सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
इंद्रधनुष्य
☆ अर्वाचीन काळातील पंचकन्या… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
आपण प्रातःकालीन प्रार्थनेमध्ये पंचकन्यांचा उल्लेख करतो. त्यामध्ये अहिल्या, तारा, द्रौपदी, सीता, मंदोदरी, या पुराणकालीन स्त्रियांना वंदन करतो. या सर्वांचे ऐतिहासिक पौराणिक महत्त्व आपण जाणतो. इतिहासाचा विचार केला की अर्वाचीन काळातील जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरची राणी चन्नम्मा तसेच ताराराणी या पंचकन्या- पंचराण्या- मला आठवतात. या आदर्श असणाऱ्या स्त्रियांविषयी लिहावं असं मनात आलं, ते आज जिजाऊंची पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने !
आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला ललामभूत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिजाऊ या मातोश्री–आई कशी असावी याचे उत्तम उदाहरण इतिहासाने दिले आहे. शौर्य, धैर्य, सहनशीलता, मातृप्रेम या सर्व गुणांचा समुच्चय जिच्यात आढळतो ती जिजाऊ माउली ! तिने शिवबाला घडवलं ! रामायण, महाभारत डोळसपणे समजावून सांगितले. स्वधर्म, स्वराज्याचे बीज मनात रुजवले आणि सर्व संकटांना तोंड देऊन तिने आपल्या लाडक्या शिवबाला वाढवले. शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसातच जिजाऊ आईसाहेबांचे निधन झाले. त्यांच्या मनातील इप्सित कार्य पूर्ण झाले होते. शांतपणे त्या मृत्यूच्या स्वाधीन झाल्या. शिवरायांची आई ही महाराष्ट्राची कन्या, शहाजीराजांची पत्नी अशी लोकोत्तर स्त्री इतिहासात अमर झाली !
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ही दुसरी आदर्श राणी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी गावा- -जवळील लहानशा खेड्यात शिंदे घराण्यात त्यांचा जन्म १७२५ साली झाला. मल्हारराव होळकरांनी त्यांना सून म्हणून पसंत केले आणि त्यांच्या मुलाशी, खंडेरावांशी त्यांचे लग्न करून दिले. परंतु लग्नानंतर काही काळातच खंडेरावांचा मृत्यू झाला. त्यावेळी अहिल्याबाई सती जाण्यास निघाल्या. परंतु मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतर अहिल्याबाई लष्करी, मुलकी शिक्षण शिकल्या. मल्हाररावांचा विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला. पूर्व माळव्यातील जिल्हे त्यांच्या ताब्यात होते. पती, सासरे आणि मुलगा यांच्या निधनानंतर इंदोर सोडून त्यांनी महेश्वर येथे राजधानी हलवली. माळवा प्रांत सुखी समृद्ध कसा होईल याकडे लक्ष दिले. त्यांची न्यायव्यवस्था चोख होती. त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मोठ्या नद्यांवर घाट बांधले. धर्मशाळा उभ्या केल्या. पाण्याचे हौद, विहिरी यांची कामे तीर्थस्थळी करून दिली. होळकरांची दौलत सांभाळली.अशा ह्या पुण्यवान अहिल्याबाई होळकर यांचा १३ ऑगस्ट १७९५ रोजी मृत्यू झाला..
पुण्यवान राणी म्हणून गणली जाणारी तिसरी राणी म्हणजे राणी लक्ष्मीबाई ! एकोणिसाव्या शतकातील झाशी या संस्थानची लक्ष्मीबाई राणी होती. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्धच्या उठावात ती सहभागी होती. क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता होती ! सातारा जिल्ह्यातील मोरोपंत तांबे यांची लाडकी मुलगी मनकर्णिका ही राणी लक्ष्मीबाई म्हणून आपल्याला माहित आहे ! घोडेस्वारी करणे ही तिची आवड होती. युद्धशास्त्रामध्ये निपुण होती. थोर कर्तृत्व व नेतृत्व असणारी होती झाशीची राणी. पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या समाजाने दुर्लक्षित करू नये म्हणून ती पुरुषी पोशाखात वावरत असे. दामोदर हा लक्ष्मीबाईंचा दत्तक मुलगा होता. त्याच्यासह प्रशासन, सैन्य, कल्याणकारी कामे यांची राणीने चांगली व्यवस्था लावली. तात्या टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या सहकार्याने इंग्रजांशी युद्ध केले. अशी ही झाशीची राणी इंग्रजांशी युद्ध करताना मृत्युमुखी पडली.
स्वराज्य सौदामिनी ताराराणी ही या पंचराण्यांमधील चौथी राणी ! ही हंबीरराव मोहिते यांची कन्या होती. घोडे स्वारी, तलवारबाजी यामध्ये कुशल, असामान्य व्यक्तिमत्व असणारी,अशी ताराराणी ही राजाराम महाराजांची पत्नी होती ! संभाजीच्या वधानंतर राजाराम महाराजांनी कर्नाटकात जाताना महाराष्ट्राचा कारभार ताराराणीच्या हाती सोपवला. काही काळ बंद असणारी वतनदारी पद्धत ताराराणी यांनी सुरू केली.लोकोपयोगी कामे केली. राजाराम महाराजांच्या आज्ञेनुसार त्या गुप्तपणे जिंजीला पोहोचल्या आणि राजारामांसह महाराष्ट्रात आल्या. सततची दगदग, प्रवास यामुळे सिंहगडावर असताना राजारामाचा मृत्यू झाला. त्यानंतर ताराबाईंनी स्वतःच्या मुलाला- शिवाजीला राज्याभिषेक करवला. सरदारांच्या मदतीने औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. शत्रूच्या कैदेतून सुटून आल्यावर शाहू राजांनी सातारा येथे स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर ची गादी सांभाळली.. माणसे जपली, नव्याने जोडली. ताराबाईंचे कार्य खूप महान होते ! दहा डिसेंबर १७६१ रोजी ताराबाईंचा मृत्यू झाला. कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त म्हणतात…..
दिल्ली झाली दीनवाणी ! दिल्लीशाचे गेले पाणी ,
ताराबाई रामराणी, भद्रकाली कोपली !
अशी ही ताराराणी !
पंचराण्यांच्या मालिकेतील पाचवी राणी म्हणजे कित्तूरची राणी चन्नम्मा….
२३ ऑक्टोबर १७७८ रोजी बेळगाव जिल्ह्यातील कापशी गावी, राणी चन्नम्मांचा जन्म झाला. लहानपणापासून तिरंदाजी, अश्वारोहण, तलवारबाजी या मर्दानी खेळांची त्यांना आवड होती.. कित्तूरचे राजा मल्ल सज्जा देसाई यांच्याशी तिचा विवाह झाला. राजा आणि राजपुत्राच्या अकाली निधनानंतर तिच्या दत्तक पुत्राला तिने गादीवर बसवले. परंतु ब्रिटिशांनी हे दत्तक पुत्र नामंजूर केले व कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या राणीने स्वतःचे मोठे सैन्य उभे केले आणि कित्तूर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या इंग्रज कलेक्टर थॅकरला तिच्या सैन्याने मारले. पण हा लढा फार काळ चालला नाही. इंग्रजांनी तीन डिसेंबर १८२४ रोजी राणी चन्नम्माला पकडले. ब्रिटिशांविरुद्ध आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या राणीचा २१ फेब्रुवारी १८२८ रोजी मृत्यू झाला. आपल्या इतिहासातील ही एक महत्त्वाची राणी होती, जिने इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचा प्रयत्न केला !
अर्वाचीन काळाच्या इतिहासातील या पाच राण्या म्हणजे ‘ पंचकन्या ‘ आपल्याला नक्कीच गौरवास्पद आहेत !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
मो. 8087974168
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈