श्री संभाजी बबन गायके
इंद्रधनुष्य
☆ एक नरश्रेष्ठ भारतीय सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
(डावीकडील छायाचित्रात नायक बिष्णू श्रेष्ठ दिसत आहेत. दुसरे छायाचित्र गोरखा सैनिकाचे प्रातिनिधीक छायाचित्र आहे.)
…अर्थात Once a soldier, always a soldier! Saving dignity of a woman!
त्याने झटकन आपल्या पोटपाशी लटकावलेली खुखरी तिच्या म्यानातून उपसली आणि त्याच्यावर झेप घेतली! खुखरी एकदा का म्यानातून बाहेर काढली की तिला अजिबात तहानलेली ठेवायची नसते. त्याने सपकन आडवा वार केला आणि त्याचं नरडं कापलं. खुखरीच्या जिभेला शत्रूच्या गरम रक्ताचा स्पर्श झाला आणि तिची तहान आणखी वाढली….समोर आणखी एकोणचाळीस शत्रू होते…कुणाच्या नरडीचा घोट घ्यावा?
तो सकाळीच आपल्या सैनिक मित्रांचा निरोप घेऊन घरी निघाला होता आपल्या पलटणीतून. का कुणास ठाऊक, पण त्याला आता घरापासून दूर राहण्याचा कंटाळा आलेला होता. घरी जाऊन वडिलोपार्जित शेती करावी,मुला-बाळांत रमावं असं वाटू लागलं होतं. त्याने मुदतपूर्व सेवानिवृत्ती मागितली तेंव्हा वरिष्ठही चकित झाले होते. बरं, वयही फार नव्हतं. फक्त पस्तीशीचा तो शिपाईगडी. त्यादिवशी त्याने साहेबांना कडक सल्यूट बजावला. जय महाकाली…आयो गोरखाली हा त्याचा सैन्यनारा मनात आठवला आणि आपला लष्करी गणवेश उतरवला….खुखरी मात्र गळ्यात घातलेल्या पट्ट्यात तशीच राहू दिली. खुखरी आणि गोरखा सैनिक म्हणजे जीवाभावाचं नातं…तिला दूर नाही करता येत. शीख बांधव जसं कृपाण बाळगतात सर्वत्र तसंच खुखरीचं आणि गोरखा सैनिकांचं. गुरखा किंवा गोरखा. इंग्लिश आमदनीत गुरखा असा उच्चार असायचा, तो स्वतंत्र सार्वभौम भारतात ‘गोरखा’ असा मूळच्या स्वरूपात केला जाऊ लागला.
त्याचा घरी जाण्याचा मार्ग झारखंड राज्यातून जात होता. रेल्वेप्रवास अपरिहार्य होता. तिकीट आरक्षित केलं होतंच. प्रवास सुरू झाला. सहप्रवाशांना प्रवासात लक्षात आलंच होतं की हा शिपाई गडी आहे. त्याच्या शेजारी बसलेल्या आणि आपल्या आई-वडिलांसोबत प्रवास करीत असलेल्या अठरा वर्षीय तरूणीने तर त्याच्याशी अगदी आदराने ओळख करून घेतली. रात्र झाली आणि सर्वजण आपापल्या बर्थवर झोपी गेले. जंगलातून जाणारा रेल्वेमार्ग. रात्रीचे बारा-साडेबारा झाले असतील. करकचून ब्रेक्स लागल्यासारखी गाडी मध्येच थांबली. बाहेर काळामिट्ट अंधार. मात्र बहुसंख्य प्रवासी झोपेत असल्याने त्यांना काही जाणवले नाही. आपला शिपाईगडीही गाढ झोपेत होता. अचानक रेल्वे डब्यात बाहेरून वीस-पंचवीस जण घुसले…हातातली धारदार हत्यारं परजत. डब्यात आधीच प्रवासी म्हणून बसलेले त्यांचे साथीदार तयार होतेच. त्यांनी प्रत्येकाला हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडची चीजवस्तू,पैसे,मोबाईल ओरबाडायला आरंभ केला. अर्थवट जागे झालेल्या प्रवाशांना काही समजेनासे झाले होते. चोरट्यांच्या धाकाने कुणाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. दरोडेखोरांनी आपल्या शिपाई गड्याला हलवून जागे केले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून त्यानेही जवळचे सर्वकाही त्यांना देऊन टाकले…खुखरी सोडून! मी एक आर्मीवाला आहे हे त्याने त्याही परिस्थितीत ओरडून सांगितले. त्यांची हत्यारे,त्यांची संख्या आणि आपण एकटे…अशा स्थितीत धाडस करणे परवडणार नाही…असा त्याचा विचार!
तेवढ्यात त्या हरामखोरांची नजर जवळच्याच बर्थवर अंगाचे मुटकुळे करून,थरथरत बसलेल्या त्य तरूणीवर पडली. त्यांच्या डोळ्यांत आता निराळेच भाव दिसू लागले. एकाने तिच्या अंगावर कापड फाडले आणि तिला खेचले. तिने जोरात आकांत केला आणि आपल्या सैनिक बांधवाकडे पाहिले…वाचवा!
आता मात्र या शूर गोरख्याचा संयम संपला. आपण शत्रूच्या समोर उभे आहोत आणि तो आपल्यावर चाल करून येतो आहे,असा त्याला भास झाला. जय महाकाली…आयो गोरखाली असं हळू आवाजात पुटपुटत त्याने खुखरी उपसली आणि त्या मुलीची अब्रू लुटू पाहणा-या दरोडेखोरांपैकी पहिल्याचा गळा चिरला! त्या एवढ्याशा जागेला आता युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. तिथे प्रचंड आरडाओरडा सुरु झाला. चाळीस पैकी एक दरोडेखोर आपल्या सैनिकाच्या हातात होता…बाकीचे एकोणचाळीस धावून येऊ लागले. आपल्या बहादूराने त्या दरोडेखोराच्या देहाची ढाल केली आणि तो पुढे सरसावला. त्यांच्या हातातली धारदार शस्त्रे आणि याच्या हातातली खुखरी….खुखरी अचूक चालू लागली…त्यांनी गोळी झाडली पण नेम चुकला. खुखरीचा मात्र नेम चुकू शकतच नाही. इतक्या वर्षाचे अघोरी वाटेल असं प्रशिक्षण…खुखरी आणि खुखरी चालवणारा कसा विसरेल? खुखरीने आणखी तीन जणांच्या कंठातून रक्त प्यायले…..त्या दुष्टांना खरोखरीचे कंठस्नान घातले. उण्यापु-या दहा-पंधरा मिनिटांचा हा थरार…तीन धराशायी आणि आठ-नऊ दरोडेखोर खुखरीच्या वारांनी पुरते घायाळ. या झटापटीत डब्यातील प्रवासी थरथरत निमुटपणे बसलेले होते. मुलीच्या गळ्याला थोडीशी दुखापत झाली होती. एवढ्यात जवानाच्या हातातली खुखरी खाली पडली…एका दरोडेखोराने तीच उचलून जवानाच्या हातावर वेगाने वार केला..खोलवर जखम झाली.रक्ताची चिळकांडी उडाली आणि जवान खाली कोसळला…पण हा पुन्हा उठून आपला जीव घेईल अशी त्यांना साधार भीती वाटली…ते डब्यातून उतरून जंगलात पळून गेले….नायक बिष्णू श्रेष्ठ,(सेवानिवृत्त्त) (गोरखा रायफल्स,भारतीय सेना) गंभीर जखमी होते…ट्रेन एव्हाना सुरू झाली होती..इतरांना या डब्यात नेमके काय घडलं होतं त्याचा तपास नव्हता…पुढच्या स्टेशनवर पोलिस,डॉक्टर्स तयार होते. डब्यात पडलेली तीन प्रेतं आणि एक जखमी मनुष्य…म्हणजे आपले बहादूर विष्णू श्रेष्ठ. अंगावर सिवीलीयन कपडे. पोलिसांना वाटले हा ही दरोडेखोरच! पण त्या तरूणीने आणि तिच्या आई-वडिलांनी सारी हकीकत सांगितली, हे नशीब! विष्णूजींना रूग्णालयात हलवण्यात आले. पूर्ण बरे होण्यास त्यांना तब्बल दोन महिने लागले यावरून त्यांना झालेल्या गंभीर दुखापतीची कल्पना यावी! यथावकाश पोलिसांनी सहा दरोडेखोरांना जेरबंद करून आणले. त्यांच्याकडून दहा हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम,तेहतीस मोबाईल फोंस, काही घड्याळे, दोन पिस्टल्स,जिवंत काडतुसं हस्तगत केली! भारतीय सैन्याने या शूरवीराला सेना मेडल आणि उत्तम जीव रक्शा पदकाने सन्मानीत केलं. चांदीचं पाणी दिलेली नवी कोरी खुखरी भेट दिली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या डोक्यावर असलेलं रोख इनामही विष्णूजींना दिलं. सामुहिक बलात्काराच्या मोठ्या संकटातून आपल्या लेकीची, तळहातावर प्राण ठेवून सुटका करणा-या विष्णूजींना त्या मुलीच्या आई-वडिलांनी मोठी रक्कम बक्षिस म्हणून देऊ केली…..तेंव्हा नायक बिष्णू श्रेष्ठ म्हणाले….देशाच्या शत्रूंना ठार मारणं हे सैनिक म्हणून कर्तव्य होतं. तसंच नागरीकांचं रक्षण करणं हे माणूस म्हणून कर्तव्य होतं..ते मी निभावलं ! याचं बक्षिस कशाला?
(दोन सप्टेंबर,२०१० रोजी हातिया-गोरखपूर मौर्या एक्सप्रेस मध्ये पश्चिम बंगाल मधील चित्तरंजन स्टेशनजवळ ही चित्तथरारक सैनिक-शौर्य कथा मध्यरात्री घडली. Once a soldier, always a soldier…ही म्हण प्रत्यक्षात आली ! मूळचे नेपाळचे असलेले आणि भारतीय सैन्यातील ७, गोरखा बटालीयनच्या ८,गोरखा रायफल्स पथकामधून निवृत्त होऊन घरी निघालेल्या नायक बिष्णू श्रेष्ठ यांनी हे अचानक हाती घेतलेलं ‘ऑपरेशन रक्षाबंधन’ आपले प्राण पणाला लावून यशस्वी केले होते. जय महाकाली..जय गोरखाली…भारत माता की जय…जय जवान…जय हिंद असा घोष तुमच्याही मनात जागवेल अशी ही कहाणी…इतरांनाही सांगा. कथा खरी. तपशिलातील उणिवांची जबाबदारी माझी.)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈