श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆या भाळांवर कुंकवाचा सूर्य रेखूया… (सातवी माळ) – जन्मदात्री सैन्याधिकारी….लेफ़्टनंट श्वेता शर्मा ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मुजफ्फरपुर एक्सप्रेस आपल्या सुसाट वेगात धावते आहे. दुसरे स्टेशन येण्यास आणखी बराच वेळ लागणार होता….आणि एकीच्या पोटातलं बाळ आत्ताच जन्म घ्यायचा यावर हटून बसलं. रेल्वेच्या त्या डब्यात बहुसंख्य पुरूषांचाच भरणा आणि ज्या महिला होत्या त्या भांबावून गेलेल्या. त्या फक्त धीर देऊ शकत होत्या. प्रसुतिकळांनी जीव नकोसा वाटू लागलेली ती आकांत मांडून बसलेली. अवघड या शब्दाची प्रचिती यावी अशी स्थिती….!

त्याच रेल्वे गाडीत प्रवासात असलेल्या लेफ़्ट्नंट श्वेता शर्मा यांचेपर्यंत हा आवाज पोहोचला ! आणि अशा प्रसंगी काय करायचं हे श्वेता यांना अनुभवाने आणि प्रशिक्षणामुळे माहीत होतं.

श्वेताजींचे आजोबा बलदेवदास शर्मा आणि पणजोबा मुसद्दी राम हे दोघेही भारतीय लष्करात सेवा बजावून गेलेले. वडील विनोदकुमार शर्मा आय.टी.बी.पी अर्थात इंडो तिबेट बॉर्डर पोलिस मध्ये डेप्युटी कमांडत पदावर कार्यरत आहेत. म्हणजे मागील तिन्ही पिढ्या देशसेवेत.  श्वेता यांनी काहीही करून याच क्षेत्रात जायचं ठरवलं. भारतीय सेना एक महासागर आहे. इथं ज्याला खरंच इच्छा आहे, तो हरतऱ्हेने देशसेवा करू शकतो. आणि प्रत्येक सेवेकऱ्यास गणवेश आणि सन्मान आहे.

वैद्यकीय सेवा हा या सेनेमधला एक मोठा आणि महत्त्वाचा विभाग आहे. डॉक्टर म्हणून तर सेनेत खूप महत्त्वाची जबाबदारी दिली जाते. आपल्या मराठी माणसांचा अभिमान असणाऱ्या डॉ.माधुरी कानिटकर मॅडम तर लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचल्या होत्या. पण ज्यांना डॉक्टर होणं काही कारणांमुळे शक्य होत नाही, अशा महिला नर्सिंग असिस्टंट म्हणूनही कमिशन्ड होऊ शकतात. पुरूषांनाही ही संधी असतेच. आणि नर्सिंग असिस्टंट अर्थात वैद्यकीय परिचारिका साहाय्यकांनाही सन्मानाची पदे मिळतात.

घराण्याचा लष्करी सेवेचा वारसा पुढे नेण्यासाठी श्वेता शर्मा यांनी मग परिचर्येचा मार्ग निवडला. मागील वर्षी मार्च २०२२ मध्ये त्यांना ‘सोल्जर नर्सिंग असिस्टंट’ म्हणून नेमणूक मिळाली आणि त्यांनी लष्करी गणवेश परिधान केला. बारावी शास्त्र शाखा आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांसारख्या विषयातील उत्तम गुण, उत्तम शारीरिक पात्रता, या गोष्टी तर गरजेच्या आहेतच. परंतु भारतभरातून या पदासाठी मोठी स्पर्धा असते. यातून पार पडावे लागते. मेहनत तर अनिवार्य. श्वेता यांनी २०१७ मध्येच यासाठीची आवश्यक पात्रता प्राप्त केलेली होती. त्या सध्या हमीरपूर हवाईदल केंद्रात कार्यरत आहेत.असो.

लेफ्टनंट श्वेता यांनी त्यावेळी रेल्वेत घडत असलेल्या त्या परिस्थितीचे गांभीर्य ताबडतोब ओळखले. डब्यातील गर्दी हटवली. ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांना सूचना दिल्या. महिलांना मदतीला घेतले. आणि हाती काहीही वैद्यकीय साधनं नसताना केवळ अनुभव, वैद्यकीय कौशल्य आणि कर्तव्य पूर्तीची अदम्य इच्छा, या बळावर धावत्या रेल्वेगाडीत एका महिलेची सुखरूप सुटका केली…एका महिलेचा आणि बाळाचा जीव वाचवला ! एका सैनिक अधिका-याच्या हस्ते या जगात पदार्पण करणारे ते बालक सुदैवीच म्हटले पाहिजे. बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत !

एका सैनिक मुलीस अशा प्रकारे हा पराक्रम करण्याची संधी मिळाली आणि तिने ती यशस्वीही केली. होय, त्या परिस्थितीत हे कार्य करणे याला पराक्रमच म्हटले पाहिजे. नवरात्राच्या या दिवसांत माता दुर्गाच सुईण बनून धावून आली असे म्हटले तर वावगे ठरेल काय?

नर्सिंग ऑफिसर लेफ्टनंट श्वेता शर्मा…आम्हांला आपला अत्यंत अभिमान वाटतो. परिस्थिती गंभीर तर सेना खंबीर याची तुम्ही प्रचिती आणून दिलीत. नारीशक्तीला सलाम. …. आपल्यामुळे देशातील असंख्य तरुणी प्रोत्साहित होतील आणि देशसेवेच्या याही मार्गाचा अवलंब करतील अशी आशा आहे.

(नवरात्रीत नऊ कथा कशा लिहायच्या ही चिंता नाही. अशा अनेक दुर्गा आहेत आसपास…त्यांच्याबद्द्ल लिहायला अशा शेकडो नवरात्री अपु-या पडतील. सकारात्मक गोष्टी सर्वांना समजायला हव्यात म्हणून हा अट्टाहास.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments