डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुक्यामध्ये श्री आणि सौ गावडे हे दाम्पत्य राहात होते. दोघेही हाडाचे शिक्षक. श्रीगोंदा तालुक्यातील विविध खेडयांतील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थी घडवण्यात दोघांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य घडविण्यातच त्या दोघांनाही अपार आनंद मिळायचा. 

ते १९७० चे दशक. ‘वंशाला दिवा हवाच’ असा जनू अलिखित नियमच त्या काळी खेड्यांमध्ये होता. श्री. व सौ. गावडे यांना मात्र एका पाठोपाठ एक मुली होत गेल्या. त्यात एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या या दांपत्याच्या घरातील बहुतेक थोरले लोक अशिक्षित होते. ते मुलासाठी आग्रही होते. त्यामुळे कुटुंबनियोजन शक्य नव्हते. एका पाठोपाठ एक चार मुली झाल्या. त्या काळी मुंबईत नव्याने सोनोग्राफी मशीन आल्या होत्या. कायद्या अभावी गर्भलिंगनिदान आणि स्रीभ्रुण हत्या सर्रास चालू झाली होती. मुंबईला राहणाऱ्या एका नातेवाईकाने सगळी ‘व्यवस्था’ करण्याची तयारी दोघांना दाखवली. दोघे नोकरीला असल्याने पैशांचाही प्रश्न नव्हता. पण गावडे दांपत्याने गर्भलिंग निदान आणि स्री भ्रुण हत्येला स्पष्ट नकार दिला. “अजून कितीही मुली झाल्या तरी चालतील. पण आम्ही गर्भातील मुलगी मारणार नाही.” असा ठाम निर्णय दोघांनी त्याला कळवला. त्यांना पुढे अजून दोन मुली झाल्या. अनेक नवस, उपवास, जपजाप्य, इत्यादी चालूच होते. शेवटी सहा मुलींच्या पाठीवर एक मुलगा झाला. त्याचा जन्म नेमका गोकुळ अष्टमीला झाला. म्हणून दोघांनी मोठ्या आनंदाने आपल्या या शेंडेफळाचं नांव ‘गोपालकृष्ण’ असं ठेवलं. 

शिक्षक आई-बापाच्या पोटी जन्मलेल्या मुलाला अभ्यासांत रूची घेण्यावाचून पर्याय नसतोच. शिक्षक आई वडिलांच्या संस्कारामुळे गोपालकृष्णला अभ्यासातच रूची निर्माण झाली. पुढे बारावी बोर्डाच्या वेळी त्याने इतका कसून अभ्यास केला की त्याला पुण्याच्या प्रसिद्ध बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये ओपन गटामध्ये मेरिटवर प्रवेश मिळाला. पंचक्रोशीमधून एम् बी बी एस् च्या अभ्यासक्रमासाठी निवड झालेला तो पहिलाच विद्यार्थी होता.

एम्‌बीबीएस्‌ चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर पुढे गोपालने पोस्ट ग्रॕज्युएशनसाठी स्रिरोग आणि प्रसुतीशास्र हा विषय निवडला. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये त्याचे हे शिक्षण चालू झाले. डॉ संजीव डांगरे गोपालचे पी जी गाईड आणि हेड आॕफ डिपार्टमेंट होते. त्यांची मुलगी, जान्हवी त्याच अभ्यासक्रमासाठी गोपालची ज्युनिअर म्हणून नंतर तेथे रूजू झाली. जान्हवीचे आई-बाबा दोघे मुंबईतील जे.जे. हॉस्पिटलमधून पास झालेले एम् डी गायनिक. जान्हवीचे बाबा तर एकदम कडक शिस्तीचे होते. सिस्टरची आॕपरेशन दरम्यान काही चुक झाली आणि ते ओरडले तर सिस्टरांच्या हातातील आॕपरेशनची हत्यारे गळून पडत. पण त्यांच्या कडक शिस्तीमुळे डिपार्टमेंट अतिशय चांगले चालले होते. जान्हवीच्या आई-वडिलांचे सिंहगड रोडवर स्वत:चे मोठे मॅटर्निटी हॉस्पिटल होते. तरी केवळ सेवाभावाने डॉ डांगरे कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट हेडची कायदेशीर जबाबदारी घेवून सेवा देत होते. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये स्रिरोग आणि प्रसुतीशास्र विभागात प्रचंड काम होते. गोपाल आणि जान्हवीला हॉस्पिटलमध्ये सकाळी सातपासून रात्री दहापर्यंत एकत्र काम करावे लागे. त्यात जान्हवी खुपच सुस्वभावी होती. हळूहळू दोघांना एकमेकांचे स्वभाव आवडू लागले. दोघांमधील जवळीक वाढू लागली. जान्हवीला विचारावे की विचारू नये या द्विधेत गोपालचे सहा महिने गेले. जान्हवीने तिने नकार दिला असता आणि शांत राहिली असती तर गोपालला फार नुकसान झाले नसते. पण तिने नकार देवून ही गोष्ट तिच्या बाबांना सांगितली असती तर मात्र गोपालची काही खैर नव्हती. शेवटी हिंमत करून गोपालने घाबरत घाबरत जान्हवीला विचारलेच. जान्हवीने त्याला चक्क “हो” म्हटले. गोपालला आभाळ ठेंगणे झाले. पण जान्हवीची एक अट होती. “माझ्या आई वडिलांना आम्ही दोघी मुलीच आहोत. मला त्यांची शेवटपर्यंत काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मी पुणे सोडणार नाही.” गोपालला कुठे तरी सेटल व्हायचेच होते. पुणे उत्तमच होते. त्यामुळे शेवटी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही घरातील थोरांच्या संमतीने लग्न पार पडले.

पुढील शिक्षण घेताना दोघांनाही डॉ लाला तेलंगासारख्या हाडाच्या शिक्षकाचे मार्गदर्शन मिळाले. गोपालसाठी डॉ लाला तेलंग शिक्षक तर होतेच, पण त्यापेक्षा जास्त ते त्याचे श्रद्धास्थान होते. डॉ लाला तेलंगाचा गोपालवर खास जीव होता. डॉ लाला तेलंगांनी गोपाल नावाच्या दगडाला ख-या अर्थाने घडवले. डॉ लाला तेलंगांमधील हाडाचा शिक्षक, गोपालची त्या शिक्षकावरील निस्सीम श्रद्धा, दोघांच्या एकमेकांबद्दलचा स्नेह या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या. त्यामुळे डॉ लाला तेलंगांनी दोन वर्षात सांगितलेला एक एक शब्द गोपालच्या मेंदूत अक्षरशः कोरला गेला. डॉ लाला तेलंगांनी गोपाळच्या मेंदूवर “Prevention is better than cure” या नियमाचे संस्कार वारंवार केले. 

यथावकाश गोपाळचे हे पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण झाले. त्याने सिंहगड रोड वर ” गुरूदत्त वेल वुमन क्लिनिक” नावाने ‘प्रिव्हेंटिव्ह हेल्थ  चेकअप सेंटर’ चालू केले. वेगवेगळ्या कँसरच्या तसेच इतर ‘सायलेंट किलर’ आजाराच्या तपासण्या करण्यासाठी वेगवेगळ्या मशिन त्याने विकत घेतल्या. अतिशय कमी दरामध्ये सर्व ‘रिकमेंडेड टेस्ट’ एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात हा  त्याचा प्रयत्न होता. पण या सर्व प्रकाराला लोकांकडून अतिशय थंड प्रतिसाद मिळाला. त्याने पदर पैसे खर्च करून वेगवेगळ्या माध्यमामधून लोकांशी संवाद सुरू केला. त्याला अनेक विचित्र प्रतिक्रिया मिळाल्या. 

“ मी फिट आहे. मला तपासण्यांची काय गरज?”

“ मला कसलाही त्रास नाही. मग उगाच तपासणी कशाला?”

“ आजार झाल्यावर पाहू की ! आत्ता उगाच खर्च कशाला?”

“ काही निघाले मग? उगाच गोळ्या औषधांचा मारा चालू होईल !”

“ उगाच हात दाखवून अवलक्षण कशाला? “

“ आजकालचे डॉक्टर कॅन्सरसारख्या आजारांची भीती घालून लोकांना उगाच तपासण्या करायला लावतात.”

अगदी गोपालच्या स्वतःच्या घरातील लोकही प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेक अप करून घ्यायला तयार होत नव्हते. या सर्व प्रकारांनी तो थोडा निराश झाला…….

होय, ही माझीच सत्यकथा आहे.

डॉ लाला तेलंग यांच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकताना “डॉक्टरने ‘रिॲक्टिव्ह’ नव्हे, तर ‘प्रोॲक्टिव्ह’ राहायलाच हवे” हे बाळकडू सरांकडूनच मिळाले होते. पण प्रत्यक्षात आपला समाज मात्र  आरोग्याच्या बाबत कमालीचा उदासीन अन्‌ ‘रिॲक्टिव्ह’ आहे. कुठलेही दुखणे भरपूर काळ अंगावर काढल्यानंतर अगदी असह्य झाले आणि इतर काहीच उपाय चालेनासा झाला की त्यानंतर नाईलाजास्तव लोक डॉक्टरकडे जातात. अशा वातावरणात काही त्रास होत नसताना डॉक्टरांना भेटने आणि तपासण्या करून घेणे लोकांच्या पचनी पडले नाही. या परिस्थितीत डॉक्टरने तरी ‘प्रो-ॲक्टिव्ह’ असावे. तेच समाजाला प्रेव्हेंटिव्ह हेल्थ बाबत ज्ञान देवून शहाणे करू शकतात. याच प्रेरणेने मी स्वत:चे पहिले ‘वेल वूमन क्लिनिक’ सुरू केले होते. पण घरातूनही टेस्टसाठी विरोध होत होता. ‘ मेडिकल टेस्ट रिपोर्ट करणे टाळायचे ’ ही ९९.९९ टक्के लोकांची मूलभूत प्रवृत्ती असते हे मला जाणवले.

— क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments