श्री मंगेश मधुकर
इंद्रधनुष्य
☆ “लिफ्ट…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
मस्तपैकी थंडीचे दिवस,सकाळी सातची वेळ,खरंतर डबल पांघरून घेऊन झोपायची अतीतीव्र इच्छा तरीही मोह आवरून फिरायला जाण्यासाठी उठलो.नेहमीच्या रस्त्यावरून जाताना आजही ‘तो’ दिसला.गोल चेहरा,मोठाले डोळे त्यावर काडीचा चष्मा,फ्रेंच कट दाढी,तुळतुळीत टक्कल,अंगात निळा टी शर्ट,ग्रे ट्रॅक पॅन्ट अशा अवतारात चौकात स्कूटरवरून चकरा मारणारा ‘तो’ लक्षात रहायचं कारण म्हणजे त्याचं वेगवेगळ्या लोकांना स्कूटरवरून घेऊन जाणं आणि पुन्हा चौकात येऊन थांबणं.त्याचं वागणं पाहून आश्चर्य वाटलं आणि कुतूहलही जागं झालं.नेहमीप्रमाणं ‘तो’ चौकात उभा असताना जवळ जाऊन विचारलं.
“सर,एक मिनिट!!”
“येस”
“तुमच्या सोबत चहा घ्यायचाय”
“का?”
“चहाला कारण लागतं नाही.”मी
“अनोळखी व्यक्तीकडून आमंत्रण असेल तर लागतं”
“ओके”मी नाव सांगितल्यावर त्यानेही नाव सांगितलं.”
“आता ओळख झाली.चला चहा घेऊ,तुमच्याशी थोडं बोलायचं होतं.”
“नक्की,पण पाच मिनिटानंतर,इथंच थांबा.आलोच” उत्तराची वाट न पाहता ‘तो’ स्कूटर घेऊन गेला.मी फक्त पाहत राहिलो.रस्त्यावरून घाईत चाललेल्या माणसाजवळ स्कूटर थांबवून ‘तो’ काहीतरी बोलला लगेच पायी चालणारा मागच्या सीटवर बसला अन दोघं निघून गेले.अवघ्या काही मिनिटांनी ‘तो’ परत आला.(संडे डिश™)
“सॉरी,सॉरी,तुम्हांला थांबाव लागलं”
“नो प्रॉब्लेम.चला हॉटेलमध्ये जाऊ”मी
“नको.त्यापेक्षा टपरीवरचा चहा भारी असतो”
“एक विचारायचं होतं”
“बिनधास्त”
“अनेक वर्षे सकाळी फिरायला जातो.वेगवेगळी माणसं बघायला मिळाली पण त्यात तुम्ही फार हटके वाटला.”
“काही विचित्र वागलो का”
“आठ दिवस तुम्हांला पाहतोय.सकाळी चौकामध्ये स्कूटर घेऊन उभे असता.लोकांना स्कूटरवरून सोडून आल्यावर परत इथे थांबता याविषयीच बोलायचं होतं.” (संडे डिश™)
“नक्की काय समजून घ्यायचयं”
“मला वाटतं तुम्ही लोकांना स्वतःहून लिफ्ट देता?”
“हो”
“का? कशासाठी?”
“आवड म्हणून”
“वेगळीच खर्चिक आवड आहे.हरकत नसेल तर जरा सविस्तर सांगता”
“ आवड खर्चिक असली तरी परवडतं म्हूणन करतो.आता पर्यंत टिपिकल आयुष्य जगलो.जबाबदाऱ्या आणि टेंशन्स घेऊन नोकरी केली. पन्नाशीनंतर मात्र एकेक व्याप कमी केले.व्हीआरएस घेतल्यावर छोटासा बिझनेस सुरू केला.गरजेपुरतं आणि भविष्यासाठी कमावलंयं.इतके दिवस फक्त स्वतःपुरतं आणि फॅमिलीचा विचार करून जगलो.आता इतरांसाठी काहीतरी करावं असं खूप वाटतं होतं.दिवासतला थोडा वेळ चांगल्या कामासाठी द्यावा असं ठरवलं.माझ्या निर्णयाला घरच्यांनी पाठिंबा दिला.”
“उत्तम विचार.”
“त्यानुसार विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना भेट दिली.सर्वांचं काम चांगलं होतं पण माझं मन रमलं नाही.काहीतरी वेगळं काम करायचं होत पण नक्की सुरवात कशी करायची हेच समजत नव्हतं”
“या कामाची सुरवात कशी झाली”
“एकदा मुलीला कॉलेजला जाण्यासाठी निघायला उशीर झाला म्हणून स्कूटरवरून तिला बसस्टॉपला सोडलं.परत येताना एकजण रस्त्याच्या बाजूने पाठीवर सॅग,हातात सुटकेस घेऊन अत्यंत गडबडीत चालत होता.घामाघूम झालेल्या त्याला एकही रिक्षा मिळत नव्हती.जाम वैतागलेला होता.त्याला पाहून मला कसंतरीच वाटलं. (संडे डिश™)
“मग!!”
“त्याच्या जवळ गेलो आणि स्कूटरवर बसायला सांगितल्यावर त्याचा चेहरा भूत पाहिल्यासारखा झाला पण ताबडतोब स्कूटरवर बसला.बस स्टॉपला वेळेत पोचल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला खूप समाधान मिळालं.बसमध्ये शिरताना तो सारखा “थॅंकयू,थॅंकयू” म्हणत होता.त्याच्या आनंद पाहून मला दुप्पट आनंद झाला.”
“नंतर हे लिफ्ट देण्याचं काम सुरू केलं”
“हो,हटके काम करण्याचा मार्ग अचानक सापडला”
“खरंच वेगळं काम आहे”
“तसं पाहिलं तर खूप साधी गोष्ट आहे.खूप महत्वाचं काम असेल किवा परगावी जायचं असेल तर घरातून बाहेर पडायला उशीर होतो खूप धांदल उडते.सर्वांनीच या परिस्थितीचा कधी ना कधी अनुभव घेतलेला आहे.अशावेळी रिक्षा मिळत नाही.ऑनलाइन राईड बुक होत नाही.सोडायला येणारं कोणी नसतं आणि वेळ गाठायची असते नेमकं अशातच जर न मागता मदत मिळाली तर होणारा आनंद हा फार फार मोठा असतो.मला लोकांना आनंदी करण्याचा मार्ग सापडला.म्हणून मी रोज सकाळी स्कूटर घेऊन उभा असतो.” (संडे डिश™)
“फार भारी कल्पनायं.लिफ्टची गरज आहे अशांना कसे शोधता कारण सकाळी व्यायामासाठी भराभर चालणारे अनेकजण असतात.”
“फार सोप्पयं, टेन्शनग्रस्त चेहऱ्यानं वेळ गाठण्यासाठी लगबगीनं चालणारे पटकन ओळखू येतात.”
“लिफ्ट सेवेला लोकांचा प्रतिसाद मिळतो?”
“खूप छान!!घरातून निघताना उशीर झालेला असताना जर लिफ्ट मिळाली तर कोणीही आनंदानं तयार होणारच ना”
“ही सेवा सुरू केरून किती दिवस झाले”
“दोन महीने”
“पैसे घेता”
“गरजूंना लिफ्ट देतो त्यामुळे पैशाचा प्रश्नच येत नाही आणि अपेक्षाही नाही.”
“ग्रेट ”
“कोणी घाईघाईत चालताना दिसलं की मी जवळ जाऊन फक्त ‘बसा’ एवढंच म्हणतो.अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे लोक प्रचंड खुष होतात.तणावाखाली असणाऱ्या चेहऱ्यावर छान हसू फुटतं ते माझ्यासाठी लाखमोलाचं आहे”
“रागावणार नसाल तर एक विचारू” (संडे डिश™)
“अवश्य”
“हे सगळं कशासाठी करता”
“छान वाटतं म्हणून…”
“एक से भले दो.माझ्याकडे सुद्धा स्कूटर आहे.उद्यापासून येतो” म्हटल्यावर ‘तो’ मोठ्यानं हसला आणि अचानक स्कूटर सुरू करत म्हणाला “आलोच”.मागे वळून पाहिलं तर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं पाठीवर बॅग, हेडफोन लावलेला तिशीतला आयटी वाला कंपनीची बस गाठण्यासाठी ताडताड चालत होता.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈