श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ “गाढवाला सोडलंय? सांभाळा ! सावरा ! …” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
(एका इंग्लिश पोस्टवर आधारित)
एका गाढवाला झाडाला बांधले होते.
एका मूर्खाने काहीही विचार न करता ते सोडवले.
गाढव शेतात घुसले आणि जोरजोरात ओरडू लागले.
हे पाहून शेतकऱ्याच्या पत्नीने चिडून गाढवाला गोळ्या घालून ठार केले.
गाढवाचा मालक चिडला. त्याने शेतकऱ्याच्या पत्नीला गोळ्या घातल्या.
बायको मेलेली पाहून शेतकरी परत आला, त्याने जाऊन गाढवाच्या मालकाला गोळ्या घातल्या.
गाढवाच्या मालकाच्या पत्नीने आपल्या मुलांना जाऊन शेतकऱ्याचे घर जाळण्यास सांगितले.
पोरांनी संध्याकाळी उशिरा जाऊन आईची आज्ञा आनंदाने पार पाडली, त्यांना वाटले शेतकरीही घरासह जळाला असेल.
खेदाची गोष्ट म्हणजे तसे झाले नव्हते….. शेतकरी परत आला. तो एकटाच असल्याने त्याला असहाय्य वाटू लागले. त्याने आपले जाती बांधव एकत्र केले आणि त्यांना गाढवाच्या मालकाच्या जातीवरून आरोप करून चिथवले आणि त्यांनी गाढवाच्या मालकाच्या पत्नी आणि दोन मुलांना घरासह आग लावून जाळले.
मग गाढवाच्या मालकाचे जाती बांधव एकत्र झाले आणि त्यांनी शेतकऱ्याच्या जाति बांधवांना शिव्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही जातींमध्ये प्रचंड धुमश्चक्री आणि राडा झाला.
त्यानंतर ठिकठिकाणी जाती-जातींमध्ये व धर्माधर्मांमध्ये उद्रेक सुरू झाले.
खूपच मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक दंगे सुरू झाल्याने ते शमविण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले.
सैन्यबळ देशांतर्गत यादवीमध्ये गुंतलेले पाहून शत्रूने देशावर चाल केली…..
हे सर्व पाहून व्यथित झालेल्या एका साधूने त्या मूर्ख व्यक्तीला म्हटले, ” बघ तुझ्यामुळे देशावर किती मोठे संकट ओढवले !”
तो म्हणाला, ” मी काय केले ? मी फक्त गाढवाला सोडले.”
तो साधू म्हणाला, ” हो, पण, त्यावर सर्वांनी अविचाराने चुकीची प्रतिक्रिया दिली, कुणाचे तरी ऐकून कुणाला तरी दोषी ठरवले, आणि आपल्या मनातल्या भुताला सोडले.”
आता तरी तुम्हाला कळलं का?—- कुणीही काहीही करत नाही. कुणीतरी मूर्ख तुमच्यातील अहंकाराला चालना देऊन दुष्प्रवृत्तींना जागृत करतो…..
…… त्यामुळे पुढच्या वेळी प्रत्युत्तर देण्यापूर्वी, प्रतिक्रिया देण्यापूर्वी, तक्रार करण्यापूर्वी, दटावण्यापूर्वी किंवा सूड उगवण्यापूर्वी …… थांबा आणि विचार करा. काळजी घ्या…… कारण ….
…… अनेक वेळा कुणीतरी मूर्ख फक्त गाढवाला सोडतो.
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈