श्री विश्वास विष्णु देशपांडे

? विविधा ?

☆ ब्रायटनची ब्राईट कहाणी… ! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

युद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक भारतात असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. ते आपले कर्तव्यही आहे. भारतात युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक नुकतेच इंडिया गेटजवळ बांधण्यात आले आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मारक कारगिलजवळ द्रास या ठिकाणी आहे. आपले कुटुंब, सणवार सगळं सगळं बाजूला ठेवून कोणत्याही देशाचे सैनिक प्रतिकूल परिस्थितीही आपले कर्तव्य बजावत असतात. या सैनिकांचा सन्मान करणे, त्यांच्या प्रति कृतज्ञ राहणे हे सरकारचे आणि आपलेही परम कर्तव्य आहे. भावी पिढीला त्यांच्या त्यागापासून प्रेरणा मिळावी हाही एक त्यामागील उद्देश असतो.

पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की पहिल्या महायुद्धात इंग्लंडसाठी लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे एक अतिशय सुंदर स्मारक इंगलंडमधील ब्रायटन या शहराजवळ आहे. इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी हे स्मारक आहे अशा ब्रायटन गावाची आधी आपण थोडक्यात माहिती घेऊ. ब्रायटन हे इंग्लंडच्या दक्षिणेला समुद्रकिनारी वसलेले एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव. ब्रिटिशांसाठी एक पर्यटन केंद्रच ! आपल्याकडील महाबळेश्वर, माथेरान, पाचगणीची आठवण यावी अगदी तसे. इंग्लंडमधील उमराव, सरदार, उद्योगपती आणि श्रीमंत लोक यांचे या ठिकाणी बंगले. ते सुटी घालवण्यासाठी या ठिकाणी येत. याच ठिकाणी इंग्लंडचा  राजपुत्र असलेल्या चौथ्या जॉर्जने एक बंगला विकत घेतला. हा बंगला आणि त्याचा परिसर अतिशय  विस्तीर्ण होता. कलेची आवड असणाऱ्या जॉर्जने या बंगल्याचा कायापालट केला. बाहेरून भारतीय वास्तुकलेचा आणि आतून चिनी सजावटीचा हा बंगला एक उत्कृष्ट नमुना बनला. या बंगल्याचे नाव मरीन पॅव्हिलियन असे पडले. पुढे हा बंगला ब्रायटनच्या स्थानिक पालिकेने इंग्लंडच्या राजाकडून चक्क विकत घेतला.

एकोणिसाव्या शतकात युरोपातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बिघडत गेली. वातावरण ढवळून निघाले. ऑस्ट्रियन-हंगेरीचा सम्राट फर्डिनांड आणि त्याची गरोदर पत्नी यांची हत्या झाली आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. इंग्लंड, फ्रांस, रशिया, जर्मनी आणि दोस्त राष्टे असे गट युरोपात तयार झाले. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध दंड ठोकले. जर्मनीने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला, तर रशिया सर्बियाच्या बाजूने रणांगणात उतरला. लवकरच फ्रान्सने रशियाला आपला पाठिंबा जाहीर केला आणि लष्करी हालचाली मोठ्या वेगाने सुरू केल्या. जर्मन फौजा बेल्जियममार्गे फ्रान्सपर्यंत येऊन धडकल्या आणि मग फ्रान्सचे दोस्त राष्ट्र इंग्लंडसुद्धा या युद्धात सामील झाले.

आतापर्यंत ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशी प्रतिमा असलेल्या इंग्लंडला जेव्हा प्रत्यक्ष युद्धात उतरावे लागले तेव्हा त्यांची खरी पंचाईत झाली. युद्धात सहभागी होण्यासाठी पुरेसे सैन्य इंग्लंडकडे नव्हते. सैन्यात नवीन भरती करून प्रशिक्षण देणेही त्यांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीत भारत हा देश म्हणजे इंग्लंडच्या हातात असलेला हुकमी एक्का होता. भारतीय सैन्याची मदत मिळवण्यासाठी इंग्लंडने एक धूर्त चाल खेळली. पहिल्या महायुद्धात आपल्याला मदत केली तर आपण भारताला स्वायत्तता देऊ असे ब्रिटिशांनी जाहीर केले आणि लाखो भारतीय सैनिक इंग्लंडसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार झाले.

३० सप्टेंबर १९१४ ला भारतीय सैनिकांची पहिली तुकडी फ्रान्समध्ये दाखल झाली. त्यानंतर यथावकाश आणखीही भारतीय सैन्याच्या तुकडया दाखल झाल्या. फ्रान्स आणि बेल्जीयमच्या आघाड्यांवर जर्मन सैनिकांशी प्राणपणाने लढू लागल्या. वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. हाडे गोठवणारी थंडी होती. अंगावर पुरेसे गरम कपडे नव्हते. खायला धड अन्न मिळत नव्हते. अशा वातावरणात भारतीय सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले. लाखो सैनिक धारातीर्थी पडले तर हजारो सैनिक जखमी झाले. या जखमी झालेल्या सैनिकांना परत भारतात पाठवणे शक्य नव्हते. फ्रान्स किंवा बेल्जीयममध्येही त्यांच्या उपचारासाठी काही सोय करणे शक्य नव्हते.अशा परिस्थितीत त्यांना इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या ब्रायटन या ठिकाणी ठेवण्याचे ठरले. हे ठिकाण युद्धभूमीपासून फार लांब नव्हते. शिवाय येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात या सैनिकांना लवकर बरे वाटेल असे इंग्रज सरकारला वाटले.

या सैनिकांच्या उपचारासाठी मोठया आणि सुयोग्य जागेची आवश्यकता होती. ब्रायटन येथे उपचार करायचे ठरले तेव्हा हा राजवाडा म्हणजेच मरीन पॅव्हिलियन हेच ठिकाण राज्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर आले. मग ताबडतोब येथील उंची फर्निचर आणि इतर सामान हलवून सैनिकांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली. जवळपास दोन हजार जखमी भारतीय सैनिकांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. यातील बरेचसे सैनिक उपचारांती बरे झाले. फक्त ५७ सैनिक अतिगंभीर जखमा किंवा आजारामुळे दगावले. या ठिकाणी भारतीय सैनिकांवर अनेक ब्रिटिश डॉक्टरांनी उपचार केले. भारतीय सैनिकांची व्यवस्था ब्रिटिशांनी अतिशय उत्तम ठेवली. हिंदू आणि शाकाहारी सैनिकांसाठी वेगळे स्वयंपाकघर, वेगळे आचारी यांची व्यवस्था त्यांनी केली. मुस्लिम सैनिकांसाठी स्वयंपाकाची वेगळी व्यवस्था होती. प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे जेवण मिळेल याची व्यवस्था केली गेली. भारतीय सैनिक या ठिकाणी उपचार घेत असताना स्थानिक इंग्रज लोक त्यांच्या भेटीसाठी येत. त्यांच्यासाठी भेटवस्तू आणत असत. या दरम्यान या स्थानिक इंग्रज लोकांमध्ये आणि भारतीय सैनिकांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध दृढ झाले.

स्थानिक लोकांबरोबरच या राजवाड्यातील रुग्णालयाला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची पत्नी मेरी यांनी २५ ऑगस्ट १९१५ रोजी भेट दिली. त्यांनी या शूर सैनिकांचा आपल्या हस्ते गौरव केला. जखमी झालेल्या सैनिकातील दहा सैनिकांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. या सैनिकातीलच एक असलेल्या हवालदार गगन सिंग याचा ‘ इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट ‘ हा पुरस्कार देऊन गौरव केला. या गगन सिंगचा पराक्रम पाहिल्यानंतर आपण स्तिमित होतो. मला तर त्याच्या पराक्रमाबद्दल वाचताना खिंडीत एकट्याने मुघल सैन्याशी लढणाऱ्या बाजी प्रभूंची आठवण झाली. गगन सिंग अत्यंत शूर सैनिक होता. त्याच्या हातात बंदूक असताना त्याने अनेक जर्मन सैनिकांना अचूक टिपले. पण दुर्दैवाने त्याच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या. पण या पठ्ठयाने हार मानली नाही. आपल्या बंदुकीला बेयोनेट लावून त्याने त्याच्या साहाय्याने आठ जर्मन सैनिकांना यमसदनी पाठवले. पुढे एक वेळ अशी आली की त्याच्या बंदुकीचे बेयोनेटही तुटले. तेव्हा तेथेच पडलेल्या एका जर्मन सैनिकाची तलवार उपसून त्याने युद्ध सुरूच ठेवले. या भयंकर धुमश्चक्रीत तो जबर जखमी झाला आणि रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. तरी तो दोन दिवस युद्धभूमीवरच पडून होता. शेवटी इतर सैनिकांनी त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी हलवले आणि नंतर रुग्णालयात दाखल केले. अशा सैनिकांची हकीगत वाचताना अक्षरशः थरारून जायला होते.

या दरम्यान जे सैनिक मृत झाले त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था ब्रिटिशांनी अतिशय चोख केली. हिंदू सैनिकांसाठी अग्निदहन करणे तसेच मुस्लिम सैनिकांसाठी दफनाची व्यवस्था करण्यात आली. जेथे या सैनिकांचा अंत्यसंस्कार करण्यात आला ते ठिकाण होते ब्रायटन जवळचे पॅचम नावाचे उपनगर. या ठिकाणी या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक इंग्रज सरकारतर्फे उभारण्यात आले. त्याला ‘ ब्रायटनची छत्री ‘ असे म्हटले जाते. छत्री हा शब्द इंग्रजांनी देखील स्वीकारला आहे. या स्मारकाच्या ठिकाणी नदीकाठी घाट असतो तसे गोल कट्टे आहेत. त्यावर ग्रॅनाईट बसवला आहे. देवळासारख्या मजबूत आणि रुंद खांबावर ही वास्तू उभी आहे. वरती सुंदर असा संगमरवरी घुमट आहे.

या स्मारकाचे उदघाटन पंचम जॉर्ज यांचे चिरंजीव प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी भारतीय सैनिकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ” ही लढाई कुठल्या कारणासाठी लढली जात आहे याची पुरेशी कल्पना नसताना आणि या कारणांशी तसा त्यांचा काही एक वैयक्तिक संबंध नसताना आपल्या भारतीय बंधूनी जो अतुलनीय त्याग केला, त्याची जाणीव भावी पिढयांना राहावी म्हणून हे स्मारक आम्ही कृतज्ञतापूर्वक उभारत आहोत. ” या छत्रीसमोर दरवर्षी ब्रिटिश शासनातर्फे मानवंदना दिली जाते. यावेळी तेथील मोठमोठे नेते, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी देखील उपस्थित राहतात. आपले भारतीय वीर या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहेत. त्यांच्या त्यागाचा यथायोग्य सन्मान ब्रिटिश सरकारतर्फे होतो. आपल्या देशाला इंग्रज पुढे स्वायत्तता देतील या आशेने हे सैनिकी पहिल्या महायुद्धात सामील झाले होते. आपले घरदार, देश, मुलेबाळे सोडून परक्या मुलखात येऊन त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. हे सगळे पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर आपले मस्तक आदराने झुकते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. या वीरांना सलाम !

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments