डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ गीत ऋग्वेद – मंडल : १ : ३० : ऋचा ११ ते १६— म राठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त ३० (इंद्र, अश्विनीकुमार, उषासूक्त)
देवता – १-१६ इंद्र; १७-१९ अश्विनीकुमार; २०-२२ उषा – ऋषी – शुनःशेप आजीगर्ति
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तिसाव्या सूक्तात एकंदर बावीस ऋचा आहेत. या सूक्तात शुनःशेप आजीगर्ति या ऋषींनी इंद्र, अश्विनीकुमार आणि उषा या देवतांना आवाहन केलेली असल्याने हे इंद्र-अश्विनीकुमार-उषासूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या सोळा ऋचा इंद्राला, सतरा ते एकोणीस या ऋचा अश्विनिकुमारांना आणि वीस ते बावीस या ऋचा उषा देवातेला आवाहन करतात.
या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी इंद्र देवतेला उद्देशून रचलेल्या अकरा ते सोळा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
अ॒स्माकं॑ शि॒प्रिणी॑नां॒ सोम॑पाः सोम॒पाव्ना॑म् । सखे॑ वज्रि॒न्सखी॑नाम् ॥ ११ ॥
अमुचा अमुच्या सहचारीणींचा तू हितकर्ता
आम्हा पाठी सदैव असशी होऊनिया तू भर्ता
तुला आवडे सोमरसाचे करण्याला प्राशन
वज्रधारी देवेंद्रा तुजला सोमाचे अर्पण ||११||
☆
तथा॒ तद॑स्तु सोमपाः॒ सखे॑ वज्रि॒न्तथा॑ कृणु । यथा॑ त उ॒श्मसी॒ष्टये॑ ॥ १२ ॥
वज्रधारी हे देवेंद्रा रे तू अमुचा मित्र
तुझ्या कृपेचे सदा असू दे अमुच्यावर छत्र
प्रसन्न होउनि देई आम्हा शाश्वत वरदान
अभिलाषा ना असावी दुजी इंद्रकृपेवीण ||१२||
☆
रे॒वती॑र्नः सध॒माद॒ इंद्रे॑ सन्तु तु॒विवा॑जाः । क्षु॒मन्तः॒ याभि॒र्मदे॑म ॥ १३ ॥
अमुच्या सहवासे इंद्राला परम मोद व्हावा
दिव्य वैभवाचा आम्हाला लाभ सदैव व्हावा
जलधिसारखी अमुची असुदे समृद्धी परिपूर्ण
या सामर्थ्ये आम्हा व्हावा अतुल्य परमानंद ||१३||
☆
आ घ॒ त्वावा॒न्त्मना॒प्तः स्तो॒तृभ्यो॑ धृष्णविया॒नः । ऋ॒णोरक्षं॒ न च॒क्र्योः ॥ १४ ॥
चंडप्रतापी हे देवेंद्रा तुला सर्व मान
अनुपम तू रे अन्य तुला ना काही उपमान
आळविली प्रार्थना ऐकुनि सिंहासन सोडिशी
आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१४||
☆
आ यद्दुवः॑ शतक्रत॒वा कामं॑ जरितॄ॒णाम् । ऋ॒णोरक्षं॒ न शची॑भिः ॥ १५ ॥
आभा पसरे तव प्रज्ञेची तेजोमय दिव्य
दास तुझे ही तुझ्या कृपेने तृप्त सुखी सदैव
हवी मिळाया सेवकासी तव जागृत तू राहशी
आंसापरी रे शकटाच्या तू धाव झणी घेशी ||१५||
☆
शश्व॒दिंद्रः॒ पोप्रु॑थद्भिर्जिगाय॒ नान॑दद्भिः॒ शाश्व॑सद्भि॒र्धना॑नि ।
स नो॑ हिरण्यर॒थं दं॒सना॑वा॒न्स नः॑ सनि॒ता स॒नये॒ सः नो॑ऽदात् ॥ १६ ॥
उन्मादाने नाद करिती ते सवे अश्व घेउनी
पराक्रमाने अपुल्या आणिशी संपत्ती जिंकुनी
शौर्य तयाचे अद्भुत जितके उदार तो तितुका
दाना दिधले सुवर्णशकटा वैभवास अमुच्या ||१६||
☆
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे.. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)
Attachments area
Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10
Rugved Mandal 1 Sukta 30 Rucha 6 to 10
अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈