डाॅ.भारती माटे
इंद्रधनुष्य
☆ गावाकडचा पाऊस… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
गावाकडे पावसाच्या नक्षत्रांचं बोलकं वर्णन केलं जातं.
याच शब्दांत सांगायचं झालं तर तरणा पाऊस पडून गेलाय,
त्याच्या पाठोपाठ म्हाताराही येऊन जाईल,
नंतर सासूचा पाऊस पडेल मग सुनेचा पाऊस पडेल…
हे असं का म्हटलं गेलंय याचे बहुतेक निष्कर्ष खुमासदार आहेत.
पुनर्वसू म्हणजे तरुण, पुष्य म्हणजे म्हातारा, मघा म्हणजे सासू आणि पूर्वा म्हणजे सून ही नावं अनेक शतकांपासून गांवगाड्यात लागू आहेत.
मृग आणि आर्द्रा या सुरुवातीच्या दोन नक्षत्रात जो पाऊस पडतो त्या दरम्यान खरीपाचा पेरा केला की उत्तम पीक हाती येतं ही पूर्वापार धारणा होय,
आताशा असं घडताना दिसत नाही ही गोष्ट अलाहिदा.
मृग आणि आर्द्रा ही पर्जन्याची बालरुपे समजली जातात, याच काळात मातीतल्या बीजांना अकुंरांचे रूप बहाल होते. हे कोवळे अंकुर म्हणजे पर्जन्याची बाल्यावस्था ही कल्पनाच मुळात अत्यंत रम्य आहे!
मग या अकुंरांवर ज्याची प्रीत बहरते तो पुनर्वसूचा पाऊस!
म्हणून तो तरणा पाऊस!
आणि पीक जोमात आल्यानंतर त्याचा निरोप घेण्यासाठी येणारा तो म्हातारा पाऊस, म्हणजेच पुष्याचा पाऊस!
किती भारी आहेत ही नावे! अगदी नितांत चपखल!
मघा नक्षत्रातला पाऊस असा कोसळत असतो की तरण्या विवाहितेला घराबाहेर पडताच येत नाही, तिला शेतांत धन्याच्या मागे जाता येत नाही की गावात कुठे जाता येत नाही. अशा सुनेला मग तो पाऊस सासूसारखा वाटू लागतो, चोवीस तास नजर ठेवणारा!
पूर्वा नक्षत्रातला पाऊस हा एका वेळेनुसार कोसळतो आणि ओसरतो देखील, त्याचं कोसळणं म्हणजे चपळ पर्जन्योत्सव होय. त्याची लगबग नि त्याचं कमी वेळेत भरपूर कोसळणं हे एखाद्या कामसू सुनेसारखं आहे, म्हणून तो सुनेचा पाऊस होय.
अर्थात ही केवळ नक्षत्रे लक्षात राहण्यासाठीची नावे होत, कारण हरेक स्त्रीला आधी सून व्हावं लागतं नि मग सासू बनावं लागतं, जे कुणालाच चुकलं नाही. त्यामुळे ही नावे कुणाएकीला दुखावण्यासाठी ठेवलेली नव्हती हे नक्की!
आता सध्या पुनर्वसू नक्षत्र सुरू आहे. त्यानंतर पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा आणि स्वाती अशी नक्षत्रांची रांग असेल.
या प्रत्येक नक्षत्रासाठी गावगाड्यात स्वतंत्र म्हणी आहेत ज्यांना मातीचा अमीट दरवळ आहे..
‘पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा.’ (असं म्हणण्याचं कारण म्हणजे मृगात पेरणी होत नाही मात्र पेरणीपूर्व मशागतीची कामे केली जातात जी खूप महत्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरवण्याची अनुभूती लाभत नाही. जुन्या मागच्या गोष्टीतच समाधान मानावं लागतं त्या अर्थाने टिरीकडे बघा असे शब्दप्रयोजन आहे)
‘पडतील आर्द्रा तर झडतील गडदरा’ (आर्द्रा नक्षत्रातला पाऊस बरसला तर गडकोटांच्या तटबंदी ढासळतील),
‘पडतील मघा तर चुलीपुढे हगा अन आभाळाकडे बघा’ (इथे चुलीपुढे हगा असं म्हटलेलं आहे. घरात अन्यत्र वेगवेगळ्या जागा आहेत जशा की कोनाडे, ढेलज, पडवी, अंगण, ओसरी, परस, माळवद, मोरी, सांदाडी, सज्जा, शेजघर, माजघर इत्यादी. तरीही चुलीपुढे हगा म्हटलंय कारण मघा नक्षत्राचा पाऊस इतका सातत्याने पडतो की त्याच्या जोडीने थंडीही लवकर येते. मग अडलेला माणूस आपली कामंधामं करायला घराबाहेर पडू शकत नाही मात्र थंडीपायी त्याला चुलीपुढे येऊन बसावं लागतं),
आश्लेषा नक्षत्रासाठीची म्हण – ‘मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा.’
म्हणजे काय ? तर आश्लेषाचा पाऊस हा आता होता आणि आता नाही अशा तऱ्हेचा असतो. तुम्ही पुढे आणि पाऊस मागे नाहीतर पाऊस पुढे आणि तुम्ही मागे असं याचं कोसळणं असतं. हा सूर ताल लावून पडत नाही आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची रीत !
‘पडतील पुक(पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख’ ( असं का म्हटलंय – पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरु होते. औताला बैल जुंपेपर्यंत आभाळ पुन्हा गळू लागतं. मग अशा वेळेस गड्याला कामाला जुंपता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो, हे सुख त्याला क्वचित लाभतं ) (REPOST)
‘पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा’ आणि
‘पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती!’
या म्हणींना मातीचा गोडवा आहे आणि यात अस्सल बोली भाषेतलं जिवंत सत्व आहे!
गावाकडची मराठी शुद्ध की अशुद्ध या भानगडीत न पडता ती एक ग्राम्यबोली आहे जी आपल्या मायमराठीला सचेतअवस्थेत ठेवते आणि तिची जुनी वीण उसवू देत नाही याला मी महत्व देतो.
शिवाय तिच्यात जी मिठास आहे ती अद्भुत आहे, तिचा लहेजा ढंगदार आणि न्यारा आहे.
गावाकडच्या मराठीचं मातीवर आणि मातीत जन्मणाऱ्या अन मातीतच मरणाऱ्या भूमीपुत्रावर निस्सीम प्रेम आहे त्यामुळे ती अधिक जवळची वाटते यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही…
लेखक – अज्ञात
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈