श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ वि. स. खांडेकर स्मृतिदिनानिमित्त – आठवणींची सांजवात… भाग-२ ☆ श्री कचरू चांभारे ☆

भाऊ माझे अतिशय आवडते लेखक आहेत. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या सांजवात या कथासंग्रहाचा परिचय करून देत आहे. भाऊंचे लेखन म्हणजे जीवनाचा वास्तववाद. लेखन हे काल्पनिक असले तरी ते वाचताना, हे कथानक भोवताली घडले आहे असे वाटत राहते.

सांजवात: लेखक वि.स.खांडेकर 

प्रथम आवृत्ती 1948 

प्रकाशक.. मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे 

या कथासंग्रहात एकूण सात कथा आहेत.

1.तीन जगे 

2.शिखर 

 3.दोन मोसंबी 

4.शांती 

5.सोन्याची गाडी 

6.दोन भुते 

7.सांजवात 

यापैकी शांती, शिखर व दोन भूते या तीन रूपक कथा आहेत. 

तीन जगे : … 

समाजातील तीन वर्ग म्हणजे खांडेकरांनी मांडलेली ‘ तीन जगे ‘ ही कथा होय. श्रीमंत वर्ग ,कनिष्ठ वर्ग व मध्यमवर्ग असे तीन वेगवेगळे विश्व आहेत. आजही या तीन वर्गात फार मोठी तफावत आहे. ती पुढे कधी भरून येईल असं वाटत नाही. या कथेत शेटजी नावाचे एक पात्र आहे. हा कथासंग्रह लिहिला तेव्हा गांधीयुग होते. त्यामुळे गांधीजींची शिकवण कथासंग्रहात डोकावते आहे. कथेतील शेटजी गांधीजींच्या व्याख्यानाला जातात, पुतळा उभारण्यासाठी सढळ हाताने मदत करतात. रोशन नावाच्या आपल्या रखेलीवर वारेमाप खर्च करताट., पण एका हरिजन विद्यार्थ्यास शिकायला पैसे देत नाहीत. यालाच म्हणतात खायचे दात वेगळे व दाखवायचे वेगळे. समाजातही अशाच रूपाची अनेक माणसे दिसून येतात. मयत झालेल्या व्यक्तीस खांदा द्यायला पुण्य समजतात, श्रदांजली लिहिताना भावूक होतात, पण नियातीपुढे हतबल झालेल्या जिवंत माणसास टेकू देण्यास असमर्थतता व्यक्त करतात.

दोन मोसंबी :   

दुःख मांंडताना वेदनेच्या भळभळीलाही फुलांच्या महिरपीत सजवावं .हे भाऊंचे वैशिष्ट्ये .दोन मोसंबी ही कथा वाचताना अश्रू येतात.या कथेचा नायक एक कवी आहे.कवीची भाची आजारी असते.तिला दोन मोसंब्या हव्या असतात.पण जगाचं सुख दुःख मांडणा-या शब्दानं श्रीमंत असलेल्या कवीच्या खिशात दमडीही नसते.खिशात एखादा आणा सापडतो का ? हे चाचपण्यासाठी कवी खिशात हात घालतो ,तर खिशात पैसा नव्हताच पण कविता लिहिलेला एक कागद सापडतो.कवितेवर काही पैसे मिळतील व भाचीसाठी मोसंबी घेता येईल म्हणून कवी संपादक ,चित्रपट व्यावसायिक यांच्याकडे जातो.कुठेही पैसा मिळत नाही पण अवहेलना मात्र खिसाभरून मिळते.इकडे आजारी भाचीला झोप लागते.झोपेतच तिला दोन मोसंब्या मिळाल्याचं स्वप्न पडतं.अन् या स्वप्नाच्या बळावरच ती ठणठणीत बरी होते.स्वप्नावरचं जीणं म्हणजे गरीबीचं आवसान होय.मूळ कथा आपण वाचावी.

सोन्याची गाडी :

ही कथा मूल्य पेरणारी कथा आहे. कथेचा नायक दादासाहेब लहाणपणी चोरी करतो. दादासाहेबांचे वडील त्यांना खूप मारतात. पण रात्रीच्यावेळी सगळे झोपलेले असताना वडील ढसढस रडत असतात. उरातला बाप अंधारात उफाळून आलेला असतो. स्फूंदण्याचा आवाज ऐकून बालपणीचे दादासाहेब उठून वडिलांजवळ येतात. लेखकाने बाप-लेकातील रंगवलेला संवाद कोण्याही काळातील बापलेकाची भाषा आहे. तो संवाद म्हणजे अमर उपदेश आहे. मुलाने चोरी केल्याचे कळताच हवालदिल झालेल्या बापाच्या मनात येतं..  गुलाबाच्या झाडाला कुठून कीड लागते कळत नाही. पण कीड लागल्याचे कळताच त्याच्या फांद्या वेळीच छाटाव्या लागतात नाहीतर झाड मरून जातं. वडील मुलाला सांगतात …  विकाराची वाळवी मनाला लागली की पोखरलेल्या मनामुळे आयुष्य भंगूर व्हायला वेळ लागत नाही.

सांजवात : 

कथासंग्रहाचे शीर्षक असलेली सांजवात ही या पुस्तकातली शेवटची कथा. देशभक्ती ,ध्येय व तत्व यांची सांगड म्हणजे सांजवात. सांजवात कथेचा नायक दिनकर गांधीजींच्या विचाराने भारावलेला आहे. तो स्वतः नास्तिक आहे. पण त्याची आई दररोज तुळशीवृंदावनापुढे सांजवात लावत असते. आई म्हणजे दिनकरचा गुरूच. सांजवात लावण्यामागचे कारणही आई त्याला सांगत असते, पण दिनकरला ते पटत नाही.1942 च्या क्रांतिकारी आंदोलनात तो सक्रीय सहभागी असतो. गांधीजींच्या विचाराने तो भारावलेला असतो. पण आईला व भावाला त्रास होऊ नये म्हणून तो माफीचा साक्षीदार व्हायचे ठरवतो. आईला याची कुणकुण लागताच ती त्याला जे सांगते त्या मातृपदेशाला तोडच नाही. मॕक्झिम गॉर्की लिखित आई कादंबरीची आठवण व्हावी असा तो प्रसंग आहे. आई दिनकरला म्हणते .. “ बाळा असं कृतघ्न होऊ नकोस. देशासाठी तू फासावर जा.” … खरं तर असे सर्वच संवाद मूळ कथेत वाचायला हवेत. .

आईचा काही दिवसानंतर मृत्यू होतो. आईच्या मृत्यूनंतर नास्तिक असलेला दिनकर उठतो व तुळशी वृंदावनासमोर सांजवात लावतो. ती वात म्हणजे आपली आईच आहे,असं त्याला वाटत असते. आईच्या मृत्यूनंतर तो दररोज सांजवात लावतो. 

… भाऊंनी जे जे लिहिलं ते अमर ,अभिजात आहे. भाऊंनी लिहिलेल्या साहित्यावर एकूण २८  चित्रपट निघाले आहेत. देशातील व परदेशातील काही भाषांत त्यांची पुस्तके अनुवादित झालेली आहेत.ही गोष्ट त्यांचे अलौकिकत्व सिद्ध करते.

आज भाऊंचा स्मृतिदिन. स्मृतिदिनी भाऊंना विनम्र अभिवादन करताना एक गोष्ट सांगण्यास मला स्वतःचाच अत्यंतिक अभिमान वाटतो की भाऊंनी लिहिलेल्या सर्व कादंब-या ,तीन कथासंग्रह मी  वाचलेली आहेत. पण एकही नाटक न वाचल्याची खंत आहे हेही तितकेच खरे. 

– समाप्त – 

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments