सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ गोष्ट यूझर मॅन्युअलची… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

अखेर तो धावपळीचा, उत्साहाचा दिवस उजाडतो. हातात असलेल्या कॅमेराची बॅग सांभाळत मी त्या स्टुडिओवजा रूममध्ये जाते. तिथे जणू सिनची तयारी सुरू असते. दिग्दर्शक आणि कथा लेखक त्या सीन लावणाऱ्यांना भरपूर सूचना करत असतात. त्यात बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून ठाकठूकचा आवाज, मध्येच कुठे पडदा जोराने झटकल्याचा, जोरात टेबल सरकवल्याचा आवाज हे वातावरण निर्मितीत मोलाची भर घालत असतात. या सगळ्या तालामध्ये मीही अगदी एकतानतेनं कॅमेराची बॅग उघडून तो सेट करायला लागते.

वर्षातून किमान तीन-चारदा तरी हे काम करावे लागत असल्याने सगळ्यांचे हात सरावलेले असतात. नजरसुद्धा हळूहळू सरावायला लागलेली असते. तर कॅमेराचा स्टॅन्ड, त्याची योग्य पोझिशन, त्याची निरनिराळी सेटिंग्ज इकडे माझं लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि मग एकदा मनासारखं सेटिंग झाल्यावर हळुवार हाताने त्या कुशनमधून अलगद कॅमेरा बाहेर काढला जातो. आणि मग स्टॅन्डवर त्याला स्थानापन्न करण्याचा सोहळा सुरू होतो. कॅमेरा जणू त्या दिवशी राजाच्या थाटात असतो. त्याचा रुबाब काय वर्णावा… खरंतर तो ही एक अप्रत्यक्ष दिग्दर्शकच आहे की आजचा. म्हणून त्याचाही मूड सांभाळावा लागतो. जरासा सुद्धा सेटिंग्ज मधला ढिलेपणा त्याला चालत नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष एकदा माझ्याकडे आणि एकदा कॅमेराकडे लागलेलं असतं. कारण सीन मधला कॅमेरा सेट करणं हा आमच्यासाठी शेवटचा पण महत्त्वाचा भाग असतो.

सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि आम्हा दोघांच्या म्हणजे मी आणि कॅमेराच्या दृष्टिकोनातून ‘परफेक्ट व्ह्यू’ सेट झाला की मी जरा रिलॅक्स होते. आणि मग आपोआपच माझी नजर विंगेतून जणू लपूनछपून पाहणाऱ्या आजच्या विशेष कलाकारांकडे म्हणजेच पॅकिंगमधून हळूच वर डोकावणाऱ्या प्रॉडक्ट्सकडे जाते. दृष्ट लागण्यासारखं रुपडं असतं त्यांचं आज ! तुकतुकीत अंगकांती असलेल्या आणि आपल्या काळ्याकरड्या पोशाखात उठून दिसणाऱ्या या प्रॉंडक्टसवर आज विशेष पॉलिश्ड झळाळी असते. त्यांचा नवथरपणा जाणवत असतो.

आता प्रमुख दिग्दर्शक सगळी सूत्रं आपल्या हातात घेतो. त्यातल्या एकेका प्रॉंडक्टला हळूहळू त्याच्या त्याच्या नियोजित जागेवर सेट केलं जातं. ते करताना प्रत्येकाची एनर्जी लेवल चेक केली जाते. सगळी फंक्शन्स व्यवस्थित होतायत ना, जर त्या प्रॉंडक्टला अटॅचमेंट असतील तर त्यांचा शार्पनेस व्यवस्थित आहे ना. वगैरे वगैरे…… 

….. आणि मग ऑल ओके आहे हे सगळ्यांच्याच नजरेतून चेक केलं जातं. मग लाईटचा फोकस्ड अभिनय सुरू होतो. कधी मंद, कधी तीव्र, कधी वरून, कधी खालून आणि मग प्रत्येक सीननुसार योग्य असणारं त्याचं सेटिंग ठरवलं जातं. ते करताना रिफ्लेक्शन तर पडत नाहीये ना, शॅडो ओव्हरलॅप होतं नाहीयेना हे कळीचे मुद्दे विचारात घेतले जातात. आणि मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की अॅक्शन असं म्हणून फायनल कामाला म्हणजेच फोटोग्राफीला सुरुवात होते. जिच्यासाठी हा सगळा जामानिमा झालेला असतो आणि जी सलग काही तास चालते.

तर मंडळी, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की हे काही सिनेमा-नाटक इ.बाबतच वर्णन नाहीये… पण दिग्दर्शक, सिन, कथानक, कॅमेरा, स्टुडिओ हे शब्द तर आलेत. मग नक्की आहे तरी काय हे….. 

… तर मंडळी, ही आहे एका प्रोडक्टच्या यूझर मॅन्युअलच्या, म्हणजेच इन्स्ट्रक्शन मॅन्युअलच्या निर्मितीची तयारी… आपण एखादी छोटीशी वस्तू किंवा मशीन विकत घेतलं की त्याच्यासोबतच एक छोटीशी पुस्तिका आपल्याला मोफत मिळते. जर ती वस्तू महागाची असेल आणि वापरण्यासाठी आपल्याला सवयीची नसेल तर आपण ती उघडून बघतो. त्यात काही चित्रं दिलेली असतात. काही सूचना दिलेल्या असतात‌, त्या वाचतो आणि त्याप्रमाणे आपण ती वस्तू वापरायला सुरुवात करतो.  त्यात काही बिघाड झाले असतील तर काय करायचं, वस्तू वापरून झाल्यावर कशी ठेवायची, कुठे ठेवायची, वापरण्यासाठीसुद्धा ती कशा ठिकाणी ठेवली गेली पाहिजे, काय क्रमाने ती इन्स्टॉल (रचली) केली गेली पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यात सांगितलेल्या असतात. आपल्यासाठी तर या गोष्टी खिजगणतीतही नसतात.

पण हीच प्रॉडक्ट्स जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी वापरली जाणार असतात, उदाहरणार्थ मेडिकल सर्जरी… तेव्हा त्यांच्या निर्मितीनंतर त्यांच्या वापरण्याबाबत काटेकोरपणे सूचना द्याव्या लागतात. आणि वापरणारे त्या पाळतातही.  म्हणूनच गरज असते निर्दोष आणि अचूक अशा युझर मॅन्युअलची. ही युझर मॅन्युअल्स उत्कृष्ट असणं हे देखील त्या प्रॉडक्ट्सचं एक वैशिष्ट्य असतं जे त्याला उत्कृष्ट निर्मितीचा दर्जा देण्यामध्ये सहाय्यभूत ठरतं.  अशी ही यूझर मॅन्युअल्स तयार करण्याचं काम  ग्राफिक डिझायनर म्हणून काही वर्षांपूर्वी मी अनेकदा केलं आहे. पण हे सगळं आज सांगण्याचं प्रयोजन काय… तर २७ एप्रिल हा आहे ‘वर्ल्ड ग्राफिक्स डे’!

आणि वर वर्णिलेल्या फोटोग्राफीपासून पुढे त्याचं युझर मॅन्युअलमध्ये रूपांतर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरणारं काम म्हणजे ग्राफिक्स डिझाईन. याच्यासाठी ग्राफिक्स डिझायनर आपलं कौशल्य पणाला लावतो. तो या सगळ्या फोटोंवरून काही ठराविक फोटो निवडून क्रमवार पद्धतीने एक कथा तयार करतो जी दिग्दर्शकांच्या कथेशी मिळतीजुळती असते. त्यावरून वेगवेगळ्या ग्राफिक डिझाईनच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने या सगळ्या फोटोंचं ग्राफिक्समध्ये रूपांतर करतो‌. आणि मग त्यात तज्ज्ञ व्यक्तींच्या योग्य सूचना, तसंच ते बनवणारे कुशल इंजिनियर्स यांच्याकडील माहिती एकत्रित करून पुढे एडिटिंग, प्रूफ रीडिंग इ. आणखीन बऱ्याच प्रक्रिया होऊन हे युझर मॅन्युअल / इन्स्ट्रक्शन मॅन्युअल तयार होतं‌. ज्याच्याकडे काही अपवाद वगळता जास्त गांभीर्याने पाहिलं जात नाही.

प्रत्येक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असंच केलं जातं का… माहित नाही.  ते प्रॉडक्ट्सनुसार नक्कीच बदलतं.  आता तर आणखीन सॉफ्टवेअर्सही अपडेट झाल्यामुळे याचीही पद्धत बदललेली असू शकते. पण ग्राफिक्स, त्याचे डिझाईनिंग, त्यासाठी लागणारे विचार आणि इमॅजिनेशन या गोष्टी मात्र तशाच असतील. सुंदरता, उपयुक्तता, सुलभता आणि नाविन्यता या चार गोष्टी आज आपल्या जगण्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आणि हे सगळं सहज साध्य होत आहे त्यात एक वाटा ग्राफिक्स डिझाईनचाही आहे, हे महत्त्वाचं ! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments