डॉ गोपालकृष्ण गावडे
इंद्रधनुष्य
☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆
(‘मेडिकल टेस्ट रिपोर्ट करणे टाळायचे’ ही ९९.९९ टक्के लोकांची मूलभूत प्रवृत्ती असते हे मला जाणवले.) इथून पुढे —
वास्तविक, ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर…’ हा फक्त वैद्यकीय नव्हे तर आपल्या रोजच्या जगण्यातील प्रत्येक गोष्टीला लागू पडणारा मंत्र आहे. कँसर, उच्च रक्तदाब, मधुमेह, हाडांचा ठिसूळपणा इत्यादी अनेक सायलेंट किलर आजार आज समाजात सर्रास आढळतात. या आजारांना सुरवातीच्या अवस्थांमध्ये काहीही लक्षणे नसतात. आजार वाढून लक्षणे आल्यावर मात्र डॉक्टरांना फार काही करण्यासाठी शिल्लक राहिलेले नसते. अशा सायलेंट किलर आजारांना सुरवातीच्या अवस्थामध्ये पकडण्यासाठी ठराविक अंतराळाने नियमित तपासण्या करून घेणे गरजेचे असते.
पण ‘रिपोर्टमधून आपल्या शरीरात चाललेली काही गडबड जर सापडली तर आपल्याला ट्रीटमेन्टच्या चक्रात अडकावे लागेल. कशाला नसत्या फंदात पडायचं? सध्या थोडासाच त्रास होतोय. जेव्हा तो असह्य होईल तेव्हाचं तेव्हा पाहू..’ अशा विचारांचा अधिक प्रभाव असतो.
…आणि इथेच आपण फसतो.
अनेक वेळा, वेगवेगळ्या प्रसंगी, घरातल्या घरातच बोलताना मी एखाद्या विषयाच्या अनुषंगाने सर्वांनाच ‘सावध व्हा अन् वेळीच टेस्ट करून घ्या,’ असे सांगत असे. सर्व सायलेंट किलर आजारांची माहिती देत असे. नियमित तपासण्याचे महत्त्व सांगत असे. मात्र खुद्द माझ्या घरात देखील प्रत्येकाचा प्रतिसाद अगदी थंड असायचा. परिस्थिती बदलण्यासाठी वेगळे काय करावे हे मात्र मला कळत नव्हते.
ही बाब मला सतत सलत होती. अखेर मला एक कल्पना सुचली. बहुधा जून महिना चालू होता. चातुर्मासाची सुरुवात जवळ आली होती. एका रविवारी दुपारी माझ्या सहाही बहिणींना फोन केले आणि दृढनिश्चयी आवाजात निक्षून सांगितले, ‘‘यंदा रक्षाबंधनानंतर ओवाळणी म्हणून मी तुम्हाला साडी वा इतर कुठलीही भेटवस्तू घेणार नाही. या वर्षापासून ‘वार्षिक आरोग्य तपासणी’ हिच तुमची रक्षाबंधनची भेट असेल. जी बहीण या तपासण्या करून त्याचे रिपोर्टस् मला दाखवेल, फक्त तिच्याकडूनच मी रक्षाबंधनला राखी बांधून घेईल. अन्यथा मी रक्षाबंधनला राखी तर बांधून घेणार नाहीच पण भाऊबीजेलाही ओवाळून घेणार नाही.’’ आईलाही सांगितले, ‘‘या ठराविक टेस्टस् केल्या नाहीस तर यंदा नरकचतुर्दशीला पाटावर बसून अंगाला तुझ्याकडून मी सुगंधी तेलाने अभ्यंग करून घेणार नाही अन् पाडव्याला ओवाळूनही घेणार नाही.”
सर्वांना निक्षून सांगितले, ” गर्भाशय मुखाच्या कॅन्सरसाठी पॕप स्मिअर, स्तनाच्या कॅन्सरसाठी मॕमोग्राफी, हाडांचा ठिसुळपणा तपासण्यासाठी बोन डेंसिटी, जनन इंद्रियांची आणि पोटातील इतर अवयवांची सोनोग्राफीने तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तक्षयासाठी हिमोग्लोबीनची तपासणी, डायबेटीससाठी शुगरची तपासणी, कोलेस्टेरॉलची तपासणी, व्हिटामीन B13 आणि D3 ची तपासणी, थायरॉईडची तपासणी या सर्व १० तपासण्यांचे रिपोर्ट दरवर्षी समोर असतील तरच यापुढे रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरे होतील.’’
ही मात्रा मात्र लगोलग लागू पडली. चक्क सहाही बहिणींनी तसंच आईने सुद्धा, भले निरिच्छेने असेल, पण सांगितलेल्या सर्व टेस्टस् केल्या. सर्व जणी रिपोर्टस् घेऊन आल्या. मी आणि जान्हवीने सगळे रिपोर्टस् अभ्यासले. प्रत्येकीला समोर बसवून त्यांचे रिपोर्ट समजावून सांगितले. आम्हाला त्यात भन्नाट गोष्टी सापडल्या.
सर्वात मोठ्या बहिणीच्या म्हणजे निर्मलाच्या गर्भाशयाला फायब्रॉईडची गाठ असल्याचे लक्षात आले. पाळीच्या वेळी तिला जो काही त्रास होत होता तो तिने इतर कुणालाही न सांगता स्वत:च्या मनात (आणि शरीरात) कडेकोट बंदिस्त करून ठेवला होता. मात्र तिचा रिपोर्ट पाहून तिला स्पष्ट विचारल्यानंतर तिने पाळीत खूप वेदना तसेच अती-रक्तस्राव नेहेमीच होत असल्याचे कबूल केले. त्यामुळे तिचे हिमोग्लोबीन सुद्धा खूपच कमी झाले होते. त्यावरही लगेचच यथायोग्य औषधोपचार सुरू झाले. ती आता कोणतीही पीडा-वेदनेमध्ये कुढत न रहाता सुखाने आपल्या दैनंदिन कामाला लागली आहे.
माझ्या दोन नंबरच्या बहिणीच्या म्हणजे उषाताईच्या ओव्हरीमध्ये छोटासा ट्यूमर असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याही पुढील एक-दोन चाचण्या करून लगेच यथायोग्य उपचार केले. जो ट्यूमर पुढे वाढून धोकादायक ठरण्याची शक्यता होती. ऑपरेशन करून तो ट्यूमर काढून टाकला. पुढचा धोका टळला. आज तीही सुखाने आपल्या रोजच्या कामाला लागलेली आहे.
तीन नंबरच्या बहिणीला, आशाताईला, बीपीचा त्रास असल्याचे उघडकीस आले. तिच्यावर आम्ही अगदी त्याच दिवसापासून उपचार सुरू केले आणि आता रोज रात्री झोपताना एक गोळी घेतली की बाकी त्रास थांबला आहे.
माझ्या चार नंबरच्या बहिणीच्या, सरलाताईच्या, हृदयाच्या तपासणीत ‘मरमर’ हा वेगळा आवाज ऐकू येत होता. आम्ही तिचा 2 D Echo करून घेतला होता. तिच्या हृदयाच्या वरील दोन कप्प्यांमधील पडद्याला जन्मापासून छिद्र होते. आजपर्यंत तिला त्याचा फारसा त्रास होत नव्हता. पण आता तिला थोडा दम लागू लागला होता. पण हा प्रॉब्लेम आजवर कधीच डिटेक्ट झाला नव्हता. रिपोर्ट ऐकून ती देखील हादरली. माझ्या हार्ट स्पेशालिस्ट मित्राकडे, डॉ हेमंत कोकणेकडे, मी तिला कन्सल्टेशन साठी पाठवले. त्यांनी एएस्डीसी (म्हणजे ॲट्रियल सेप्टल डिफेक्ट डिव्हाईस क्लोजर) ही छोटी शस्रक्रिया करून ते छिद्र बंद केले. त्यानंतर तिला आजवर कधीच त्रास झाला नाही.
तिन बहिणींना B12 डेफिशियन्सी असल्याचे आढळले. त्यासाठी इंजेक्शनचा कोर्स प्रिस्क्राईब केला आणि त्याचे चांगले परिणाम त्यांनाच अनुभवास येत आहेत.
दोन बहिणींना D3 डेफिशियन्सी असल्याचे आढळले. त्याला योग्य ते उपचार दिले. त्यांचीही तब्येत आता आणखी सुदृढ होते आहे.
आईच्या रिपोर्टमध्ये तिच्या हाडांचा टी-स्कोअर रेड झोनमध्ये असल्याचे दिसले. ही खुपच गंभीर बाब होती. तिच्या वयाला स्रियांमध्ये स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याची आणि हाडे ठिसूळ झाल्याने खुब्याचे हाड मोडून मृत्यू होण्याची शक्यता सारखीच असते. तिची हाडे कमालीची ठिसूळ झालेली होती. याला आम्ही ‘severe osteoporosis’ म्हणतो. तिच्यावर त्याच दिवसापासून उपचार सुरू केले. सलग काही महिन्यांच्या ट्रिटमेन्ट नंतर तिचा टी-स्कोअर ‘रेड’मधून आधी ‘यलो’ व नंतर ‘ग्रीन’ झोनमध्ये आला आहे. आजमितिला तिला काहीही त्रास नाही.
‘‘सगळं काही आलबेल आहे असं आपण सगळे कायमच समजून चालतो. पण आई, कल्पना कर… तू ही टेस्ट केली नसती तर तुझी हाडे ठिसूळ झाली आहेत याचा आपल्याला थांगपत्ताही लागला नसता. अशात तू पाय घसरून थोडीशी जरी पडली असतीस ना; तर त्याची परिणती थेट तुझ्या खुब्याचे हाड मोडण्यातच झाली असती. मग ऑपरेशन, त्यानंरच्या असह्य वेदना, महिनोन्महिने अंथरूणालाच खिळून राहाणे, आपल्याला हे सगळं काही भोगावं लागलं असतं…’’
— क्रमशः भाग दुसरा…
© डॉ गोपालकृष्ण गावडे
सिंहगड रोड, पुणे
मो 9766325050
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈