इंद्रधनुष्य
☆ मुंगूस नवमी .. ☆ सुश्री समिधा ययाती गांधी ☆
श्रावणात अनेक सण असतात. काही रुढी परंपरा पिढ्यानपिढ्या जपल्या गेल्या आहेत. आम्ही मूळचे गुजराथी. वाळासिंदोर नजिकच्या मोडासा आणि वाडोसा गावच्या आमच्या पूर्वजांना शिवाजी महाराज त्यांनी सुरतेवर स्वारी केली होती तेव्हा आपल्याबरोबर रायगडावर घेऊन आले. रायगडाच्या पायथ्याशी महाड, बिरवाडी, पोलादपूर, खेड, दापोली या गावांत आमच्या पूर्वजांना बस्तान बसवून दिले. आपल्या मराठी लोकांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहाता यांच्याकडून दुकानदारी, व्यवहार शिकावे अशी महाराजांची इच्छा असावी. असो. तर आमचे पूर्वज काही शे वर्षापूर्वी महाराष्ट्रात आले आणि मराठीच झाले. तरीही काही विधी, सण पूर्वीच्या परंपरेनुसार होतात. त्यातलाच एक आहे मुंगूस नवमी.
महाराष्ट्रात जशी नागपंचमी असते तशी आमच्या समाजात मुंगुसाची पूजा करतात. त्यामागे एक कथा आहे. मुंगूस एका माणसाच्या मुलाचे सापापासून रक्षण करतो आणि सापाशी केलेल्या झटापटीत जखमी होऊन त्याचे तोंड रक्ताने माखते. घरी परत आलेल्या माणसाला घराबाहेर रक्ताने माखलेला मुंगूस दिसतो. त्याला वाटते की मुंगुसाने त्याच्या बाळालाच काही इजा केली असावी. असे वाटून काहीही विचार न करता तो त्या मुंगुसाला ठार मारतो. त्या आवाजाने त्याची पत्नी बाळासह बाहेर येते. तिला आपल्या नवऱ्याने आपल्याला मदत करणाऱ्या मुंगुसाला मारले याचे फार वाईट वाटते. ती दरवर्षी त्या दिवशी उपास करून मातीच्या मुंगुसाची पूजा करते….. ही या मागची कथा !!
तर या दिवशी मातीचा मुंगूस करून त्याची मनोभावे पुजा केली जाते. सापकिरडू यांपासून आपल्या मुलाबाळांचे रक्षण करण्याची विनंती घरातली स्त्री मुंगुसाला करते. माठाची भाजी, मेथी, उडीदडाळ घातलेले वडे व शिरा, वरण भात याचा नैवेद्य गायीला देऊन मग घरातल्या स्त्रिया प्रसादाचे सेवन करतात.
नागपंचमी प्रमाणे आजच्या दिवशी काही चिरत, कापत नाहीत.
तर अशी ही श्रावण शुद्ध नवमी, मुंगूस नवमी
© सुश्री समिधा ययाती गांधी
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈