श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ मन शुद्ध तुझं ! – भाग-१ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
… गोष्ट एका विशालहृदयी सैनिकाची !
नियतीने स्वर्गात बांधलेली त्यांची लग्नगाठ आता सैल होईल आणि सुटून जाईल, असं सर्वांनाच वाटलं होतं. किंबहुना त्याच्या काळजीपोटी त्याच्या आप्तांनी, मित्रांनी त्याला ‘ ही गाठ सोडवून घे ‘ असा सल्लाही दिला होता… जगाला व्यवहार जास्त प्रिय असतो आणि त्यात चुकीचंही काही नाही म्हणा !
पण हा पडला शिपाईगडी… शब्दाचा पक्का… इमान राखणारा! देशासाठी तळहातावर शीर घेऊन मरणाला सामोरं जाण्याची खरीखुरी तयारी ठेवणारा जवान !
लढाई सीमेवरची असो किंवा जीवनातली… दोन्ही आघाड्यांवर निष्ठा महत्त्वाची! प्रेमात आणि युद्धात सर्वकाही क्षम्य असतं असं म्हटलं जात असलं तरी त्याला प्रेमात कोणताही अपराध करायचा नव्हता !
त्याला ती अशीच योगायोगाने भेटली होती… सुंदर, सालस आणि मनमोकळी. पहिल्याच भेटीत त्यानं तिला आपलं काळीज बहाल केलं…. महिलांशी अत्यंत सुसंस्कृतपणे वागणारा रुबाबदार व्यक्तिमत्वाचा तो तिला भावला नसता तरच नवल! तिने त्याच्या हातात निर्धास्तपणे आपला हात दिला…. आणि ते दोघं आता एक झाले… प्रेमाच्या आणाभाका झाल्याच आणि या प्रेमाच्या या अलंकाराला व्यवहाराचं, समाजमान्यतेचं साखरपुड्याच्या गोडीचं कोंदणही लगोलग लाभलं… सीमेवरील कर्तव्ये बजावताना थोडेशी उसंत काढावी आणि लग्नबंधनात स्वत:ला बांधून घ्यावं, असं ठरलं !
मोहरलेल्या मनाची ती, आनंदाच्या वाटेवर अलगद चालत निघालेली.. पण कसा कुणास ठाऊक, त्या पावलांमध्ये शारीरविकाराचा काटा शिरला… विव्हल होऊन गेली ती. चालणारी पावलं आता कुणाच्यातरी आधाराची मिंधी झाली. कशी चालणार सप्तपदी? लोक म्हणाले… ‘ थांबव तुझा हा प्रवास. त्यालाही मोकळं कर या तुझ्यासोबतच्या प्रवासातून… त्याला त्याची एखादी वाट खुणावेलच कधी ना कधी तरी !’
तिलाही हे पटलं… आणि त्याला काही इलाजही नव्हताच की ! लग्न म्हणजे शरीराचा व्यवहार…. यात एक व्यंग आणि एक अव्यंग अशी जोडी विजोड. त्याच्या कानांवर सुद्धा हा आघातच होता… पण असे आघात पचविण्याची सवय असते सैनिकाच्या मनाला. तो म्हणाला… “आमचं लग्न झालं असतं आणि मी लढाईत माझे पाय गमावले असते तर तिने मला सोडले नसते… माझी खात्री आहे !”
तो सीमेवरून थेट आला आणि विवाहवेदीवर चढला.. ती विकल… असहाय… तो तिचे पाय झाला…. एकट्यानं अग्निप्रदक्षिणा केल्या… एक पाऊल त्याचे आणि एक तिचे. सातव्या पावलावर वधूने वराला वचन द्यायचे असते.. ‘मी तुझ्याशी माझे मैत्र अविनाशी ठेवीन… काहीही झाले तरी… आता आपली पावले जोडीने जीवनाच्या वाटेवर सुखाने मार्गाक्रमण करीत जातील !’
तिची पावले आता तर जमीनीला स्पर्शूही शकणार नव्हती…. पण तो म्हणाला… ‘ मी चालेन तुला कवेत घेऊन !’ आणि देव, ब्राम्हण, सगे-सोयरे यांच्या साक्षीने तिचा पत्नी म्हणून स्विकार केला….. आता चार पावलांचा प्रवास दोन पावलं करू लागली होती. दिवस फुलपाखरांची सोंगं घेऊन येतात… नकळत उडूनही जातात.
आठ महिन्यांत तिच्या शारीरविकाराने उसळी घेतली आणि निम्म्या देहाची आणि संवेदनांची ओळख कायमची पुसली गेली. हे तर निम्मं जगणं… अर्धाच श्वास घेणं जणू! पण तो तसूभरही डळमळला नाही! आता तिचे श्वासही तोच घेऊ लागला आणि तिच्या उरलेल्या देहात चैतन्य भरू लागला.
तो कुठंही एकटा जात नसे… ती सोबत पाहिजेच. त्याचा तसा आग्रहही असायचा. ती संकोचून जायची. त्याने तिची भीड चेपवली. लग्नसमारंभ, मेजवान्या, हॉटेल्स, भेटी-गाठी या सर्वांत तो तिला चाकांच्या खुर्चीतून न्यायचा… आणि वेळप्रसंगी तिचा भारही वहायचा… प्रेमानं ! बघणारे स्तिमित होऊन जायचे.. आणि तिचा हेवाही करायचे !
रंगरूप, तारूण्य, विचार, भावना आणि आर्थिक, सामाजिक स्थान यांच्यात तफावत पडत गेल्यावर एकमेकांपासून दुरावणारी, प्रसंगी खुशाल अनैतिकतेच्या मार्गाने जाणारी दांम्पत्ये पाहण्याची सवय झालेला समाज…. त्याला आश्चर्य होणारच! पण भारतीय सैन्यामध्ये महिलांचा सन्मान राखण्याची, जपण्याची शिकवण ही अंगभूत. सहकारी, अधिकारी त्याच्या ह्या दिलदारपणावर बेहद्द फिदा होते.
युद्धात पाय गमावलेला एखादा सैनिक जेंव्हा चाकांच्या खुर्चीवर बसलेला असतो, तेव्हा त्याच्या खुर्चीमागे त्याची पत्नी चालत असलेली पाहण्याचा अनुभव असलेले डोळे हे दृश्य बघून विस्फारले जायचे… आणि त्याच्याकडे मोठ्या आदराने बघत रहायचे…. तिला संकोचून जायला होऊ नये अशा बेताने… आणि ती सुद्धा आता सरावली होती !
दिवस म्हणजे पाखरं… उडून जाण्यासाठी खाली उतरलेली. तो सीमेवर गेला आणि कर्तव्यात गुंतला… आता त्याची दोन मनं होती… एक कामात आणि एक तिच्या आठवणींमध्ये रमलेलं.
तो असाच सुट्टीवर आला आणि त्याने तिला मनसोक्त हिंडवून-फिरवून आणलं! आणि त्याची सीमेवर जायची वेळ आली नेहमीप्रमाणे, आणि निघाला सुद्धा !
त्याला आता संघर्षरत सीमेवर कर्तव्यासाठी नेमलं गेलं होतं… ती मनातून घाबरली… तो म्हणाला होता ‘मी परत येईन! आधी नव्हतो का परतलो…. उंच पर्वतशिखरांवरून, मृत्यू भरलेल्या जंगलांतून आणि प्रत्यक्ष सीमेवरूनही? आपल्या घराजवळच नव्हती का काही महिने पोस्टींग मिळाली मला? तेंव्हा होतोच की सोबत! आता सीमांनी पुन्हा एकदा बोलावणं धा डलं आहे… जायला पाहिजे… राणी!’
आणि मेजर शशीधरन साहेब सीमेवर रुजू झाले. शत्रूने रस्त्यात सुरुंग पेरून ठेवलेले होते… त्यात आधीच आपले काही जवान जखमी झाले होते. अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना ठार मारणं अनिवार्य होतंच. ही कामगिरी करण्यासाठी निघालेल्या गोरखा रायफल्सच्या पथकाचे नायक होते… मेजर शशीधरन नायर!… सर्वांच्या पुढे चालत होते. कामगिरीवर निघण्याआधी थोड्याच वेळापूर्वी फोनवरून आईशी बोलणं झालं होतं…!
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈