श्री सुनील देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ प्रत्येकाचा कृष्ण… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
कृष्णचरित्राचा अभ्यास केल्यास, अभ्यास म्हणण्यापेक्षा चिंतन केल्यास, काही गोष्टी विशेषत्वाने जाणवतात. त्यातली पहिली गोष्ट कृष्णजन्माची…
कृष्णजन्म तुरुंगात झाला. माणसाला जन्मापासून अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मग तो कितीही संपन्न किंवा राजघराण्यातील का असेना. जन्माआधीपासूनच मृत्यू मागे लागलेला. वातावरण भयभीत. अशा परिस्थितीमध्ये प्रासादातले सुख सोडून एका गुराख्याच्या घरी बालपण. या ठिकाणी संपूर्ण उच्चनीचतेच्या आणि जातीयवादाच्या कल्पना मुळातच उखडून काढूनच श्रीकृष्णाचे बालपण पार पडत असतं.
श्रीकृष्ण हा त्या त्या वयातील आणि विशेषतः बालवयातील घटनांमधून जास्त वैशिष्ट्यपूर्ण रीतीने प्रकट झालेला जाणवतो. बालवयात संस्कार किती गरजेचे असतात आणि सुसंस्कारामुळे माणूस कसा घडत जातो याचा परिपाठच श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये आणि त्याच्या कुमारवयापर्यंतच्या चरित्रामध्ये आढळतो. श्रीकृष्ण चरित्र हे इतकं अद्भुत रसायन आहे की कळत्या न कळत्या वयातील बालकांपासून ते तत्त्वज्ञानाच्या अभ्यासकांपर्यंत सगळ्यांना आपलेसे वाटणारे, मनाला भावणारे आणि सर्वस्पर्शी असे हे चरित्र आढळून येते. म्हणूनच तर श्रीकृष्णाचा उल्लेख पूर्ण पुरुषोत्तम म्हणून केला जात असावा. श्रीकृष्ण चरित्र ज्या पद्धतीने मांडलं गेलं आहे, त्यामध्ये महर्षी व्यासांची प्रतिभा त्या व्यक्तिमत्त्वाच्या घडवणुकीत प्रतिभेच्या सर्वोच्च पातळीवर संचार करत असलेली आढळून येते. बाललीला, खोडकरपणा, खेळकरपणा या सर्व बालपणीच्या नैसर्गिक भावनांना कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. त्यामुळेच हे व्यक्तिमत्व बालपणापासूनच आपले लाडके व्यक्तिमत्व होऊन जाते.
एकदा एका निम्न प्राथमिक शाळेमध्ये साधारण पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या एक दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण होतं. आता या मुलांना कृष्णाबद्दल काय सांगणार ? परंतु त्यांच्या दहीहंडीचा खेळ चालू असतानाच मला काही ओळी सुचल्या. त्या ओळींच्यावर त्या मुलांनी खूपच सुंदर नाच केला. त्या ओळी त्या मुलांना खूप आवडल्या त्या ओळी अशा होत्या,
खांद्यावरती उभे राहूया उड्या मारुया कोणी.
शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..
पुढे पुढारी,
कृष्ण मुरारी,
मागे सारी,
सेना न्यारी,
नाचू कोणी, गाऊ कोणी,
उड्या मारूया कोणी.
शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..
सुदाम आला,
गोपी आला,
गोटु आला,
मोटू आला,
उंच कुणी वा बुट्या कोणी,
सारे खाऊ लोणी.
शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी……
उंच मनोरे,
करती पोरे,
वारे वारे,
म्हणती सारे,
दमते कोणी,
घसरे कोणी,
मटकी फोड़े कोणी.
शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..
करूया कल्ला,
हल्ला गुल्ला,
चविष्ट काला,
मट मट खाल्ला,
यम्मी यम्मी म्हणते कोणी
भरे तोबरा कोणी.
शिंकाळयातुन गट्टम करूया काढुन सारे लोणी…..
हे गाणे त्या मुलांना इतके आवडले की त्याच गाण्यावर नाचत नाचत मुले घरी गेली.
कसलं भाषण ? कसले प्रमुख पाहुणे ?
लहान मुलांचा कृष्ण हा सगळ्यात आवडता देव (खरं म्हणजे देव हे आई वडील म्हणतात म्हणून त्याला देव म्हणतात) परंतु मुलांना तो देव न वाटता स्वतःचा सवंगडीच वाटतो. म्हणूनच लहानपणापासून कृष्णचरित्राचे झालेले संस्कार हे लहान वयात व्यक्तिमत्त्व घडवण्याचे संस्कार आहेत.
कुमार वयातील खोडकर पणा, तारुण्यातील शृंगारिकता. त्याचबरोबर गुरुगृही जाऊन घेतलेले शिक्षण, त्या शिक्षणामध्ये सुद्धा गरीब श्रीमंतीचा भेद न करता जुळलेले मैत्रीबंध. गुरूंच्या घरी सगळ्या प्रकारची कामे करणे, गुरुप्रती आदर बाळगणे या सगळ्या घटनांवरून श्रीकृष्णाला खरे म्हणजे व्यासांनी कुठेही देवत्व बहाल केलेले नाही. श्रीकृष्णाचे देवत्व हे चरित्र ऐकणार्यांनी वाचणाऱ्यांनी त्याच्या विविध गुण प्रभावामुळे त्याला बहाल केलेलं आहे.
लहानपणी त्याच्या चरित्रात त्याच्या बालपणातील चमत्कारांचे प्रसंग हे, कीर्तनकार कथेकरी आणि त्याच्या चरित्राचे गुणगान करणाऱ्या त्याच्या भक्तांनी नंतर श्रीकृष्णाच्या चरित्राला जोडलेले आहेत, असे मला वाटते. श्रीकृष्ण राजघराण्यात जन्मला, गुराख्याच्या घरात वाढला, गुरुगृही शिकला, सर्व प्रकारच्या सामाजिक स्तरातील व्यक्तींशी मैत्री केली. तो योद्धा होता पण अजिंक्य नव्हता. त्याचाही पराभव करणारा होताच. त्यालाही त्याच्या राज्यातून पळवून लावणारा भेटला. प्रजेसकट पळत पळत द्वारकेपर्यंत जाऊन तेथे आपल्या राज्याचे पुनर्वसन करावे लागले. ही खरं म्हणजे नामुष्कीची गोष्ट. परंतु या सर्वाचं जे काही विवेचन व्यासांनी केलेलं आहे ते अप्रतिम आहे. अर्थात या पराभवाचा बदला योग्य त्या व्यक्तीकडून त्याने घेतला हे अर्थातच ओघाने आलेच. अन्यायाच्या विरोधात लढणारा न्यायनिष्ठ पण न्यायनिष्ठूर नव्हे, तर समन्वयाने संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करणारा. शांती प्रेमी पण वेळप्रसंगी शांतीचं तत्त्वज्ञान बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात कोणत्याही थरापर्यंत जाण्याचा सल्ला देणारा. उत्कृष्ट राजकारणी आणि तत्त्ववेत्ता.
माझ्यासारख्या सामान्यासाठी श्रीकृष्णाच्या चरित्राचा अभ्यास ही दूरचीच गोष्ट आहे. पण किमान त्याच्या चरित्राचं चिंतन ही सुद्धा एका जन्मामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकणारी गोष्ट नव्हे. त्यामुळे कृष्णचरित्राचा अभ्यास नव्हे पण कृष्ण चिंतन हा माझ्या विरंगुळ्याचा विषय आहे. मी कृष्णभक्त नव्हे, देव म्हणून मी त्याची पूजा करणार नाही. पण जगाच्या पाठीवरचं एक अद्भुत व्यक्ती चरित्र म्हणून ते व्यक्तिमत्व मनावर प्रभाव पाडून जातं. त्या चरित्राचे चिंतन हा प्रसन्नतेचा आणि मानसिक ऊर्जा वर्धनाचा भाग म्हणून मी त्या चिंतनात रमतो.
वरील सर्व विवेचनात एक गोष्ट माझ्याही खूप उशिरा लक्षात आली. तुमच्याही लक्षात आली की नाही माहित नाही. परंतु एवढ्या प्रचंड मोठ्या व्यक्तिमत्त्वाचा, मी संपूर्ण लेखामध्ये एकेरी उल्लेख केलेला आहे आणि ते कुठेही खटकत नाही….. यालाच तर अद्वैत म्हणत नसतील ?
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640 Email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈