिवाय सिद्धीस जात नसतो. कुठल्याही उपक्रमाची सुरुवात स्वतः पासूनच होते. आपण सर्वांनी एकल वापर प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, प्लेट, डबे, भांडी, चमचे, स्ट्रॉ, कप इत्यादींचा वापर थांबवला पाहिजे. पर्यायी वस्तूंपासून बनलेले साहित्य (उदा. कापडी पिशव्या, स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या, केळ्याच्या सालीपासून तयार केलेल्या प्लेट, वाट्या इत्यादी) वापरात आणल्यास कित्येक टन प्लास्टिकचा वापर थांबवता येईल. सरकारी पातळीवर प्रत्येक संकुलात कचऱ्याचे नियोजन करणे आणि प्लास्टिक वेगळे जमा करणे या योजना आधीच सुरु झाल्या आहेत, त्या यशस्वी करणे हे त्या रहिवाश्यांचे सामाजिक कर्तव्य आहे. ‘माझा प्लास्टिक कचरा, माझी जबाबदारी’ हा मंत्र ध्यानात ठेवत आपण या प्रकल्पात खारीचा वाटा उचलावा, असे मला वाटते. लक्षात असू द्या मंडळी, आपण पुनर्वापरासाठी दिलेले प्रत्येक प्लास्टिक हे हरित वसुंधरेच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे !

धन्यवाद ! 🌹

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

टीप-

वरील उपक्रमासंबंधी विडिओच्या लिंक लेखाच्या शेवटी दिलेल्या आहेत. या लेखासाठी इंटरनेटवर उपलब्ध माहितीचा उपयोग केला आहे.

कृपया प्रतिक्रिया अग्रेषित करायची असल्यास माझे नाव आणि फोन नंबर त्यात असू द्यावे!

https://m. facebook. com/story. php?story_fbid=6801541356538935&id=100000494153962&mibextid=Nif5oz

https://photos. app. goo. gl/Gtgj1jNfVn139nTJ6

https://fb. watch/kM4CvBc5Jo/?mibextid=RUbZ1f

Instagram: https://www. instagram. com/reel/Cq7Uvs1rT98/?igshid=YmMyMTA2M2Y=

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments