सुश्री विनिता तेलंग
इंद्रधनुष्य
☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-1 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆
एक होता राजा.अश्वपती त्याचं नाव.
काळ ? महाभारताच्या पूर्वीचा.
राज्य ? मद्र देश.— म्हणजे सध्याचं जम्मू काश्मीर.
— या प्रदेशाला भारताचं मस्तक उगीच नाही म्हटलं जात. कश्यप ऋषींच्या तपश्चर्येची ही भूमी– पांडित्याची परंपरा असलेला प्रदेश. देशभरातून साधक ,तत्वचिंतक या प्रदेशात आले आणि हिमालयाच्या विशाल, प्रशांत पार्श्वभूमीवर त्यांनी जीवनविषयक चिंतन केले, सिद्धांत मांडले. ज्ञान विज्ञान कला साहित्य इथे बहरले.
आदि शंकराचार्यांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत थोर विभूतींनी इथे चिंतन केले.
त्या काळातील ज्ञानाच्या परंपरेला साजेसा राजा अश्वपती.वैयक्तिक सुखापेक्षा समाज,लोकहित याला प्राधान्य देणारा.राज्याच्या वैभवाला, सुख समृद्धीला आधार होता ते मद्रप्रदेशातील विख्यात, सुलक्षणी, ताकदवान अश्वांचा.मद्र देश उत्तम व प्रशिक्षित अश्व अन्य राज्यांना युद्धाकरता पुरवत असे.या वैभवाला कोंदण होते ते सत्शील व धर्मपरायण अश्वपतीच्या पराक्रमाचे.
पण राजा होता निपुत्रिक.त्या काळच्या पद्धतीनुसार म्हणा किंवा त्या परिभाषेनुसार म्हणा,त्यानं पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. इथे आपण कुचेष्टेने हसतो !यज्ञाने का कुठे मुलं होतात, म्हणून.
पण यज्ञ म्हणजे तरी काय ? एखादे ध्येय साध्य करण्या करता केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा.दिवसरात्र त्या ध्येयाचा ध्यास आणि त्या करता शक्य ते सर्व करणे.आहुती द्यायची आपल्या कष्टांची,त्या ध्येयप्राप्तीकरता त्यागाव्या लागणाऱ्या सुखांची.मन एकाग्र करायचं त्या एकाच विचारावर, आणि त्या करता मदत घ्यायची एखाद्या मंत्राची.मानवी प्रयत्न अपुरे असतात याची नम्र जाणीव ठेवून विश्वातल्या चैतन्याला आवाहन करायचं .
अश्वपतीने तेच केलं.विश्वातील शाश्वत सत्य म्हणजे सूर्य.त्याची आराधना करायची.त्याकरता त्यानं गायत्री मंत्राचं अनुष्ठान मांडलं.दररोज एक लाख मंत्र जपायचा.आता हे एकट्यानं शक्य आहे का ? तर नाही .पण त्या करता त्यानं अन्य सत्प्रवृत्त लोकांची मदत घेतली.राजा स्वतः कठोर बंधने पाळत असे.तीन दिवसातून एकदा अन्न ग्रहण करे.असं किती काळ ? अठरा वर्षं केलं.राजाचं देहबल,मनोबल,तपोबल आणि इच्छाबळ किती वाढलं असेल !
अखेर या साधनेचं फळ मिळायची वेळ आली.त्याला विश्वमाता प्रसन्न झाली.पण ती म्हणाली, तुझ्या भाग्यात ब्रह्मदेवानं पुत्रयोग लिहिलेला नाही.तुला कन्या होऊ शकते. अश्वपती म्हणाला, तर मग तूच माझ्या पोटी जन्माला ये.राजाचं अजून एक वेगळेपण हे की त्याला अशा संतानाची इच्छा होती जो मानववंशाला सत्याचा मार्ग दाखवेल.तो दिव्य संतान मागत होता ते विश्वकल्याणाची कामना धरून.
आणि मग अशा कठोर प्रयत्नांच्या आणि विशाल हेतूच्या पोटी जन्मली सावित्री!तिला जन्म दिला अश्वपतीची देखणी आणि समंजस राणी मालवी हिनं.राजा राणीनं तिला अत्यंत मुक्त, निर्भर वातावरणात वाढवली.
तिचं उपनयन करून तिला गुरूगृही पाठवली.तिला सर्व प्रकारच्या विद्या,
कला यात पारंगत केली.अत्यंत देखणी,अतिशय बुद्धिमान,कलासक्त, विलक्षण तेजस्वी मनस्वी अशी ही कन्या.हिचं बुद्धिवैभव आणि स्व-तंत्र विचार पेलणारा कुणी युवक राजाला मिळेना.तिच्या विवाहाची चिंता त्याला लागली..
राजानं एक अतिशय धाडसी पाऊल उचललं.सावित्रीला एक सुसज्ज रथ दिला आणि सांगितलं की जा,आणि तुला सुयोग्य असा पती तूच शोध.सावित्री निघाली.किती सुंदर असेल तिचा हा प्रवास !हे काही पर्यटन नव्हते.राजाने विचारपूर्वक दिलेले स्वातंत्र्य,दिलेली संधी होती.सावित्रीच्या वर संशोधना आधी तिला या प्रवासात आत्मशोध घ्यायचा होता.आपण कोण आहोत,जगात काय चालू आहे,आपल्याला भावी आयुष्यात काय साध्य करायचं आहे आणि त्या करता आपल्याला कसा जोडीदार हवा याचं चिंतन तिनं केलं.
ती आसपासच्या राज्यांत गेली.
राजवाड्यांत गेली.तिच्या रूपानं मोहित होणारे देखणे, बलदंड पण अहंकारी राजपुत्र तिला भेटले.तिच्या संपन्न पार्श्वभूमीवर भाळलेले आणि तिच्याकडून निव्वळ देहिक सुखाच्या अपेक्षा करणारे राजपुत्र तिनं पहिले.काही सत्शील पण क्षात्र तेजाचा अभाव असलेले तर काही इतके सत्वहीन की हिच्या दृष्टीला दृष्टीही भिडवू शकले नाहीत.
ती गावात गेली. राबणारे श्रमसाधक तिनं पाहिले,ती आश्रमांत गेली तिथे तिनं अनेक ज्ञान साधक पहिले..तिला आस होती ती सर्वगुणसंपन्न परिपूर्ण पुरुषाची.जो बुद्धी, बळ, ज्ञान, रूप, गुणसंपन्न असेल.. आपलं कर्तृत्व आणि पुरुषार्थ यांसह तिची स्वप्नं जपणारा तिला समान आदर देणारा असेल..जो जीवनाचा अर्थ जाणत असेल, या विश्वनाट्यातील आपली भूमिका समजून निसर्ग आणि भौतिक सुखाचं संतुलन करणारा असेल, जो स्पर्धा, युध्द यापेक्षा संवाद,सहयोग यावर विश्वास ठेवत असेल, जो मनुष्यत्वाला, साहचर्याला, सहजीवनाला पुढच्या पायरीवर नेईल असा जोडीदार..
अश्वपतीचीच लेक ती ! प्रयत्न थोडेच सोडणार !
कुठेही असा परिपूर्ण युवक तिला भेटला नाही म्हणून ती थेट अरण्यात गेली.जिथे तिचे वनबांधव रहात,
जिथल्या जटिल रानातल्या एकाकी स्थानांवर ऋषी तपश्चर्या करत, अशा वनात.तिथे तिला तो भेटला .तिच्या मनातला पुरुषोत्तम,सत्यवान.शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याचा एकुलता..देखणा-तेजस्वी-बलदंड पण हळुवार अन सच्च्या मनाचा. वनासारखा निर्मळ, शांत, निष्पाप.अहंकारविहीन,नम्र सौम्य बोलणारा.पढतपोपट नाही तर अनुभवश्रीमंत असणारा.वल्कले नेसून वनातील आश्रमात आपल्या मातापित्या सोबत रहाणारा.दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.एकमेकांशी बोलले,एकमेकांना सर्वार्थानं जाणून घेतलं, सावित्रीला सत्यवान त्याच्या आश्रमीय जीवनशैलीसह आवडला. तिनं त्याला मनोमन वरलं. दोघांनी गांधर्व विवाह केला आणि मग सावित्री परतली,आपल्या पित्याला हे सांगायला, की मला माझा जीवनसाथी मिळाला आहे.
ती आनंदाने, उत्साहाने परत आली तेव्हा अश्वपती-मालवी दोघे नारदमुनींशी बोलत बसले होते.तिचा चेहरा पाहूनच सर्वांनी काय ते ओळखले! तिनं सत्यवानाविषयी भरभरून सांगितलं. राज्यातून निष्कासित झालेला शाल्वराज द्युमत्सेन आणि शैब्या यांचा सद्गुणी पुत्र सत्यवान.. अश्वांचे जिवंत पुतळे बनवणारा सत्यवान.. देखणा व आरोग्यसंपन्न सत्यवान ..
राजा राणी ने सहज नारदमुनींना विचारले की हा युवक तुम्हाला सावित्रीच्या योग्य वाटतो का ? तुम्ही याला ओळखता का? याच्यासोबत आमच्या गुणवती पण मनस्वी कन्येचा संसार सुखाचा होईल का ?
नारद म्हणाले की याच्यासारखा जामात तुम्हाला त्रिभुवन शोधूनही मिळणार नाही.मात्र याच्यात एकच वैगुण्य आहे ते म्हणजे याचे आयुर्मान केवळ एक वर्ष इतकेच उरले आहे.
राजाराणीने सावित्रीला समजावले की याचा मोह सोड आणि पुन्हा वरसंशोधनास जा.पण सावित्री ठाम होती .ती म्हणाली, मी याला तन-मन-अंतःकरणपूर्वक निवडला आहे. माझी बुद्धी, तर्क आणि संवेदना याच्याचकडे धाव घेत आहेत. मी आता माझा निर्णय बदलणार नाही. राहिले दैव, तर मी क्षात्रकन्या आहे. मी जीवनाशीच काय, मृत्यूशीही झुंजेन ! माझ्यावर विश्वास ठेवा .
— क्रमशः भाग पहिला
© सुश्री विनिता तेलंग
सांगली.
मो ९८९०९२८४११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈