श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (चौथी माळ) – जीवनाच्या रणात लढतांना… ☆ श्री संभाजी बबन गायके 

तिच्या चेह-यावर सदा हसू असतं याचं नवल वाटत राहतं. कुणी परस्पर कधी हिशेब मांडलाच तर सुखाच्या बाजूला तशी अगदी किरकोळ जमा दिसायची आणि दु:खानं तर सगळा ताळेबंदच व्यापून टाकलेला होता.

दोन जिवंत माणसं वावरू शकतील एवढ्या जागेत सहा माणसं रहात असलेल्या घरात जन्माला येणं काही तिनं ठरवलेलं नव्हतं. एकवेळ मरण हाती असतं पण जन्म हाती नसतो हे खरंच हे तिला फार लवकर पटलं होतं. नात्यातली माणसं तिच्याघरी यायला नाखुश असतात, त्यांना हिच्या आईला भेटायचं असेल तर ती माणसं हिच्या घरी येण्याऐवजी ‘ तुम्हीच या की घरी आमच्या ’ असं का म्हणायची, हे तिला समजायला वेळ लागला.

आपल्या घराच्या आसपासची सगळी वस्तीच इतरांपेक्षा निराळी आहे, हे ती शाळेत जायला लागली तेंव्हा तिच्या लक्षात आलं. आपल्या शेजारी राहणारी माणसं काही आनंदाने या वस्तीत रहात आहेत, असं नाही हेही तिने विचारांती ताडलं. तिला सख्खा मामा नव्हता. पण मानलेले मात्र मामा होते. तिच्या शेजारच्याच खोपटात राहणारे. त्यांच्या गावी एकदा तिच्या आईने त्यांच्याबरोबर यात्रेला पाठवलं होतं. मामाच्या गावात एका गल्लीत एकाच आडनावाची माणसं राहतात. आणि ही घरं स्वतंत्र भिंतीचीही असतात, स्वच्छतागृहं घरांपासून तशी लांब असतात, हे पाहून तिला आश्चर्य वाटलं. नाहीतर तिचं घर वस्तीत सरकारनं बांधून दिलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहापासून अगदी काही फुटांच्या अंतरावर आहे. ही जागा सरकारने व्यापली नसती तर त्या जागेवर आणखी दहा-बारा झोपड्या सहज उभ्या करता आल्या असत्या. कारण वस्तीला लागूनच नदी किंवा नदीला लागूनच वस्ती होती. आणि आता आणखी लोकांना वस्तीत रहायला यायला वावच राहिला नव्हता. स्वतंत्र भिंती उभारण्याची चैन लोकांना परवडणारी नव्हती. आणि मुळात भिंती अशा नव्हत्याच. होत्या त्या पत्र्याच्या किंवा अशाच काही लाकडी फळ्यांच्या. लोकांनी वस्तीत जागा धरल्या होत्या, आपण पळत जाऊन,गर्दीत घुसून बसमध्ये जागा धरतो ना तशा ! चंदा याच वातावरणाला सरावलेली होती. तिथले आवाज, तिथला वास आणि गरीबीच्या सहवासाची तिला सवय झाली होती. आपल्या त्या एवढ्याशा घरात मागच्या बाजूला पडदा लावून एक आडोसा केलेला आहे, आणि त्यात एक आईस्क्रीमवाला मामा राहतो, त्याला त्याच्या जागेत जायला आपल्याच दारातून जावे-यावे लागते. आपले वडील त्या मामाशी आई सलगीने बोलली की भांडतात, काहीबाही बोलतात आणि बरेचदा तिला मारतात, असेही होई. पण अशा मारामा-या तर वस्तीतल्या ब-याच घरांत होतात, हे चंदाला ऐकून पाहून माहिती झाले होते. लग्न झाले की नवरा बायको असेच वागतात,ही तिची समजूत पक्की होत चाललेली होती. तिच्या शेजारी दोन बापे राहतात, मात्र ते रोज सकाळी बायकांसारखं नटून थटून बाहेर जातात. समोरच्याच झोपडीत एक बाई राहते. समोर म्हणजे हिच्या आणि त्या झोपडीत मुश्किलीने चार हातांचं अंतर असावं. त्या बाईच्या हाता,पायांची बोटं निम्मीच आहेत, ती सकाळी एका म्हाता-या माणसाबरोबर बाहेर पडते. त्या म्हाता-याच्याही हाता-पायांना नेहमी पांढ-या पट्ट्या बांधलेल्या असत आणि त्या पट्ट्यांवर रक्ताचे डाग असतात बहुतेकवेळा. डोळ्यांच्या पापण्याही झडून गेल्यात. रात्री वस्तीत अंधुक उजेड असतो, पण त्यामुळे आपल्याकडे नातेवाईक आलेच तर त्यांना अस्वस्थ का होतं, हे कोडं तिला काही केल्या उलगडत नव्हतं. तिला माहित नव्हतं की तिच्या आईच्या माहेरच्या लोकांना का चांगल्या घरची माणसं म्हणतात. त्यांची घरं आपल्यापेक्षा चांगली म्हणून त्यांना असं म्हणत असावेत, असं तिला वाटून जाई.

मुलीच्या जातीनं लवकर मोठं होणं किती वाईट असतं याची जाणीव तिला लवकरच व्हायला लागली. आई तिला सतत घरात थांब, पावडर लावू नकोस,कुणाशी जास्त बोलू नको असं म्हणायला लागली तेंव्हा तर चंदा खूपच गडबडून गेली. त्यात वस्तीच्या टोकावर रहायला असणा-या एका पोराने तिचा हात धरला आणि माझ्याशी दोस्ती करतेस का? असं विचारल्यापासून तिला भीतीच वाटू लागली होती. तशी तीही चार दोन वेळा त्या मुलाकडे पाहून ओळखीचं हसली होती, नाही असं नाही. पण ते सहजच. दिसायला बरा होता तो सिनेमातल्या हिरोसारखे केस ठेवणारा आणि वस्तीतल्या डबल बारवर व्यायाम करणारा. आईने यासाठी तिलाच का रागे भरले असावे, ह्या प्रश्नाचं उत्तर तिला आजवर नाही मिळालं. दोन्ही धाकटे भाऊ सातवी-आठवीतून शाळा सोडून गवंड्याच्या हाताखाली जाऊ लागले आणि घरात रोज रोख पैसे येऊ लागले होते.

एका दिवशी तिचं लग्नं ठरलं. पदरात निखारा ठेवून कसं जगणार आई? मुलगी मोठी झालीये आणि तिच्याकडे लक्ष द्यायला आपण दिवसा घरी थांबू शकत नाही. घरी थांबलं तर लोकलमध्ये भाजलेल्या, उकडलेल्या शेंगा विकायला कोण जाईल आणि घरात ज्वारीचं पीठ कसं येणार, हे तिचे प्रश्न इतर अनेक गोष्टींपेक्षा मोठे होते.

वस्तीतले लोक म्हणाले पोरगी बिघडली म्हणून तिच्या आईनं तिला उजवलं. चंदाचं लग्न मात्र तिच्या आईच्या सासरच्याकडच्या एका नातेवाईकाच्या मुलाशी झालं. पोरगा ड्रायव्हर, तीन भावांत मिळून तोकडी शेती आणि रूपानं चंदापेक्षा दहा आणे निराळा. आपली बायको आपल्यापेक्षा चांगली दिसते याचा त्या पोराला सुरुवातीला अभिमान आणि लग्नानंतर काहीच दिवसांत हेवा वाटायला लागला. दोन मुलं झाल्यावरही त्याचा जावईपणाचा तोरा काही कमी झालेला नव्हता. तरी बरं चंदाच्या आईनं पै पै साठवून त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी, मनगटात घड्याळ असे लाड केले होते. तुझी वस्ती तशी, तुझं खानदान तसं अशी कारणं भांडणाला पुरेशी ठरू लागली. तुझं आधी वस्तीतल्या एकाशी होतं हे तर त्याने खास शोधून काढलेलं कारण. चंदा कायमची वस्तीत आईकडे रहायला आली. दरम्यान दोन्ही भावांची अशीच लग्नं झाली होती, त्यांच्यापेक्षा गरीब असलेल्या लोकांच्या अल्पवयीन मुलींशी. आता घरात एक नाही तर तीन चंदा होत्या.

वस्तीत पुराचं पाणी शिरलं की वस्तीकरांना सरकारी शाळांच्या ऐसपैस खोल्यांमध्ये रहायला मिळायचं. दोन-तीन दिवसांत पुन्हा वस्ती गजबजून जायची. निवडणुका आल्या की प्रचाराला जायची कामं मिळायची सगळ्यांनाच आणि पैसेही.

वस्तीच्या टोकावर रहात होता, त्या मुलाचेही लग्न झाले होते आणि त्यालाही तीन मुलं होती. पण आताही तो चंदाकडे पहायचा संधी मिळेल तेव्हा. चंदाने सरळ राखी पौर्णिमेला त्याच्या घरी जाऊन राखी बांधून प्रश्न मिटवला.

नवरा परत नेण्याची शक्यता नव्हती आणि चंदाची इच्छाही नव्हती.  भावजया कुरकुरायला लागायच्या आत काहीतरी करायला पाहिजे होतं. थोरला भाऊ आता मंडईत गाळ्यावर कामाला लागला होता, पण हमालांच्या संगतीनं हातभट्टीत रमला आणि घरी पगार कमी आणि आजारपण जास्त यायला लागलं. त्यालाही मुलं झालीच होती जशी वस्तीतल्या इतरांना होत, पटापट. कार्यकर्त्यांच्या बळावर वस्तीत नळ चोवीस तास,लाईट आकडे टाकून सर्रास. वस्तीतल्या घरां-घरांत किरकोळ उत्पादनं होत होतीच, त्यात एका कोप-यात स्वच्छतागृहाच्या बाजूला भट्टी लागायची, तिथूनही भरपूर माल निघायचा. एकूण हाताला कामं होती आणि कामाला भरपूर हात तयार असायचेच.

चंदाची आई मरण्यासारखी नव्हती. पण आजाराच्या साथीत अगदी किरकोळीत गेली. खर्च असा लागलाच नाही तिच्या आजारपणात. माहेरी आलेल्या लेकीचा आधार हरपला. बाप काही लेकीला माहेरी राहू देईल असा नसतोच बहुदा. ज्याची अमानत त्याच्याघरी बरी असं मानणारा पुरूषच तो. झटकलेली जबाबदारी पुन्हा खांद्यावर घ्यायला तो तयार नव्हता. दुसरं लग्न केलं तिनं तरी त्याची ना नव्हती. पण चंदा एकदा हरलेल्या जुगारात पुन्हा पैसे लावायला तयार नव्हती.

तिने आईची शेंगांची टोपली उचलली आणि तडक रेल्वे स्टेशन गाठलं. दोन दिवसांनी भावजयही आली सोबतीला. माणसांच्या गर्दीत आता या दोन तरूण पोरी सराईतपणे आणि लाज घरी ठेवून स्थिरावल्या. चुकून धक्का लागलेल्या माणसांना मनानेच माफ करीत, मुद्दाम धक्के देणा-यांना भाऊ म्हणत त्या या ठेशन पासून त्या ठेशन पर्यंत फिरतात….भुनेला,वाफेला सेंग असा पुकारा करीत. रेल्वेतील टी.टी.,पोलिस, पाकीटमार,किरकोळ विक्रेते, आंधळे भिकारी, फरशीच्या तुकड्यांनी ताल धरीत अनाकलनीय गाणी गात पैसे गोळा करीत फिरणा-या भावांच्या जोड्या त्यांना तोंडपाठ झाल्यात. चंदाने मात्र आपली दोन्ही मुलं दूरवरच्या गावातल्या बोर्डिंग स्कूलमध्ये नेऊन ठेवलीत….त्यांना शिकवायचा तिचा इरादा आहे तिचा. आपल्या मुलांच्या नशिबात येऊ पाहणारी वस्ती तिला आता दूर सारायची आहे. फलाटावरील एखाद्या मोकळ्या बाकावर थकून भागून बसलेली चंदा तिच्या टोपलीतली एखादी जास्त भाजली गेल्यामुळे काळी ठिक्कर पडलेली शेंग सोलते…त्या शेंगेतील शाबूत भाग दातांनी कुरतडून खाते आणि लोकलची वाट पहात राहते. या महिन्यात पैसे साठले की पोरांना अभ्यासाची चांगली पुस्तकं नेऊन द्यायचीत तिला….त्यासाठी कितीही ओरडावं लागलं तरी चालेल….भुनेला, वाफेला सेंग…मूंगफल्ली का सेंग !

चंदासारख्या अशा अनेक अष्टभुजा जीवनाच्या रणात उभ्या असतात लढायला…. आई भवानी त्यांच्या हातांना आणखी बळ देवो.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments