?इंद्रधनुष्य?

 ☆ वहातूक… पूर्वीची आणि आजची… लेखक – श्री विद्याधर शेणोलीकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆ 

आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सहज पुणे शहरातून स्कूटरवर फेरफटका मारला आणि मोकळ्या रस्त्यांवरून जाताना एकदम  ३५-४० वर्षांपूर्वीचा “फील” आला. 

कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विद्यापीठ रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सिंहगड रस्ता वगैरे रस्त्यांवर दाट झाडी होती. हे रस्ते निवांत होते. अगदी रात्री १०-१०.३० नंतर तर लक्ष्मी रोडही  निवांत असे. चक्क बंद दुकानांच्या पायऱ्यांवर बसून रात्री गप्पागोष्टी करता येत. लक्ष्मी रोडला एक चहाचं दुकान रात्रीही चालू असे. तिथे बहुधा कामावरून परतणारे, थकलेभागलेले कामगार चहा पीत. रात्री उशीरापर्यंत इराणी हॉटेले चालू असत आणि पहाटे लवकर उघडत. रात्रीच्या शो ला सिनेमा बघून येताना गुडलक, रीगल, सनराईझ, पॅराडाईज, लकी, नाझ वगैरे ठिकाणी किंचित विसावून चहा घेण्यात मजा होती. क्वचित् खोबरं लावलेला केक नाहीतर क्रीमरोल, नाहीतर बन-मस्का खाऊन पोटोबा शांत केला जाई. रात्री पुण्यात रस्त्यावरून भरभर जाणारे म्हणजे एकतर सिनेमा पाहून परतणारे किंवा कामावरून घरी परतणारे असत. माझे वडीलही हाय‌ एक्स्प्लोझिवज् फॅक्टरीमध्ये खडकीला नोकरीला होते. सेकंड शिफ्ट संपल्यावर एच. ई.तसेच अम्युनिशन फॅक्टरीमधले कामगार एकमेकांच्या सोबतीने खडकी ते फर्ग्युसन रस्ता असा प्रवास अपरात्री करत. अपरात्री सहकारनगर, अरण्येश्वर, पौड फाटा वगैरे भागात यायला रिक्षावाले नाखूष असत ( ही फॅशन जुनी आहे , आजची नाही…). अपरात्री एकट्यादुकट्याला सायकल मारत जायला भीती वाटायची. त्यात जोशी-अभ्यंकर खून प्रकरण झाल्यावर तर अख्ख्या पुणे शहरातच दहशत पसरली होती. पुढेही  “हाकामारी” वगैरे अफवांमुळे भीती वाटायची. 

पुणं हे सायकलींचं शहर तर होतंच, पण नंतरही अनेक वर्षं बजाज सुपर, कब, एम एटी हीच वाहनं होती. त्यापूर्वी तर लूना, व्हेस्पा आणि लॅंब्रेटा ही वाहनं. मोटारीही मुख्यत्वे एम्बॅसिडर आणि फियाट याच होत्या, क्वचित् प्रीमियर पद्मिनी… बाकी भारी गाड्या फक्त इंग्रजी चित्रपटात पडद्यावरच दिसत. रात्री पुण्यातले बहुतेक रस्ते अजगरासारखे शांत, सुस्त पहुडलेले असायचे आणि दिवसाढवळ्याही दुतर्फा वाहतूक असून रस्ते “मोकळे” वाटायचे. आतासारखी वाहतूक “अंगावर” येत नव्हती. मुख्य  म्हणजे सायलेन्सर काढून ट्रिपल सीट जात, माकडासारख्या आरोळ्या ठोकत जायचं आणि सिग्नलला पच्च् करून तोंडातला गुटख्याचा  तोबरा थुंकायचा…. हा जंगली प्रकार नव्हता. 

तेव्हाची वाहतूक आठवली, की त्या आठवणीनं मन गलबलून येतं…

त्याकाळची वाहतूकही त्याकाळच्या पुण्यासारखीच होती…..

शांत…. सभ्य……सौम्य…..!!!

लेखक :  श्री विद्याधर शेणोलीकर

कोथरूड,  पुणे.

संग्राहक : श्री माधव केळकर. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments