श्री संदीप काळे
इंद्रधनुष्य
☆ न केलेल्या पापाचे धनी? – भाग – 1 ☆ श्री संदीप काळे ☆
माझे मित्र अजित जाधव यांची राज्यातल्या एका जिल्ह्यातील जेलमध्ये मोठे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. ते नागपूर, मुंबई, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी असताना मला त्यांना भेटता आले नाही. म्हटले आता ते आपल्या जवळच आहेत तर भेटून घ्यावे. मी त्यांच्याशी संपर्क केला. माझा फोन आल्याने तेही आनंदीत झाले. ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. मला भेटताच क्षणी त्यांनी कडाडून मिठी मारली.
त्या जेलमध्ये त्यांनी जे जे काम सुरू केले ते ते मला सांगितले. जेलमधला चांगुलपणा, चालणारे काम, नक्कीच वेगळे, चांगले होते. चित्रपटात जेलला घेऊन काहीही दाखवतात, असा माझा मनातल्या मनात विचार सुरू होता. बराच वेळ आमचे बोलणे झाल्यावर मी जाधव यांना म्हणालो, ‘‘भाई, मला जेलमध्ये काही कैद्यांशी बोलण्यासाठी जाता येईल का?’’
जाधव बराच वेळ काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने ते म्हणाले, ‘‘बघू, काय करता येते ते, थांबा. ’’ ते आतमध्ये गेले.
थोड्या वेळाने जेलमध्ये असणारे पोलिस माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘‘तुम्हाला जाधव साहेबांनी आतमध्ये बोलावले आहे. ’’ मी आतमध्ये निघालो.
मी जेलचे सारे वातावरण अगदी डोळ्यात आणि मनात साठवून घेत होतो. जेलमध्ये असणारे जेव्हा बाहेर होते, तेव्हा त्यांना बाहेरच्या जगाविषयी फार कुतुहल वाटायचं नाही, पण आता ते सगळेजण आतमध्ये आहेत, तर त्यांना बाहेर काय चाललेय याचे फार कुतूहल वाटते. वर्तमानपत्रात असलेला शब्द न शब्द ते वाचून काढतात. मोठ-मोठी पुस्तके वाचून संपवतात. चांगले तेव्हढेच बोलायचे. मला हे सारे काही दिसत होते.
जाधव यांनी काही कैद्यांशी माझी ओळख करून दिली. जाधव मला म्हणाले, ‘‘तुम्ही यांच्याशी बोला, मी जरा फेरफटका मारून येतो. ’’
एक एक करून मी अनेकांशी बोलत होतो. माझ्याशी फार कोणी बोलण्यासाठी उत्साह दाखवत नव्हते. काहींना शिक्षा झाली होती. काहींना शिक्षा होणे बाकी होते. काहींची सुटका झाली होती, पण अजूनही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे ते तिथेच होते. काहींचे शासकीय रक्कम भरण्यावरून अडलेय, तर काहींना वकील लावायला कोणी पुढाकार घेत नाही. असे अनेक जण होते जे केव्हाच या जेलच्या चार भिंतींतून बाहेर पडले पाहिजे होते.
तिथे असणाऱ्या प्रत्येकाची कहाणी वेगळी होती. जसे आपण पिक्चरमध्ये पाहतो अगदी त्याहूनही भयंकर. बोलताना कैद्यांच्या डोळ्यात दिसत होते, तो गुन्हेगार नाही, त्यांच्या हावभावावरून ते लक्षात येत होते, हा चांगल्या घरचा आहे. पण अहंकार आणि रागामुळे त्याच्या हातून जे घडायला नाही पाहिजे होते ते घडून गेले.
जेलमध्ये कोण गरीब आणि कोण श्रीमंत, सगळे बिचारे सारखे. प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एकच आग बघायला मिळत होती, ती म्हणजे ‘मला सोडवण्यासाठी कोणीतरी बाहेरून येईल आणि मला इथून घेऊन जाईल. ‘
अनेक निरक्षर असणाऱ्या कैद्यांना सतत कोर्टात जाऊन-येऊन कायदे एकदम पाठ होते. वकील चुकले कसे इथपासून ते पोलिसांच्या कागदपत्रांमुळे कसा गोंधळ झाला, इथपर्यंत ही सगळी गणिते, अनुमान या कैद्यांना माहिती होते. हे त्यांच्या बोलण्यावरून दिसत होते.
जाधव यांनी माझ्यासोबत दोन पोलिस दिले होते. ते दोघेही म्हणाले, ‘‘आम्ही पेपरमध्ये, पुस्तकातून तुम्हाला नेहमी वाचतो. ’’ जसेही ते दोन पोलिस मला बोलायला लागले, तसे माझ्यासमोर असलेल्या अनेक कैद्यांची माझ्यासोबत बोलण्याची भाषाच बदलली.
मी अनेक कैद्यांशी बोललो, बऱ्याच जणांनी बोलण्याचा समारोप अश्रूंनी केला होता. कुणी फसले, कुणाला फसवले गेले. अनेकांचा दोष नसताना ते तिथे होते. त्यांनी कधीही न केलेल्या पापाची शिक्षा ते भोगत होते, असे मला वाटत होते.
जेलमधली सगळी माणसे तशीच होती. ‘मला आयते खायला मिळते. मी इथे आरामात आयुष्यभर राहतो’ असे तिथे कुणालाही वाटत नव्हते. मी अनेकांशी बोलत होतो.
लक्ष्मण तुरेराव नगरचे. शेतीच्या वादामध्ये भावाचा खून त्यांच्या हातून झाला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही जन्मठेपेची शिक्षा भोगतात. लक्ष्मण म्हणाले, ‘‘आमचा मोठा परिवार. चार भाऊ, आई, वडील, आम्ही सगळेजण एकत्रित राहायचो. सर्वात लहान भावाच्या बायकोला वेगळे व्हायचे होते. तिथूनच आमच्या घराचे वासे फिरले. हळूहळू आमच्या घरात फूट पडत गेली. सगळे भाऊ वेगवेगळे झाले. एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारे भाऊ छोट्या-छोट्या वादावरून एकमेकांचा जीव घ्यायला लागले. शेतीच्या वाटणीवरून वाद झाले.
मधल्या भावांनी माझ्या जमिनीवर नांगर फिरवला. त्यावरून भांडण इतक्या टोकाला गेले की, भांडणामध्ये त्याच मधल्या भावाचा जीव गेला. रागात सगळे काही घडून गेले. शेतीचे सोडा, कोणाला तोंड दाखवायला आता जागा राहिली नाही.
तो माझ्यापेक्षा लहान होता. तो चुकला असला तरी त्याला समजून सांगायचे. नाही तर त्यांना जे पाहिजे ते देऊन टाकायचे ही भूमिका मी मोठा असल्यामुळे घ्यायला पाहिजे होती, पण तशी भूमिका घेतली गेली नाही. आई, वडील, बहीण या सगळ्यांना मी मुकलो होतो. आता असे वाटते, ही शिक्षा संपूच नाही. आपण इथेच संपून जावे. एवढे सारे कमावले होते, ते एका क्षणात संपवले.’’
– क्रमशः भाग पहिला
© श्री संदीप काळे
९८९००९८८६८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈