श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ “आपला तिरंगा 🇮🇳 आपला अभिमान” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
आपल्या देशात दोन प्रमुख राष्ट्रीय दिन साजरे केले जातात.
१) भारतीय स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट.
२) भारतीय प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी.
या दोन्ही दिवशी आपण झेंडावंदन करतो. उंच आकाशात झेंडा फडकवून त्याकडे पाहत असताना आपला ऊर अभिमानाने भरून येतो. परंतु या दोन दिवशी झेंडा फडकविण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे हे किती जणांना माहिती आहे ?
१५ ऑगस्ट रोजी झेंडा फडकवण्याच्या पद्धतीला ध्वजारोहण असे म्हणतात.
इंग्लिशमध्ये फ्लॅग हॉईस्टिंग (Flag Hoisting) असे म्हणतात, परंतु अनेक जण त्याचा उच्चार फ्लॅग होस्टिंग असा करतात. त्या दोन्हीही शब्दांच्या उच्चारामुळे अर्थात जमीन अस्मानाचा फरक पडतो. फ्लॅग हॉईस्टिंग म्हणजे ध्वजारोहण.
आता याला ‘ध्वजारोहण‘ का म्हणतात हे पाहू. १५ ऑगस्ट रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे आधी तो पारतंत्र्यात होता. त्यामुळे त्या दिवशी झेंडा हा ध्वजस्तंभाच्या मध्यभागी अथवा मध्याच्या खाली फोल्ड करून ठेवलेला असतो. १५ ऑगस्टच्या सकाळी तो झेंडा खालून वरच्या टोकापर्यंत चढविला जातो आणि त्यानंतर तो फडकविला जातो. याचा अर्थ असा आहे की आधी हा झेंडा आकाशात नव्हताच आपण पारतंत्र्यात होतो. स्वातंत्र्य मिळाल्यामुळे प्रत्यक्ष आकाशामध्ये असलेला ब्रिटिशांचा झेंडा खाली उतरवून आपला झेंडा वरती चढविला गेला आणि आपल्या झेंड्याचा मान सर्वोच्च झाला.
२६ जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन, म्हणजे आपला देश स्वतंत्र होताच. फक्त तो प्रजासत्ताक झाला. त्यामुळे या दिवशी झेंडा आधीच ध्वजस्तंभाच्या वरच्या टोकाला घडीबंद करून चढवलेला असतो. फक्त खालून दोरी ओढून तो आकाशात फडकविला जातो. आपला तिरंगा हा आपल्या देशात सर्वोच्च मानाचा झेंडा असून प्रजेमधील प्रत्येकाला त्याकडे अभिमानाने मान उंच करून पाहता यावे म्हणून तो वरती टोकावर असलेला झेंडा फक्त फडकावला जातो. त्याला इंग्लिश मध्ये फ्लॅग अनफरलिंग (Flag Unfurling) असे म्हणतात.
आणखी एक फरक म्हणजे, १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर २६ जानेवारीला फक्त दोरी ओढून राष्ट्रपती तो फडकवतात. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच नव्हते हे याचे कारण असावे.
१५ ऑगस्टला ‘ लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर २६ जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर … राजपथावर झेंडा फडकावला जातो, हा आणखी एक फरक.
दोन्ही दिवशी ध्वजस्तंभावर झेंडा फडकवण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धतीतला फरक प्रत्येक भारतीयाने जाणून घेणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. जय हिंद !
स्वातंत्र्य दिनाचा विजय असो !!
भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो !!!
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640 Email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈