डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆ खरेखुरे रक्षाबंधन… भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(मग ऑपरेशन, त्यानंरच्या असह्य वेदना, महिनोन्महिने अंथरूणालाच खिळून राहाणे, आपल्याला हे सगळं काही भोगावं लागलं असतं…) – इथून पुढे —

हे ऐकल्यावर आईने माझ्या डोक्यावरून हात फिरविला. मी तिची काळजी करतो यापेक्षा मी माझ्या बहिनींच्या आरोग्याची अशी काळजी करतोय याचा तिला जास्त आनंद झाला होता. 

माझ्या सर्व बहिणी उच्चशिक्षित आहेत. सर्व जनी सरकारी नोकरीत आहे. त्या स्वावलंबी आणि मनाने कणखर आहेत. त्यांचे रक्षण करण्याची फारसी संधी मला आजवर कधी मिळाली नव्हती. बहिणीकडून राखी बांधून घेवून बहिणीच्या रक्षणाचे कर्तव्य भाऊ स्विकारतो. आजवर अनेक रक्षाबंधने झाली. पण भावाच्या कर्तव्याची पुर्ती केल्याचा खरा आनंद मला प्रथमच मिळाला होता. बहिणींच्या सर्व छोट्या मोठ्या आजारांचे वेळीच निदान झाल्याने पुढील धोके टळले होते. माझ्या या रक्षाबंधनच्या आगळ्या वेगळ्या गिप्टच्या कल्पनेवर मीच खुप खुष झालो होतो. 

तात्पर्य

मित्रांनो, आज प्रत्येकाच्या घरांत, भले कमीजास्त प्रमाणांत असेल, मात्र अनेक वस्तू, गॅजेटस्, पैसाअडका, सर्वकाही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे आपल्या जवळच्या व्यक्तीला आणखी एखादी वस्तू भेट देऊन त्यांच्याकडे आहे त्यात आणखी भर घालण्यात काहीच अर्थ नाही. या भेटींचा तेवढ्या पुरता हसून स्वीकार होतो आणि ती वस्तू कायमची त्या घरात धूळ खात पडून राहाते.

लोकसंख्येचा विस्फोट तसेच वाढत्या शहरीकरणामुळे ताणतणाव आणि प्रदुषणासारख्या समस्यांनी आज गंभीर स्वरूप धारण केलेले आहे. त्यामुळे जीवनशैलीशी निगडीत असलेल्या अनेक “सायलेंट किलर” आजारांचे प्रमाण आज प्रचंड वाढलेले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, जीवनसत्वांची कमतरता, हाडे ठिसूळ होणे तसेच वेगवेगळ्या कॕन्सरचे प्रमाण पटींमध्ये वाढले आहे. पण या आजारांबाबत आणि त्यांच्या प्रतिबंधाबाबत आपल्या देशात पाश्चात्त्य देशांइतकी जागरूकता नाही. पाश्चात्त्य देशात वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असते. पाश्चात्त्य देशांना आरोग्य तपासण्यांचे महत्व पटलेले आहे. पाश्चात्त्य देशात माणसाच्या जिवाला जशी किंमत आहे तशी आपल्याकडे का नाही? उदाहरणार्थ, पाश्चात्त्य देशांनी नियमीत पॕप स्मिअर या तपासणीद्वारे गर्भाशय मुखाचा कॕन्सरच्या ८०% केसेस थांबवल्या आहेत. आपल्याकडे मात्र हा कॕन्सर ८०% वेळा तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये लक्षणे आल्यावर सापडतो. आपल्याकडे मात्र आजही वर्षाला ६० ते ७० हजार स्रिया या आजाराने दगावतात. पाश्चात्त्य देशात आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी केवळ एक स्री दगावते. पाश्चात्त्य देशात स्तनाचा कॕन्सर लक्षणे यायच्या आधीच्या स्टेजेस मध्येच वार्षिक मॕमोग्राफीवर पकडला जातो. आपल्याकडे मात्र स्तनातील गाठ हाताला लागू लागल्या स्री घाबरून डॉक्टरांना दाखवायला जाते. तोपर्यंत उशीर झालेला असतो. आपल्याकडे आठ स्तनाच्या कॕन्सरपैकी चार स्रिया वर्षाच्या आत दगावतात. भारतात दर वर्षी ७० ते ८० हजार स्रिया स्तनाच्या कॕन्सरने दगावतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे दर वर्षी २६ नवीन स्तनाच्या कॕन्सरच्या केसेस आणि २२ नवीन गर्भाशय मुखाच्या केसेस सापडतात. दुर्दैवाने बहुतेक वेळी आजार तिसऱ्या वा चौथ्या स्टेज मध्ये असतो. हाडांच्या ठिसूळपणामुळे खुब्याचे हाड मोडल्यास २०% लोक वेगवेगळ्या गुंतागुंती होऊन वर्षाच्या आत मरतात. भारतात प्रत्येक एक लाख लोकसंख्येच्या मागे दर वर्षी २०० ते २४० खुब्याची हाडे मोडतात. वयाच्या पन्नाशी नंतर एखाद्या स्रिची स्तनाच्या कॕन्सरने मरण्याची जितकी शक्यता असते तितकीच खुब्याचे हाड मोडून मरण्याची शक्यता असते. ही आकडेवारी भयंकर आहे. भारतात आज डायबेटीसची कॕपिटल झाला आहे. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या ३३% लोक तर ग्रामीण लोकसंख्येच्या २५% लोक रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतातील एकुण शहरी लोकसंख्येच्या २७% लोकांच्या आणि ग्रामीण लोकसंख्येच्या १७% लोकांच्या रकातील कोलेस्टेरॉलने धोकादायक पातळी ओलांडलेली आहे.  हे तिन्ही आजार कसलेही लक्षणे न दाखवता शरीराला वाळवी लागल्यासारखे आतून पोखरून टाकतात. अनेक वर्षांनंतर जेव्हा हे आजार सापडतात तेव्हा हृदय, किडनी, मेंदू सारख्या शरीरातील अनेक महत्वपुर्ण अवयवांना कायमस्वरूपीची इजा होऊन गेलेली असते. बहुतेक सगळ्या सायलेंट किलर आजारांची भारतात हीच स्थिती आहे. 

रक्षाबंधन, भाऊबीज यांसारख्या सणांमधून आपल्या आया-बहिणींचं रक्षण करण्याची जबाबदारी आपण घेत असतो. जीवाचे रक्षण हे सर्वात मोठे रक्षण असते. त्यामुळे रक्षाबंधनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने पेलायची असेल तर त्यांचे आरोग्य अधिक सुदृढ राखण्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.  स्री ही भारतीय कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. भारतीय स्रियांनी प्राधान्यक्रमात त्यांच्या स्वतःच्या आरोग्याला सर्वात शेवटी प्राधान्य दिलेले असते. ती कुटुंबासाठी दिवसरात्र झटत असते. तिला सुट्टी नाही. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाही. तिला आजारी पडायचीही सोय नाही. स्वतःच्या कुटुंबासाठी तिने केलेला हा एक त्यागच असतो. पण या त्यागाची किंमत तिला गंभीर स्वरूपाचे आजार स्विकारून चुकवावी लागते. हे होऊ नये म्हणून त्यांच्या रक्षकाने (कुटुंबप्रमुखाने वा भावाने) प्रोॲक्टीव्हली चार पावलं पुढे टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक रक्षाबंधनला आपल्या घरातील स्रियांना “वार्षिक आरोग्य तपासणी पॕकेज” भेट दिले तर खऱ्या अर्थाने त्यांचं रक्षण करण्याकामी ते आपले योगदान ठरेल. ती करत असलेल्य त्यागाची परतफेड करणे शक्य नाही. किमान तिचे आरोग्य जपले तर ज्या कुटुंबासाठी ती त्याग करते आहे त्या कुटुंबाचा भाग म्हणवून घ्यायला आपण लायक ठरू.

कसा वाटतो हा विचार? पटल्यास आम्हांला जरूर कळवा..

..आणि हो, आम्हांला कळवण्याहून अधिक महत्वाचं म्हणजे या विचारावर कृती करून तो नक्की अंमलात आणा. 

यापुढे आपणही असे ‘खरेखुरे रक्षाबंधन’ नक्की साजरे करा.

– समाप्त –  

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments