श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (तिसरी माळ) – जीवनसंघर्षरत एक दुर्गा ☆ श्री संभाजी बबन गायके 

नव-याला सोडलं असलं तरी कपाळावरचं कुंकू आणि गळ्यातला काळा मणी यांपासून वत्सलामावशींनी फारकत म्हणून घेतली नाही. पदरात एक ना अर्धे…तीन मुलं. त्यात पहिल्या दोन मुली आणि तिसरा कुळाचा कुलदीपक. सासरचं घर सोडताना वत्सलामावशींनी नव-याचा प्रचंड विरोध डावलून मुलाला सोबत आणलं होतं. “ मला तुमचं काही नको…आणि माझ्या मुलांनाही तुमच्या या पापाच्या दौलतीमधला छदामही नको ” असं म्हणून मावशींनी कर्नाटकामधलं ते कुठलंसं गाव सोडलं आणि महामार्गावरून जाणा-या एका मालवाहू वाहनाला हात केला.

“ कित्थे जाणा है, भेन? ” त्या मालट्रकच्या सरदारजी चालकाने वत्सलामावशींना प्रश्न केला. “ दादा,ही गाडी जिथवर जाईल तिथवर ने ! ” असं म्हणून मावशींनी ट्रकच्या क्लिनरच्या हातावर दोन रुपयांची मळकी नोट ठेवली. “ ये नोट नहीं चलेगी ! ” त्याने कुरकुर केली. त्यावर चालकाने “ओय..छोटे. रख्ख !” असा खास पंजाबी ठेवणीतला आवाज दिल्यावर क्लिनरने मावशीची तिन्ही मुलं आणि मावशींना हात देऊन केबिनमध्ये ओढून घेतलं आणि स्वत: काचेजवळच्या फळीवर तिरका बसला. आरशातून तो मावशींना न्याहाळत होता जणू. सरदारजींनी त्याला सरळ बसायला सांगितले आणि ट्रक पुढे दामटला.

वत्सला जेमतेम विवाहायोग्य वयाची होते न होते तोच तिच्या वडिलांनी तिला दूर खेड्यात देऊन टाकली होती. त्यांना नव्या बायकोसोबत संसार थाटायचा होता आणि त्यात वत्सला बहुदा अडसर झाली असती. तरी बरं त्या स्वयंपाकपाण्यात, धुण्याधाण्यात पारंगत झाल्या होत्या, त्यांची आई देवाघरी गेल्यापासूनच्या काही वर्षातच. वत्सलाबाई तशा रंगा-रुपानं अगदी सामान्य म्हणाव्यात अशा. बेताची उंची,खेड्यात रापलेली त्वचा आणि काहीसा आडवा-तिडवा बांधा. पण रहायच्या मात्र अगदी स्वच्छ,नीटस आणि स्वत:चा आब राखून. वत्सलेचे यजमान तिच्यापेक्षा डावे. सर्वच बाबतीत. उंची,रंग आणि मुख्य म्हणजे स्वभाव. त्यांची पहिली पत्नी निवर्तली होती. पण मूलबाळ नव्हतं. कसलासा व्यापार होता त्यांचा. बाकी नावालाच मोठं घर आणि घराणं….संस्कारांची एकही खूण त्या घरात दिसत नव्हती. घरात दिवंगत तरुण माणसांच्या काही कृष्णधवल तसबीरी टांगलेल्या होत्या. पण ती माणसं कशामुळे गेली हे विचारायची सोय नव्हती. एकतर कानडी भाषेचा अडसर होता आरंभी. नंतर सरावाने समजायला लागले…सर्वच. गावातल्या जमीनदाराचा उजवा हात म्हणून दबदबा असलेला नवरा….जमीनदाराच्या सावकारकीचा हिशेब याच्याच चोपडीत लिहिलेला. कर्जाचे डोंगर डोक्यावरून उतरवू न शकणा-या गोरगरीबांच्या जमिनी सावकाराच्या नावे करून घेण्यात सरावाने वाकबगार झालेला माणूस. एखाद्याला बरणीतलं तूप काढून देताना आपल्या हाताला माखलेलं तूप माणूस पोत्याला थोडंच न पुसतो….ते तुपाचे स्निग्ध कण जिभेवर नेण्याची सवय मग अधिकाधिक वाढत गेली आणि कधीही वाल्मिकी होऊ न शकणारा वाल्या उत्पन्न झाला. स्वत:चा स्वतंत्र व्यवसाय सुरू करून त्यात सर्वमार्गे धनसंपदा घरात येत गेली. घरात माणसांची वानवा नव्हती आणि कामाचीही. वत्सलाबाईंचा ऐहिक संसार इतरांसारखा ठरलेल्या मार्गावरून वाटचाल करू लागला आणि वत्त्सलाबाई घरात प्रश्न विचारण्याएवढ्या मोठ्या आणि धीट झाल्या. तोवर तीन मुलं घातली होती पदरात नियतीने. वत्सलेचे प्रश्न टोकदार आणि थेट होते. यजमानांच्या खात्यावर आता धन आणि काळ्या धनासवे येणारे यच्चयावत अवगुणही जमा होत होते. नव-याने,सासु-सास-यांनी छळ आरंभला आणि त्याची परिणती म्हणून आज तीन मुलांना घेऊन वत्सलाबाई अनोळखी दिशेला निघाल्या होत्या.

कर्नाटकाच्या सीमा ओलांडून ट्र्क मराठी मुलखात शिरला. दुकानांच्या मराठी पाट्या वाचत वाचत मुलं सावरून बसली होती. आपण कुठे निघालो आहोत याची त्यांनाही कल्पना नव्हती. वाटेत सरदारजी काहीबाही विचारत राहिले आणि वत्सलाबाईंनी पंजाबी-मिश्रीत हिंदी अजिबात समजत नसली तरी कर्मकहाणी सांगितली आणि त्या दणकट शरीराच्या पण मऊ काळजाच्या शीखाला समजली…. “ तो ये गल है? वाहेगुरू सब चंगा कर देंगे ! “ त्याने अ‍ॅल्युमिनियमचे चंदेरी कडे घातलेला हात आकाशाकडे नेत म्हटलं.

रात्रीचे आठ वाजत आलेले होते. जकात नाक्याच्या पुढच्या वळणावर सरदारजींनी ट्र्क उभा केला आणि म्हणाले, “ भेनजी…उतर जावो. मैं तो अभी सड्डे ट्रांसपोर्ट ऑफिस जाऊंगा !

वत्सलेने या नव्या भावाकडे असे काही पाहिले की त्याने ट्रकचं इंजिन बंद केलं. सरदारजीचा स्वत:चा ट्र्क होता तो. पंजाबमधून महाराष्ट्रात येऊन स्वत:ची ट्रांसपोर्ट कंपनी काढायची होती त्यांना. औद्योगिक परिसराच्या जवळच एक ट्रक टर्मिनल उभं रहात होतं. त्यातलीच एक मोकळी जागा विकत घेऊन त्यांनी पत्र्याचं शेड ठोकून तात्पुरतं कार्यालय थाटलं होतं. आणि त्याला तो नसताना ते सांभाळणारं कुणीतरी पाहिजे होतं. राहण्याचा जागेचा प्रश्न मिटत होता. मराठी मुलूख होता. वत्सलाबाईंनी होकार दिला.

झाडलोट करणं, ट्रांसपोर्टसाठी आलेल्या मालावर लक्ष ठेवणं आणि बारीक सारीक कामं सुरू झाली. तिस-याच महिन्यात सरदारजींनी दोन नवे ट्रक घेतले. कार्यालय मोठे झाले. त्यांनी वत्सलाबाईंची पत्र्याची खोली आता पक्की बांधून दिली. परिसरात आणखी बरीच ट्रांसपोर्टची कार्यालये, गोदामं उभी रहात होती. चालक,मेकॅनिक,क्लिनर इत्यादी मंडळींचा राबता वाढू लागला. त्या परिसरात राहणारी एकमेव बाई म्हणजे वत्सलाबाई. तिथून जवळची मानवी वस्ती हाकेच्या अंतरावर नव्हती. चहापाण्याला,जेवणाला चालक-क्लिनर लोकांना थेट हायवेवरच्या ढाब्यांवर जावे लागे. सरदारजींना विचारून वत्सलामावशींनी आपल्या खोलीतच चहा आणि अल्पाहाराचे पदार्थ बनवून विकायला आरंभ केला. चव आणि मावशींचे हात यांचं सख्य तर होतंच आधीपासूनचं. माणसं येत गेली, ओळखीची होत गेली.

घरादारांपासून दूर असलेली ती कष्टकरी चालक मंडळी. त्यात त्यांच्या आयुष्यात आलेल्या अपरिहार्य पण अस्विकारार्ह गोष्टी. एकटी बाई पाहून त्यांच्या नजरांत होत जाणं नैसर्गिक असलं तरी वत्सलाबाईंचा अंगभर पदर, कपाळावरचं ठसठशीत कुंकू,गळ्यातला काळा मणी आणि जीभेवरचं आई-बहिणीसदृश मार्दव. वत्सलाबाई आता सगळ्यांच्याच मावशी झाल्या. आणि काहींच्या बहेनजी ! त्या ड्रायव्हर, क्लिनर मंडळींच्या घरची,मुलाबाळांची आवर्जून चौकशी करायच्या. कधी नसले कुणापाशी पैसे तर राहू दे…दे सवडीनं म्हणायच्या. आणि लोकही मावशींचे पैसे कधी बुडवत नसत.

दरम्यान मुली मोठ्या होऊ लागल्या होत्या. त्यांना मात्र मावशींनी सर्वांच्या नजरांपासून कसोशीने दूर ठेवलं. त्याही बिचा-या मुकाट्यानं रहात होत्या. लहानपणी जे काही लिहायला-वाचायला शिकल्या होत्या तेवढ्यावरच त्यांना थांबायला लागले. पण वागण्या-बोलण्यात अगदी वत्सलामावशी. काहीच वर्षांत मावशीच्या दूरच्या नातलगांना मावशींचा ठावठिकाणा लागला. अधूनमधून कुणी भेटायला यायचं.

सरदारजींनी जवळच शहरात प्लॉट घेऊन बंगला बांधला. आपले कुटुंब तिथे आणले. आऊटहाऊस मध्ये मावशींचे घरटे स्थलांतरीत झाले. आता पोरींची शाळा सुरू झाली जवळच्याच नगरपालिकेच्या विद्यामंदिरात. धाकटा लेकही आता हाताशी आला. पण त्या पठ्ठ्याला ड्रायव्हरकीचा नाद लागला आणि त्याने मावशींच्याही नकळत लायसेंस मिळवलं आणि ते सुद्धा अवजड वाहनांचं. मावशींनी मात्र चहा-नाश्त्याचा व्यवसाय सुरूच ठेवला…शरीर साथ देईनासं झालं तरीही.

सरदारजी पंजाबातल्या आपल्या मूळगावी गेले तेंव्हा सारा बंगला मावशींच्या जीवावर टाकून गेले होते…गेल्या कित्येक वर्षांत त्यांनी विश्वास कमावला होताच तेवढा. घर सोडून आल्यानंतर उभं आयुष्य मावशींनी एकटीच्या बळावर रेटलं होतं. स्वाभिमानने जगल्या होत्या. पै न पै गाठीला बांधून ठेवली…लेकी उजवताना लागणार होता पैसा..थोडा का होईना.

दोन्ही मुलींना स्थळं सांगून आली. दोघींची लग्नं एकाच दिवशी होणार होती. मावशींचा इतिहास आडवा नाही आला. इतक्या वर्षांच्या अस्तित्वात मावशींनी चारित्र्यवान वर्तनाची,प्रामाणिकपणाच्या खुणा वाटेवर कोरून ठेवल्या होत्या. विपरीत परिस्थितीत संस्कार सोडले नाहीत,मुलांनाही देण्यात कमी पडल्या नाहीत.

कसे कुणास ठाऊक, पण लग्नाच्या आदल्या रात्री मावशींचे यजमान येऊन थडकले. वाल्याचे पाप कुणीही स्विकारले नव्हते..अगदी जवळच्यांनीही. पैसे,जमीन होती शिल्लक काही, पण कुणाच्या डोळ्यांत डोळे घालून बोलण्याइतपत पत नव्हती राहिली. मावशी काहीही बोलल्या नाहीत.

दिवसभर ट्रांसपोर्ट कंपनीच्या आवारातच कार्य पार पडलं. पंजाब,हरियाणा,केरळ,बंगाल….भारतातल्या प्रत्येक राज्यातील एक न एक तरी व-हाडी हजर होता लग्नाला…अर्थात पुरूषांच्या त्या मेळ्यात एकही स्त्री मात्र नव्हती. मराठी लग्नसोहळा पाहून ती परप्रांतीय माणसं कौतुकानं हसत होती. सरदारजी मालक सहकुटुंब आले होते. त्यांनाही ट्रकच्या रस्त्यात उभं राहून हात करणा-या वत्सलामावशी आठवत होत्या…आणि त्यांच्या सोबतची लहानगी मुलं.

सायंकाळी पाठवणीची वेळ आली. मावशींनी व्यवस्थित पाठवणी केली. एका ट्रकवाल्यानं सजवलेल्या मिनीट्रक मधून दोन्ही नव-या सासरी घेऊन जाण्याची तयारी केली होती…..गाडीभाडं आहेर म्हणून वळतं करण्याच्या बोलीवर ! एकंदरीतच चाकांच्या त्या दुनियेत दोन संसारांची चाकं अग्रेसर होत होती.

मुली निघून गेल्या चिमण्यांसारख्या…भुर्र्कन उडून. त्यांना आता नवी घरटी मिळाली होती हक्काची. व-हाडी आणि इतर मंडळी निघून गेली. मंडप तसा रिकामा झाला. वत्सलाबाईंनी लाडू-चिवड्याच्या पुड्या बाहेर खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या नव-याच्या हातावर ठेवल्या आणि त्याला वाकून नमस्कार केला. आणि पलीकडे काथ्याच्या बाजांवर बसलेल्या ड्रायवर मंडळींकडे पाहून म्हणाल्या…’ कर्नाटका कोई जा रहा है अभी?’

एक चालक उठून उभा राहिला. मैं निकल रहा हूं मौसी थोडी देर में. त्यावर वत्सला मावशी नव-याकडे हात दाखवून म्हणाल्या…’ इनको लेके जाना1 और हाँ….भाडा नहीं लेना. तुमसे अगली बार चाय-नास्ते का पैसा नहीं लूंगी !’ 

असं म्हणत वत्सलामावशी लग्नात झालेल्या खर्चाच्या नोंदी असलेल्या वहीत पाहण्यात गर्क झाल्या….त्यांच्या यजमानाला घेऊन निघालेल्या ट्र्ककडे त्यांनी साधं मान वळवूनही पाहिलं नाही ! धुळीचा एक हलका लोट उठवून ट्रक निघून गेला…वत्सलाबाईंच्या डोळ्यांत त्यांच्या नकळत पाणी उभं राहिलं….पण आत मनात स्वाभिमानाच्या भावनेनं रिंगण धरलं होतं…एका बाईनं एक लढाई जिंकली होती…एकटीनं !

….. नवरात्रीनिमित्त ही दुर्गा मांडली. चारित्र्य, सचोटी, प्रामाणिकपणा, जिद्द, मार्दव, कर्तृत्व, करारीपणा आणि धाडस ह्या अष्टभुजा उभारून जीवनसंघर्षरत असलेली दुर्गा. संदर्भांपेक्षा संघर्ष केंद्रस्थानी ठेवून लिहिले. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments