सौ. पुष्पा चिंतामण जोशी
इंद्रधनुष्य
☆ सेवाव्रती हळबे मावशी ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
सन १९८९. ‘बजाज फाउंडेशन पुरस्कार’ सोहळ्यासाठी बंगलोर (आता बंगलुरू)इथला सुंदर सजवलेला भव्य हॉल , हळुवार सुरांची वातावरण प्रसन्न करणारी मंद धून, फुलांची आकर्षक सजावट केलेले भले मोठे स्टेज, उंची वस्त्रांची सळसळ आणि अनेक भाषांमधील संमिश्र स्वर! अशा अनोख्या वातावरणात देश विदेशातील अनेक मान्यवर व्यक्तींच्या बरोबरीने, पांढऱ्यास्वच्छ सुती नऊवारी साडीतील मावशी म्हणजे इंदिराबाई हळबे स्टेजवर अवघडून बसल्या होत्या. थोड्यावेळाने घोषणा झाली.’आता महाराष्ट्रातील कोकण प्रांतातील देवरुख या अत्यंत दुर्गम खेडेगावात महिला आणि बाल कल्याणाच्या कार्यातील प्रशंसनीय योगदानाबद्दल श्रीमती इंदिराबाई हळबे यांना जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.’ सभागृहातील टाळ्यांचा कडकडाट मावशींच्या कानावर पडत होता. पण डोळे भरून आल्याने सारे अस्पष्ट दिसत होते. मावशी जुन्या आठवणींमध्ये हरवून गेल्या.
चंपावती खरे ही रत्नागिरी जिल्ह्यात एका लहानशा खेड्यात १९१३ साली जन्मलेली मुलगी. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे चौथीत असताना लग्न झाले. लग्नानंतर इंदिराबाई हळबे होऊन त्या मुंबईला आल्या.
१९२८ते१९३९ असा अकरा वर्षांचा संसार मावशींच्या वाट्याला आला. त्यातच त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला.नंतर थोड्याशा आजाराने त्यांच्या पतीचा मृत्यू झाला त्यावेळी त्या फक्त २५ वर्षांच्या होत्या. वेळेवर आणि योग्य औषधोपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाले होते. या दुःखातून बाहेर येण्यासाठी मावशी देवरुख इथे त्यांच्या बहिणीकडे, त्यांची सर्वात धाकटी मुलगी मीनाक्षी हिला घेऊन काही महिने राहिल्या.
राजा राममोहन राय यांच्या प्रखर लढ्यामुळे ब्रिटिशांनी सतीची परंपरा रद्द केली होती. तरीही विधवांच्या शापित जीवनाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला नव्हता.
देवरुख येथील शांत, निसर्गरम्य वातावरणात मावशींना थोडे मानसिक स्वास्थ्य मिळाले. शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देवरुख संपन्न होते. देवरुखला मावशींना अनेक विचारवंतांचे सहाय्य आणि मार्गदर्शन लाभले. पूज्य साने गुरुजींची भगवत गीतेवरील मार्गदर्शक व्याख्याने ऐकून त्यांनी आपले जीवन मानवतेच्या सेवेत व्यतीत करण्याचा संकल्प केला.
त्यांच्या सर्व आशा आता मीनाक्षीवर केंद्रित झाल्या होत्या. मीनाक्षीच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने मावशी मुंबईला परतल्या. डॉक्टर काशीबाई साठे यांच्याशी त्यांची कौटुंबिक मैत्री होती. मीनाक्षीलाही त्यांच्यासारखे डॉक्टर व्हायचे होते. दुर्दैवाने एका छोट्याशा आजाराचे निमित्त होऊन वयाच्या १३ व्या वर्षी मीनाक्षीचे अकस्मात निधन झाले.
या अंध:कारमय आयुष्याचा सामना करण्यासाठी मावशींनी नर्सिंगचा कोर्स करण्याचे ठरविले. त्यासाठी कमलाबाई होस्पेट यांच्या मातृसेवा संघ, नागपूर इथे प्रवेश मिळवून खूप मेहनतीने त्यांनी नर्सिंग कोर्स पूर्ण केला. तथाकथित समाज नियमांना न मानता मावशींनी हे धाडस केले होते. या वेगळ्या वाटेवरून चालण्याचा खंबीर निर्णय मावशींनी निश्चयाने अमलात आणला. देवरुख हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले. समाजाच्या जहरी टीकेला आपल्या कृतीतून उत्तर दिले.
मावशींनी जातपात, स्पृश्य- अस्पृश्य, धर्म असली कुठचीही बंधने मानली नाहीत .प्रसूतीमध्ये अडलेल्या बाईसाठी त्या उन्हापावसात, रात्री अपरात्री डोंगरवाटा तुडवीत मदतीला गेल्या. अनेक बालकांना सुखरूपपणे या जगात त्यांनी आणले. एवढेच नाही तर फसलेल्या कुमारीका, बाल विधवा यांनाही आपल्या छत्रछायेखाली घेतले. त्यांच्या मुलांचे पालकत्वही पत्करले. आजारी, अशक्त, अपंग, अनाथ मुलांच्या त्या आई झाल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख इथे त्यांनी उभारलेली ‘मातृमंदिर’ ही संस्था म्हणजे त्यांच्या कार्याची चालती बोलती ओळख आहे. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना मावशींनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देवरुखला एका गोठ्यात, दोन खाटांच्या सहाय्याने प्रसूती केंद्राची सुरुवात केली. आज त्यांचे कार्य एक सुसज्ज हॉस्पिटल, फिरता दवाखाना, रूग्ण वाहिका, निराधार बालकांसाठी गोकुळ अनाथालय, कृषी केंद्र, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, बचत गट, महिला सक्षमीकरण उपक्रम, आरोग्य केंद्र, बालवाड्या, पाळणाघरे असे वटवृक्षासारखे विस्तारले आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती, शिस्त आणि शुद्ध आचरण यांच्या बळावर समाजाला सावली आणि आधार देणारे अगणित उपक्रम त्यांनी राबविले. त्याचबरोबर अशा सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या तरुणाईच्या पिढ्या घडविल्या. या तरुणाईला त्यांनी पुरोगामी विचारांचे, विज्ञान निष्ठेचे आणि श्रमप्रतिष्ठेचे शिक्षण स्वकृतीतून दिले. अनेक सामाजिक चळवळींना हक्काचा निवारा दिला. खेड्यापाड्यातून आलेल्या, देवरुख महाविद्यालयात शिकणाऱ्या अनेक गरीब मुलांसाठी मावशींनी शेतावर मोफत होस्टेलची व्यवस्था केली. यातील अनेक मुलांना शेतावर, रुग्णालयात, मेडिकल स्टोअर, आयटीआय, पाणलोट प्रकल्प, कृषी प्रकल्प आदी विविध कार्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मनावर मूल्याधिष्ठित संस्कार केले.
१९९८ मध्ये मावशी गेल्यानंतर काही काळाने संस्थेच्या कार्याला विस्कळीतपणा आला होता .आज श्री अभिजीत हेगशेट्ये आणि त्यांचे अनेक तडफदार सहकारी यांच्यामुळे मातृमंदिर पुन्हा जोमाने कार्यरत झालेआहे. त्यांनी दिलेल्या संस्काराचा वारसा जिवंत आहे. याचे आत्ताचे उदाहरण म्हणजे कोविड काळात मातृमंदिरने शेकडो कोविडग्रस्तांसाठी ‘ऑक्सिजन आधार प्रकल्प’ उभारला आणि अनेक रूग्णांचे प्राण वाचविले.२०२१ च्या पुरामध्ये उध्वस्त झालेल्या कोकणवासियांना मातृमंदिरने पुढाकार घेऊन अनेक प्रकारची मदत केली. स्वच्छता अभियान राबविले.
देवरुख परिसरातील ६०-७० गावातील जनतेसाठी आता मातृमंदिर संस्थेतर्फे अद्ययावत सुविधा देणारे सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जात आहे. अनेक दानशूर लोकांनी मातृमंदिर संस्थेला आर्थिक मदत केली आहे.
समाजाचा पाया सुदृढ व्हावा म्हणून अनेक स्त्रियांनी तत्कालीन सामाजिक रुढी, जाचक निर्बंध दूर सारून स्वतःचे आयुष्य पणाला लावले. साहजिकच त्यांची वाट काट्याकुट्याची होती. शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय, कला, विज्ञान अशा अनेक क्षेत्रात या स्त्रियांनी भरीव योगदान दिले. त्या पायाचा दगड बनल्या म्हणून आजची स्त्री अनेक क्षेत्रात ताठ मानेने उभी राहू शकत आहे. अशा अनेक तेजस्वी तारकांमधील सन्माननीय हळबे मावशींना सहस्र प्रणाम 👏
–++++–
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈