श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ आभाळाचा भार ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
फुलांनी शाकारलेली शवपेटी….शवपेटीवरील त्या कोवळया फुलांचेही चेहरे मलूल झालेले !
शवपेटीवर आपल्या भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज पांघरलेला. सभोवताली भरून राहिलेल्या नीरवतेला खूप काही बोलायचे आहे…पण शब्द सुचत नाहीयेत..सुचलेले ओठांपर्यंत येत नाहीयेत. आजवर कधीही न डगमगलेली पावलं आता ते आठ-दहा पावलांचं अंतर चालायला नकार देताहेत….खूप मोठं अंतर आहे हे..खूप मोठं ! पोटचा एकुलता एक लेक शवपेटीत विसावलाय….त्याने आपल्या शवपेटीवर फुलं वहावीत असं स्वप्न पाहिलं होतं मी कधी काळी…आणि आज मी त्याच्या आणि तो माझ्या भूमिकेत आहे…मी उभा आणि तो आडवा आहे जमिनीला समांतर….काही वेळानं तो जमिनीच्या आणखी जवळ जाईल…तिच्या कुशीत चिरनिद्रा घ्यायला ! कुणी तरी पाठीमागे उभे राहिलं आहे…मागून माझे दोन्ही दंड धरले आहेत मला आधार देण्यासाठी. आता यापुढे दुसरा कुठलाही आधार पुरेसा ठरणार नाही आयुष्यात…..आधारवड उन्मळून पडलाय माझ्या हृदयातील अंगणातला.
मी शवपेटीजवळ पोहोचलो…त्याच्या डोक्याच्या बाजूला. लहानपणी कितीतरी वेळा तो मांडीवर येऊन निजायचा आणि मी त्याचं मस्तक कुरवाळू लागायचो…आताही हात पुढे झाले सवयीने. पण त्याचं मस्तक थंड….डोळे अलगद मिटलेले ! मी मला आधार देणा-याला स्पर्शातून सांगितले…आता मला एकट्याने उभं राहू द्यात माझ्या मुलाच्या सन्निध !
देशाच्या सेवेत दाखल झालो तेव्हा हुतात्म्यांच्या पार्थिवांवर पुष्पचक्रं वाहण्याचे प्रसंग येतीलच हे ठाऊक होतंच. तसं अनेक वेळा घडलंही. किंबहुना एखादे दिवशी आपणही अशाच एखाद्या शवपेटीत पहुडलेलं असू असंही वाटून जायचं….युद्धात मरणाची सवय करून घ्यावी लागते सैनिकांना…आपल्या माणसांचे क्षतविक्षत झालेले सुकुमार देह बघायचा सराव होऊन जातो डोळ्यांना…नजर मरून जाते ! पण मनालाही डोळे असतात…त्यांना असं काहीही पाहणं नामंजूर असतं. पण काय पहावं हे या डोळ्यांच्या हाती नसतं.
थरथरत्या हातांनी मी पुष्पचक्र हाती घेतलं. असं कितीसं वजन असेल त्या फुलांचं? खूप जड वाटली फुलं. आपण स्वप्नात नसू खासच. कारण दुःख स्वप्नात असं थेट मिठी मारत नाही….पण इथं तर प्रत्यक्ष स्वप्नानेच मिठी मारली आहे….मृत्यूला ! दोन पावलं मागं सरलो. दोन्ही पाय जुळवून उभे राहिलो…उजवा हात कोपरात वाकवून अगदी त्वरेने कपाळापर्यंत जायला हवा होता…पण या हातावर जन्माचं ओझं टाकलं होतं कुणीतरी. सावकाश हात कपाळापर्यंत नेला…सल्यूट ! जय हिंद साहेब !
हो…साहेब होतं पोरगं माझं. बापासारखंच त्यालाही पोलिस अधिकारी व्हायचं होतं….आणि बापाला सल्यूट ठोकायचा होता…पूर्ण गणवेशात. त्यानं खूप मेहनत घेतली आणि माझ्याच खात्यात अधिकारी पदावर विराजमान झाला. कामानं माझ्याही पुढं गेला. देशाचे,शांततेचे,माणुसकीचे,मानवतेचे शत्रू आसपास लपून छपून वावरत असताना…मृत्यूची छाया पावलांखालून निघून कधी डोईवर पडेल याचा नेम नसताना तो वर्दी आणि ईमान यांसाठी ठाम उभा राहिला. आमच्या गावांमध्ये मरण काही नवलाईचं नाही राहिलेलं…पण कुणाला स्वत:ला ते अजिबात नको आहे. पण त्याला सामोरं जाण्याशिवाय गती नाही जन्माला. मातीसाठी लढताना मातीत मिसळून जाण्याची तयारी ठेवावीच लागते.
जनाजा तयार आहे ! त्याचं अंतिम दर्शन घेण्यासाठी विशाल जनसमुदाय जमला आहे. मरणाच्या वाटेवर निघून जाणा-यासाठी लोक अमरत्वाच्या घोषणा देताहेत. रक्ताची नाती अश्रूंनी भिजलेली आहेत. मैत्रीच्या नात्यांना आपण बरेच काही गमावल्याची खंत आहे. आता चार पावलं त्याच्यासवे चालावे लागणार…पुढे कबरीनंतर तो आपल्या सोबत नाही चालणार. तो विसावणार आणि मी उसवणार…अंतर्बाह्य !
जनाजा उचलला गेला….खांद्यांवर विसावला ! मला त्याला शेवटचं खांद्यांवर खेळवायचं होतं….लहानपणी अनेकदा खांद्यांवर उचलून डोंगर,द-या,झाडं दाखवली होती, बाजारातून हिंडवून आणलं होतं. मी डाव्या खांद्यावर जनाज्याच्या उजव्या, जमिनीला समांतर असलेल्या आधारकाठीचा भार घेतला ! पृथ्वी इतकी जड असते? या विश्वाचं ओझं एवढं महाप्रचंड आहे? विश्वास नाही बसला !
अंत्ययात्रा मुक्कामी पोहोचली…म्हातारपणीसाठी लेकाच्या भरवशावर पाहिलेल्या सुखाच्या स्वप्नांच्या मातीची ओंजळ भरून घेतली आणि ती ओंजळ त्याच्या निर्जीव देहावर अलगद रिकामी केली आणि जन्मभरीचं ओझं आणि त्याच्या पराक्रमाची कथा सांगणारा राष्ट्रध्वज घेऊन घराकडे निघालो….आता एकांत हवा…रडण्यासाठी !
त्याची मोठी तसबीर. तो रूबाबदार गणवेशात. आता मात्र अगदी सरळ, ताठ उभा राहिलो..त्याच्या डोळ्यांत पाहिले…आणि अगदी कडक सल्यूट बजावला…जय हिंद साहेब ! तो त्याच्या डोळ्यांतून म्हणत होता…कर्तव्यपूर्तीसाठी कामी आलो…..फक्र है !
आणि काळजावरचा भार उतरल्यासारखा भासला….शांतपणे आतल्या त्याच्या लेकाच्या पाळण्याकडे गेलो….त्याचं जणू प्रतिरूपच ते बाळ….दोन महिन्यांचं ! डोळे अलगद उघडझाप करीत टुकूटूकू पाहू लागलं माझ्याकडे….मी बाळाला उचलून छातीशी कवटाळलं….त्याचा भार नाही जाणवला मला ! तो निघून गेला….मला जगण्याचं कारण मागे ठेवून !
(जम्मू-कश्मिर पोलिस विभागाचे माजी डेप्यूटी इन्सपेक्टर जनरल गुलाम हसन भट यांचे चिरंजीव डेप्यूटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस हमायूं भट साहेब अतिरेक्यांशी लढताना कामी आले. गुलाम भट साहेबांनी मोठ्या धैर्याने आपल्या मुलाला अखेरचा निरोप दिला. त्यांच्या भूमिकेतून लिहिलेले हे काल्पनिक मनोगत. याच अतिरेकीविरोधी कारवाईमध्ये हुतात्मा झालेल्या कर्नल मनप्रीत सिंग साहेब, मेजर आशिष धनौक साहेब, रायफलमॅन रविकुमार साहेब यांनाही तितकीच भावपूर्ण श्रद्धांजली.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈