श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य– ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडूजी निमसे पाटील होते. १८४० साली  महात्मा ज्योतिराव फुले या थोर समाजसुधारकांसोबत, सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी त्यांचे वय नऊ वर्ष तर, ज्योतिरावांचे वय तेरा वर्षे होते. त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले हे स्वतः एक महान विचारवंत, कार्यकर्ते, समाज सुधारक, लेखक, तत्त्वज्ञ, संपादक आणि क्रांतिकारक होते.

सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावसआत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले.     सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. साऱ्या कर्मठ मनुवादी समाजाच्या विरोधाला न जुमानता सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या.    तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. (यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. 

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला फक्त सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी –  ” धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. मनुवादी सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. पण असे अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.

शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही, अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत… जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बालहत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.  सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.

इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले.

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या भयंकर साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. आणि दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या. प्लेगमुळेच  दि. १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले.

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments