श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अस्ताला न जाणारा सूर्य… नारायण गंगाराम सुर्वे” ☆ श्री कचरू चांभारे ☆

१६ ऑगस्ट …. कविवर्य शब्दसूर्य नारायण गंगाराम सुर्वे यांचा स्मृतिदिन. 

गिरणी कामगारांची व्यथा ,वेदना नारायण सुर्वे यांनी दाहकपणे शब्दबद्ध केली. त्यांची कविता म्हणजे कामगारांच्या मनातली खदखद आहे.

रस्त्याच्या कडेला पडलेलं अनाथ बाळ ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हा नारायण सुर्वेंचा प्रवास रोमांचकारी आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी आपणास त्यांच्या ‘ ऐसा गा मी ब्रम्ह ‘या काव्यसंग्रहाचा परिचय करून देत आहे.

नारायण सुर्वे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखनातील वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी जे जगलं ,पाहिलं ,अनुभवलं तेच मांडलं. अण्णाभाऊ गद्यातून बोलले अन् नारायण सुर्वे पद्यातून बोलले. कविवर्य सुर्वे यांच्या 

स्मृतिदिनानिमित्त आपण ‘ ऐसा गा मी ब्रम्ह ‘ ची चर्चा करू. या कविता संग्रहात कामगाराचे वर्णन, आईविषयी कृतज्ञतेची कविता व प्रेमकाव्यही आहे. या कवितासंग्रहातील जवळपास सर्वच कविता कोणत्या ना कोणत्या वर्गाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या आहेत किंवा येऊन गेलेल्या आहेत हे विशेषत्वाने सांगायला हवे. 

कामगाराची प्रीतभावना व्यक्त करताना ‘क्षण माघारी गेले‘ या कवितेत कवी सुर्वे म्हणतात ….. 

मलाही वाटते तिला हात धरून न्यावे

निळ्या सागराच्या कुशीत बिलगून बसावे 

विसरावे तिने अन् मीही भोगलेले दुःख

एकमेकां खेटून सारस जोडीने उडावे. 

रात्र संपूच नये अधिकच देखणी व्हावी 

झाडे असूनही नसल्यागत मला भासावी 

तिची रेशीम कुरळबटा गाली झुळझुळावी 

माझ्या बाहूत पडून स्वप्ने तिने पाहावी… 

शब्दांचे ईश्वर‘ या कवितेत कवी, कवी झाल्याची खंत व आनंद अशा दोन्ही भावना व्यक्त करतो.

कवी नसतो झालो तर… असे म्हणताना कवी सुर्वे लिहितात… 

कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरे झाले असते

निदान देणेक-यांचे तगादे तरी चुकविता आले असते… 

… याच कवितेच्या शेवटी कवी म्हणतो ‘ आम्ही कवी झालो नसतो तर तुमचे दुःख कोणी मांडले असते ? बापहो, तुमच्या वेदनांना अमर कोणी केले असते ? ‘ या ओळीत कवीची सामान्य जनांच्या वेदनेविषयी तळमळ दिसून येते.

तोवर तुला मला‘ या कवितेतून कवीने प्रचंड आशावाद व्यक्त केलेला आहे. कवी म्हणतो ….. 

याच वसतीतून आपला सूर्य वर येईल 

तोवर मला गातच राहिले पाहिजे.

नगर वेशीत अडखळतील ऋतू 

तोवर प्रिये जगत राहिले पाहिजे… 

दोन दिवस‘ या प्रसिद्ध कवितेत जगण्याची भ्रांत मांडलेली आहे…… 

दोन दिवस वाट पाहण्यात गेले ;दोन दुःखात गेले 

हिशेब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे 

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली 

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली… 

… जगण्याची दाहकता वरील  कवितेत आहे. 

ऐसा गा मी ब्रम्ह‘ या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता मनाला चटका लावणारी आहे.

कवी नारायण सुर्वेंविषयी थोडसे …. 

माझे विद्यापीठ ,जाहीरनामा, सनद असे एकाहून एक सरस कवितासंग्रह देणारे नारायण सुर्वे यांची जीवनकथा म्हणजे अक्षरशः चित्तरकथा आहे.

१५ आॕक्टोबर १९२६ ची पहाट होती. मुंबईतल्या लोकांना पहाट ही आकाशाच्या रंगावरून न दिसता हातातल्या घड्याळाच्या वेळेवरूनच ओळखू येते. वुलन मिलमध्ये काम करणारं एक जोडपं गंगाराम कुशाजी सुर्वे व सौ.काशीबाई रोजच्याप्रमाणे कामाला चाललं होतं. पहाटेच्या शांत वातावरणाला  चिरून टाकणारा लहान लेकराचा टाहो, शेजारच्या उकांडासदृश्य कचराकुंडीतून त्या जोडप्याच्या कानी येतो. कारण काही का असेना पण मूल नको असलेल्या कुणीतरी तो मुलगा असलेला कोवळा जीव अंधारगर्भात रस्त्याच्या कडेला फेकला होता. गंगाराम-काशीबाईने ते मूल घरी आणलं .त्यांचे घर आधीही लेकुरवाळे होते. घरात खाणारी तोंडे खूप. पण मातृत्वाच्या ममतेने त्यांनी अजून एक तोंड घरात वाढवलं होतं.हे लहानगं बाळ म्हणजेच नारायण सुर्वे होत. 

तिसरीपर्यंत शिकलेले नारायण गरीबीमुळे पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. ते ही नंतर वुलन मिलमध्येच कामगार म्हणून रूजू होतात. लिहिण्याची व वाचण्याची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अनेक यशस्वी स्त्रियांमागे पुरूष उभा असल्याचं आपण वाचले आहे ,ऐकले आहे. पण नारायण सुर्वे याला अपवाद आहेत. त्यांच्या पाठीशी त्यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे खंबीरपणे उभ्या राहिल्या म्हणूनच नारायण सुर्वे घडले. या कृष्णामाईसुद्धा एका अर्थाने अनाथच होत्या. फरक एवढाच होता की नारायणरावाच्या ख-या आईवडीलांचा मागमुस दुनियेस नाही व कृष्णामाईच्या आईवडिलांनी ही दुनिया अकाली सोडलेली होती. यासाठी कृष्णाबाई लिखित ‘ मास्तरांची सावली ‘ ही त्यांची आत्मकथा वाचायला हवी. रोजंदारीमुळे शिक्षण सोडलेल्या नारायणरावास सातवी ,जुने डी.एड्. कृष्णाबाईनेच बळेबळेच करायला लावले. त्यामुळेच जिथं शिपाई म्हणून काम केले ,तिथंच नारायण सुर्वेंना अध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुस्तक लिहिणं व प्रकाशित करणं खर्चिक आहे म्हणून कविवर्य सुर्वे ग्रंथ निर्मितीकडे वळतच नसत. कृष्णाबाईने स्वतःचे मंगळसूत्र मोडून आलेल्या पाचशे रूपयातून ‘ ऐसा गा मी ब्रह्म ‘ लिहून प्रसिद्ध करायला लावले. कृष्णाबाई सुमारे एक वर्षभर बिना मंगळसूत्राच्या होत्या. चाळीतल्या बायाबापड्यांचे टोमणे त्या खातच होत्या, पण एका सधवा स्त्रीला मंगळसूत्र गळ्यात नसल्याची किती वेदना वाटत असेल ? याची कल्पना एक स्त्रीच करू शकते. पुढे बरोबर वर्षभराने ‘ऐसा गा मी ब्रम्ह’ला शासनाचा पुरस्कार मिळाला व पुरस्कारापोटी मिळालेल्या हजार रूपयातून नारायण सुर्वेंनी कृष्णाबाईस मंगळसूत्र व कानातले करून आणले.

रस्त्याच्या कडेला सापडलेलं अनौरस बाळ ,त्या बाळाचा गंगाराम-काशीबाईने केलेला सांभाळ ,गंगाराम सुर्वेंनी दिलेले स्वतःचे नाव ,कृष्णाबाईची भक्कम साथ …  यामुळे जे मराठीतलं अलौकिक सारस्वत उभं राहिलं, त्या सारस्वत सूर्याचं नाव म्हणजे शब्दसूर्य नारायण गंगाराम सुर्वे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित व ज्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो ,अशी उंची या सारस्वताने निर्माण केली .हाच शब्दसूर्य १९९५ साली परभणी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होता.

… आणि हो ,आनंदाने सांगावेसे वाटते …..  हा सूर्य मी दोनदा जवळून पाहिला होता. 

या शब्दसूर्यास स्मृतिदिनी विनम्र अभिवादन….. 

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments