सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “चला पंढरीला जाऊ…!!!” ☆ सौ राधिका भांडारकर 

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्त दर्शनासाठी पंढरपूरास पायी जातात. पंढरपूरची वारी करणारे ते वारकरी आणि त्यांचा ‘वारकरी’ हा संप्रदाय. या संप्रदायात वर्ण जात धर्म याचा भेद नाही. सर्वसमावेशक असा हा संप्रदाय. आणि पंढरपूरच्या या पदयात्रेत भक्तगणांचा ऊत्स्फूर्त सहभाग असतो. ऊन, पाऊस, वारा, कशाचीही पर्वा न करता या आनंद सोहळ्यात, लहानथोर, रंकराव, सारे एकात्म भावनेने सामील होतात. कपाळी बुक्का, गळ्यात तुळशीमाळ, हरिपाठाचे पूजन,सात्विक आहार, ही वारकर्‍यांची ओळख. 

वारीची ही परंपरा ज्ञानेश्वर महाराजांच्या वडीलांपासून आहे. पुढे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानेश्वरांनी समाजसंघटनेचा पाया रचला आणि संत तुकाराम, नामदेव यांनी ती धुरा वाहिली.

पंढरपूर हे वारकर्‍यांचे तीर्थस्थान. भीमा तीरावरचे पावन क्षेत्र. आषाढी एकादशीला आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका असलेली पालखी, आणि देहूहून संत तुकारामाची पालखी, दिंड्या पताकासहीत पंढरपूरास  पायी चालणार्‍या प्रचंड जनसमुदायासवे येतात. विठोबाच्या दर्शनाचा एक अपूर्व ,लोभसवाणा सोहळा घडतो. दुथडी भरून वाहणार्‍या चंद्रभागेत स्नानाचे महात्म्यही अपार..

पावसाच्या अमृतधारांत ,ग्यानबा तुकारामाच्या गजरात, टाळ मुृदुंगाच्या वाद्यवृंदात, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन चाललेली बाया बापड्यांची ,भक्तीरसात नाहून निघालेली वारी एखाद्या पांगळ्या पायात सुद्धा शक्ती निर्माण करते. या वारीत ,रिंगण, झिम्मा ,फुगड्या असे ऊर्जादायी खेळही असतात. ठिकठिकाणच्या स्वयंसेवी संघटना वारकर्‍यांच्या सुविधासाठी झटतात.

श्रद्धा आणि धार्मिकता म्हणजे परंपरा. पण पंढरीची वारी-परंपरा सांकेतिक आहे. समाजाचं एकत्रीकरण हा ध्यास आहे. विषमता निवारण हा सारांश आहे. पांडुरंग ही अशी सगुण शक्ती आहे की जी भेदाभेदाची मुळे उखडते…..  परब्रह्माला घेउन विवेकाच्या दिशेने होणारी वाटचाल म्हणजे वारी…पायी वारी..

वारी वारी जन्म मरणाते वारी

हारी पडलो आता संकट निवारी..

     विठ्ठला मायबापा, तुझ्या दर्शनासी आतुरलो

     भेट घडण्या पंढरपुरी आलो,,,,

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments