सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ – लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

हळदीघाटमध्ये १८ जून १५७६ साली मेवारचे राजे महाराणा प्रतापसिंग प्रथम व दिल्लीचे सम्राट अकबर यांच्या सैन्यामध्ये जी लढाई झाली होती, ती लढाई हळदीघाटची लढाई या नावाने प्रसिध्द आहे. या घाटाचा भौगोलिक गुणधर्म म्हणजे त्याठिकाणी असलेली नरम पिवळी माती. या पिवळया मातीमुळेच या भागाला हळदीघाट असे नामाभिधान झाले आहे. जशी सोळाव्या शतकात हळदीघाटची लढाई दोन तुल्यबळ राजांनी आपसात केली होती, तशीच हळदीच्या पेटंटसाठी लढाई विसाव्या शतकात झाली होती. आणि ही लढाई आपल्या भारत देशातील एका शास्त्रज्ञाने अमेरिकेतील US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिस विरुध्द केली होती.

डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर (आपल्या हळदीसाठी लढाई करणारा मराठी शास्त्रज्ञ)

त्याचे असे झाले. भारतीय वंशाचे दोन अमेरिकन संशोधक, मिसिसिपी युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेंटरचे सुमन के. दास आणि हरी हर पी. कोहली या दोघांनी हळदीचे बरे करण्याचे गुणधर्म शोधून काढल्याचा दावा US पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसकडे केला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांना मार्च १९९५ मध्ये तुम्हाला आणि आमच्या आयुर्वेदाला शतकानुशतके माहीत असलेल्या गोष्टीसाठी पेटंट देण्यात आले. जखम झाल्यावर त्यावर हळद लावण्याचा रामबाण उपाय भारतात पूर्वापार वापरला जातो आहे; असे असतांना, एक दिवस सकाळी पेपर वाचत असतांना, एका विचित्र बातमीकडे आपल्या जगप्रसिद्ध भारतीय डॉक्टर माशेलकरांचे लक्ष गेले. अमेरिकेने हळदीच्या औषधी वापरावर आपले हक्क असल्याचे त्या बातमीत म्हटले होते. थोडक्यात अमेरिकेने हळदीचे पेटंट घेतले होते. बातमी वाचताच माशेलकर बेचैन झाले. नुसते बेचैन न होता आता त्यांची चांगलीच सटकली. आपल्या भारतीयांकडे अनेक पिढया चालत आलेले हे ज्ञान, कोणीतरी स्वतःचे असल्याचा राजरोस दावा करतो आहे, हे योग्य नव्हे. यावर अमेरिकेशी न्यायालयीन लढाई करून आपले हक्क आपण राखले पाहिजेत, असा पक्का विचार करून डॉक्टर माशेलकर कामाला लागले. जोरदार न्यायालयीन लढाई झाली. हळदीचे गुणधर्म सांगणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेत हळदीबद्दल लिहिले गेलेले संदर्भ, अनेक कागदपत्रे जमा करून, त्या सर्वांचा रितसर अभ्यास करून, डॉक्टर माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही अमेरिकेविरुद्धची हळदीघाटची लढाई जिंकली. यातून दोन चांगले परिणाम झाले. एक तर आपल्या ज्ञानाचे हक्क आपल्याकडे राहिले आणि दुसरा दूरगामी फायदा झाला, तो असा की आपल्या पारंपरिक ज्ञानाची किंमत आपल्याला आणि साऱ्या जगाला कळली. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्राला भारतीय ज्ञानाचे महत्त्व कळले आणि आपण दुसऱ्यांच्या पेटंट नसलेल्या पारंपरिक ज्ञानावर आपला हक्क सांगायचा नाही हा धडाही मिळाला. अमेरिकेसारख्या बलाढय राष्ट्रा विरुध्द हळदी साठी स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या शस्त्रासह एकाकी लढाई देणारे आपले डॉक्टर माशेलकर यांचे सपुर्ण नाव डॉक्टर रघुनाथराव अनंत माशेलकर. जन्म १ जानेवारी १९४३. मुळचे गोव्यातील माशेल येथील. माशेल सारख्या टुमदार गावात निसर्गरम्य खेडेगावात त्यांचे बालपण गेले. परंतु त्यांच्या वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे छत्र हरपले.आईने मोठ्या धीराने त्यांचे संगोपन व आणि पालनपोषण केले. त्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी त्यांच्या त्या माऊलीने माशेल सारख्या लहान खेडेगावातून सरळ मुबंईसारख्या मोठ्या शहरात येण्याचा निर्णय घेतला. आईने घेतलेला हा निर्णय रघुनाथरावांनी सार्थ ठरविला. मुबंईत ती दोघं खेतवाडीत डाँक्टर देशमुख गल्लीसमोरच्या चाळी मध्ये राहु लागली. त्यावेळेस त्यांची परिस्थिती अतिशय बिकट होती. सातवी इयत्ते पर्यंत त्यांचे शिक्षण मुबंईत पालिकेतील शाळेतच झाले. या शाळेतल्या शिक्षकांनी सुरुवातीस भरपुर सहकार्य केल्याने माशेलकरांचे आयुष्य घडले गेले.

७ वी इयत्ता यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, आता मुंबईच्या युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेणार होते. मात्र, डाँक्टर माशेलकर यांच्या आईला प्रवेशासाठी २१ रुपयांची व्यवस्था करणे कठीण झाले होते. पण आईच्या ओळखीत असलेल्या एका मोलकरणी कडून कर्ज घेऊन अडथळे दूर केले गेले, त्या मोलकरणीने आपली संपूर्ण बचत उधार दिली जेणेकरून रघुनाथ शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट होऊ शकेल! युनियन हायस्कूलमध्ये, तरुण रघुनाथचे शिक्षक श्री. भावे यांनी त्यांची प्रतिभा केव्हाच ओळखली होती. आणि सूर्याची किरणे एकाग्र करू शकणार्‍या बहिर्गोल भिंगाचे उदाहरण वापरून त्यांना जीवनात लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त केले. याच उल्लेखनीय उदाहरणाने रघुनाथला शास्त्रज्ञ बनण्याची प्रेरणा दिली. त्या काळात घरात वीज नसल्यामुळेच रस्त्यावरील दिव्याच्या उजेडात अभ्यास करूनही त्यांनी बोर्डाच्या म्हणजेच शालान्त परीक्षेत उत्तीर्ण होताना महाराष्ट्रात ११ वा क्रमांक मिळवला!

तरुण रघुनाथच्या मनात जिज्ञासा इतकी अतृप्त होती की तो अनेकदा गिरगावच्या मॅजेस्टिक बुकस्टॉलबाहेर बसून नवीन पुस्तके वाचत असे आणि पटकन परत करत असे कारण त्याच्याकडे विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. डाँक्टर माशेलकर यांनी पुण्यातील पिंपरी येथील केलेल्या भाषणात म्हणाले.

‘‘बालवयापासूनच मला वाचनाची गोडी लागली. शालेय जीवनातही मी प्रचंड वाचन केले. त्याचा मला पुढील आयुष्यात मोठा फायदा झाला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मी वाचत राहीन. तुलनेने लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. मात्र, सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत साधना केली पाहिजे,’’

बोर्डाच्या परीक्षेनंतर त्यांनी आर्थिक अडचणींमुळे पुढील शिक्षण सोडण्याचा विचार केला पण माशेलकर यांच्या आई, हे त्यांचे प्रमुख प्रेरणास्थान होते. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून त्यांच्या आई काही कमाई करत असत. एकदा त्या गिरगावातल्या काँग्रेस भवनात काम मागण्या साठी गेल्या. संबंध दिवस तिथे उभे राहूनदेखील त्यांना काम दिले गेले नाही याचे कारण त्या कामासाठी तिसरी उतीर्ण असणं आवश्यक होते आणि माशेलकरांच्या आईंचे तेवढे शिक्षण नव्हते. खोटे बोलून त्यांना कदाचित ते काम मिळवता आले असतेही. पण तसे न करता, त्यांनी स्वतःच्याच मनाशी निर्धार केला – आज माझे शिक्षण नाही म्हणून मला काम मिळाले नाही, पण माझ्या मुलाला मात्र मी जगातले सर्वोच्च शिक्षण देईन. हा निर्धार पुरा करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले.

तथापि, त्यांच्या आईचे प्रोत्साहन आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टच्या आर्थिक पाठिंब्यामुळे त्यांना मुबंईतील प्रतिष्ठित जय हिंद महाविद्यालयात प्रवेश मिळण्यास मदत झाली. नेहमीप्रमाणे, त्याने कठोर परिश्रम केले आणि आंतरराज्य परीक्षेत २ रे आले. म्हणूनच नंतर , २००३ साली जय हिंद कॉलेजने त्यांना सर्वात प्रतिष्ठित माजी विद्यार्थी म्हणून सन्मानित केले.

भारतातील रासायनिक उद्योगाच्या उज्ज्वल भविष्यामुळे प्रेरित होऊन, त्यांनी केमिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी मुंबईतील पूर्वीची UDCT व आताची रासायनिक तंत्रज्ञान संस्था ( ICT Institute of Chemical Technology) या संस्थेत प्रवेश घेतला. पदवी प्राप्त केल्यानंतर, त्याच्याकडे शिष्यवृत्तीसह पुढील पदव्युत्तर पदवी मिळविण्यासाठी परदेशात जाण्याचा पर्याय होता. त्याऐवजी, त्यांनी रासायनिक अभिक्रियांमध्ये ( Chemical engineering) मास ट्रान्सफरच्या क्षेत्रामध्ये प्रो. एम.एम. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर म्हणून UDCT मध्ये त्यांचे काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रो. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पूर्ण केली आणि अवघ्या तीन वर्षांत त्यांचा प्रबंध पूर्ण केला. १९६९ साली मुंबई विद्यापीठाच्या रसायन अभियांत्रिकी विभागाच्या तत्कालीन संचालक प्रा. एम्‌. एम्‌ शर्मा या अत्यंत सृजनशील संचालकाच्या मार्गदर्शनाखाली, माशेलकरांनी आपली पी.एच.डी.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी युरोपमधील सल्फोर्ड विद्यापीठात जाऊन पोस्ट डॉक्टरल संशोधनही केले.

डॉ. माशेलकर यांनी २३व्या वर्षी पीएच.डी. मिळवून नॉन न्यूटोनियन, फ्लुइड मेकॅनिक्स, जेल विज्ञान आणि पॉलिमर अभिक्रिया अशा मूलभूत संशोधनांद्वारे वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकरांना ६० पेक्षा अधिक पुरस्कार मिळाले आहेत. जानेवारी २०१८पर्यंत ३८ डॉक्टरेट मिळाल्या आहेत, आणि ३९वी डॉक्टरेट फेब्रुवारी २०१८मध्ये मिळाली. ३८हून ही अधिक संस्थांच्या संचालक मंडळांवर त्यांची निवड झाली आहे. जेव्हा रघुनाथ माशेलकर हे सी.एस.आय.आर.चे प्रमुख झाले होते त्यावेळी सी.एस.आय.आर.मध्ये २८,००० लोक काम करत होते. देशभर जागोजागी प्रयोगशाळा वसवल्या होत्या. परंतु त्या अपेक्षितपणे काम करत नव्हत्या. माशेलकरांनी व्हिजन नावाची योजना आखली. चाळीस प्रयोगशाळांचे समांतर चालणे थांबवून, त्यांना एका ध्येयाने आणि काम करण्याच्या एका विशिष्ट पद्धतीने बांधले आणि मग त्यातून भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक अचाट पर्व निर्माण झाले.

२३५हून अधिक शोध निबंध, १८हून अधिक पुस्तके आणि २८हून अधिक पेटंटे त्यांच्या नावावर आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, ते १९९८ मध्ये रॉयल सोसायटीचे फेलोशिप २००५ मध्ये नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्स (यूएसए) चे फॉरेन असोसिएट, २००३ मध्ये यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे फॉरेन फेलोशीप, रॉयल अकादमीचे फेलोशीप म्हणून निवडले गेले. १९९६ मध्ये ईजिंनिअरींग आणि २००० मध्ये वर्ल्ड ॲकॅडमी ऑफ आर्ट अँड सायन्स (यूएसए) चे फेलोशीप. १९९८ मध्ये जेआरडी टाटा कॉर्पोरेट लीडरशिप अवॉर्ड जिंकणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते आणि २००५ मध्ये बिझनेस वीक (यूएसए) स्टार ऑफ एशिया अवॉर्ड जिंकणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते, त्यांना हा पुरस्कार अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश Snr यांच्याकडून मिळाला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समित्यांच्या सदस्यत्वाद्वारे त्यांचे ज्ञान आणि कौशल्य देखील मोठ्या प्रमाणात सामायिक केले गेले आहे.

आयुष्यातली कमीतकमी १२ वर्षं तरी अनवाणी पायांनी चालणारे, सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर हे, पुढे इंग्लंडमध्ये ज्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला त्या आयझॅक न्यूटनने ज्या पुस्तकात सही केली आहे, त्या पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा सन्मान मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय आहेत याचा आपणास नेहमीच गौरव वाटत राहील.

लेखन व माहिती संकलन : रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी

संग्राहिका  : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments