सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ II विठ्ठलनामाचा रे टाहो II ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

।। परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ।। 

ज्येष्ठ अर्धा सरलाय ,आकाशात ढगांची जमवाजमव सुरु झालीय ..या दिवसात आकाशात मळभ दाटून येतं पण मराठी मन मात्र मरगळ झटकून एका निराळ्याच चैतन्ययात्रेची वाट पहात असतं.त्याला आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचं असतं.शतकानुशतकं ही चैतन्यदायी परंपरा मराठी माणसानं जिवंत ठेवली .

कदाचित पंढरपूरची वाट चालून आमची पावलं प्रत्यक्ष मळणार नाहीत ,पण मनं अबीर गुलालानं रंगल्याशिवाय कशी रहातील ? मग वाटतं की पांडुरंगाच्या भेटीकरता निदान मानसवारी करु ! मनाच्या वाटेवर ओव्यांचं शिंपण घालू ,कवितांच्या रांगोळ्यांनी नटवू ,आरत्यांचे दीप लावू , चित्रगीतांच्या पताका उभारु आणि लोकगीतांनी ती वाट दुमदुमवून टाकू ! 

या वाटेवरुनच पोचायचं मनगाभार्‍यात आणि तिथं विराजत असलेल्या त्या श्रीमूर्तीचं दर्शन घ्यायचं अंतःचक्षूंनी ..तो आपली वाट पहातोच आहे ..

अनेक संतांनी विठ्ठलाच्या योगमूर्तीचं वर्णन करणाऱ्या सुंदर रचना केल्यात.

ही परंपरा किती जुनी? सातव्या आठव्या शतकात भारतभ्रमण करताना आदि शंकराचार्य भीमेच्या तटावर आले असतील.. या भूमीवर आल्यावर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर महायोगपीठ असल्याची जाणीव त्यांना झाली असेल..आणि मग त्या योगिराजाचं सगुण दर्शन झाल्यावर त्याचं वर्णन करणारं हे नितांतसुंदर पांडुरंगाष्टक त्यांच्या अमृतवाणीतून झरलं असेल..

॥ परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ॥

महायोगपीठे तटे भीमरथ्या        

वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।        

समागत्य निष्ठन्तमानंदकंदं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥        

 

तटिद्वाससं नीलमेघावभासं        

रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।        

वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥

 

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां        

नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।        

विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥

 

स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे        

श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।        

शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥

 

शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं        

लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।        

जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥

 

किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं        

सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।        

त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥

 

विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं        

स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।        

गवां बृन्दकानन्ददं चारुहासं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ७ ॥

 

अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनं तं        

परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।        

प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ८ ॥

 

स्तवं पाण्डुरंगस्य वै पुण्यदं ये        

पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।        

भवांभोनिधिं ते वितीर्त्वान्तकाले        

हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

 

भीमेच्या तीरावर आहे ते पंढरीचं महायोगपीठ ! 

तिथं पुंडलिकाच्या भेटीकरता तो आनंदकंद युगानुयुगं उभाच आहे ! त्या भक्तवत्सलास नमस्कार ! 

सजल श्यामवर्णी मेघातून वीज चमकावी तसं त्याचं तेज , रमेच्या हृदयात विराजमान होणारं त्याचं चित्तप्रसादक रुप ,त्याचे नेटके समचरण ,यानं जे नेत्रसुख होतं ,त्यापुढं स्वर्गही फिका पडेल ! त्या राजस सुकुमार मदनपुळ्यास वंदन ! 

तो कमरेवर हात ठेवून सांगतो आहे ,बघ जीवनाचा सागर माझ्या कमरेइतकाच खोल आहे ! माझ्या भक्ताला मी सहज त्यापार पोचवतो ..अन् तिथून केवळ चार बोटांवर ब्रह्मलोक ,असं नाभीकडे बोटं करुन सहज दाखवतो आहे, त्या दयानिधीस नमन ! 

कंठात झळाळता कौस्तुभमणी ,भुजांवर केयूरबंध ,शिरी धरलेलं शिवलिंग नि हृदयात लक्ष्मीचा वास असं हे रमणीय रूप ! शारदीय पौर्णिमेसारख्या तेजाळ सुहास्य मुखचंद्रावर कुंडलांची रत्नप्रभा फांकलेली, सूर्यबिंबासम रक्तवर्णी असलेल्या जास्वंदीसारखे त्याचे अधर ,आणि ते आकर्ण कमलनयन ! 

त्याच्या हिर्‍याचा झळाळत्या मुकुटानं आसमंत तेजाळला आहे ,त्याला पुजण्याला देवही हाती रत्नमाला घेऊन उभे आहेत .तीन जागी वाकून उभा राहिल्यानं अन गळ्यात वनमाळा नि मुकुटात मोरपीस ल्यायल्यामुळं तो बाळकृष्णच शोभतो आहे ..

ह‍ाच लीलानाटकी सर्वसंचारी गोपालक .. हाच वेणूचा नाद ,हाच वादक .गोपगोपींना मोहक हास्यानं वेड लावणारा हाच ! याला ना आदि ना अंत,

हा अजन्मा -अजर -अमर -अनुपम -अद्वितीय !

हा दीनबंधू ,हा कृपासिंधू . हे रुक्मिणीचे चित्सुखधाम ,हा जगताचा विश्राम .

याच्या केवळ दर्शनानंच मोक्षाचा लाभ होतो .

या परब्रह्मलिंगाच्या उपासनेचं हे स्तोत्र  आपल्या वाणीवर कानावर आणि मनावर संस्कार करतं.शक्य तर हे मुखोद्गत करावं, निदान काही निमित्ताने ठरवून ऐकावं आणि अपार प्रसन्नतेची अनुभूती घ्यावी!

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments