श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – ३ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(साहेबांनी त्या पळपुट्यांकडे पाहून असे काही म्हटले की त्यापैकी दोन साधे शिपाई परतले आणि म्हणाले… “साब… अब हम आपके अंडर हैं… आप जो कहेंगे वो करेंगे!” त्यांचा अधिकारी मात्र तिथून पळून गेला तो गेलाच.) इथून पुढे —  

समरपाल सिंग साहेबांनी आपल्या आडोशाच्या वर थोडेसे डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्यांच्या शेजारचा राजपूत सैनिक, जो खरं तर वयाने मोठा पण अधिकाराने कमी स्तरावरचा होता… समरपाल सिंग साहेब त्याचे वरिष्ठ होते, खास राकट आवाजात म्हणाला, ”साब जादा उछलो मत! ये आपका नीला हेल्मेट उनको दिखेगा तो टरबुजे की तरह फट जाओगे!” तो बिचारा आपल्या या साहेबाच्या काळजीपोटी तसं म्हणून गेला होता. साहेब म्हणाले, “अरे भाई, देखने तो दो दुश्मन है कौन और कितने!”   

साहेबांनी आदेश दिला, “एक गोली… एक दुश्मन!” गोळी वाया जाता कामा नये! 

समरपालसिंग साहेबांनी रायफल तयार केली… आपला नेताच आपल्या खांद्याला खांदा लावून लढणार म्हटल्यावर त्या राजपुतांना आणि तिथल्या इतर सैनिकांना भलताच चेव चढला. 

आता बंडखोर अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होते. त्यांचे ते लालबुंद डोळे.. दारूच्या नशेत तर्र हजारो यमदूत पुढे पुढे येताहेत…. त्यांना त्यांचे विरोधक संपवून टाकायचे होते… आणि मध्ये येणाऱ्या शांतिसैनिकांनाही ते ठार मारायला तयार होते! 

शेजारच्या राजपुताने आपली रायफल लोड करीत करीत साहेबांकडे डोळे मोठे करून पाहिले… डोळे सांगत होते जणू…. ‘अब समय आ गया है…. मारेंगे तो साथ साथ… मारते मारते मरेंगे तो साथ!’ साहेबांनीही डोळ्यांनीच हुंकार भरला… उजव्या हाताची मूठ बंद केली आणि ‘जरूर’ अशा अर्थाने अंगठा वर करून दाखवला…

कुंपणापलीकडून यमदूत पुढे पुढे सरकत होते… त्यांचे लालबुंद डोळे भिरभिरत होते… सावज शोधत होते… आपल्या बहादुरांनीही त्या मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याचे धाडस सुरू केले….. आपल्याही सैनिकांच्या नजरा म्हणत होत्या… तु एकदा ट्रिगर तर दाबून बघ रे…… एक गोळी तर झाडून पहा आमच्या दिशेने… मग पहा आमच्या गोळीचा निशाणा! 

दिवसभर गोळीबार सुरू होता…. आपला एकही भारतीय सैनिक जागचा हलला नाही… कुणीही जीवाच्या भीतीने पळून गेलं नाही… शत्रू टप्प्यात येताच त्याला अचूकपणे टिपले जात होते….. 

दिवस संपता संपता हल्लेखोरांचा एक प्रतिनिधी शिबिरापर्यंत बोलणी करण्यासाठी म्हणून आला. ‘शिबिरात आश्रय घेतलेल्या त्या छत्तीस जणांना आमच्या हवाली करा… आम्ही माघारी जाऊ!’ त्याने अट ठेवली.  

समरपाल सिंग साहेब म्हणाले…. “शरणार्थ्यांना मृत्यूच्या हवाली करणं आमच्या तत्वात बसणारं नाही….” प्रतिनिधी परतला. 

रात्र झाली. आपल्या सैनिकांपैकी कुणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता! सकाळी त्या बंडखोरांनी एकदम तोफगोळे डागायाला आरंभ केला! साहेबांच्या सैन्याने जोरदार उत्तर द्यायला आरंभ केल्याने हल्लेखोर मागे सरकू लागले.. 

पण एक चमत्कारच झाला म्हणायचा. नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या सैनिकांच्या तुकडीच्या गोळीबाराच्या टप्प्यात हे मागे सरकत असलेले बंडखोर आपसूक आले. त्यांचे आता सॅंडविच झाले होते. आपल्या त्या सैनिकांनी समरपाल सिंग साहेबांना संदेश दिला… ‘साहेब… शत्रू आमच्या टप्प्यात आलाय… तुम्ही बंकरमध्ये लपून रहा… आम्ही इकडून गोळीबार करू….’ आणि त्यांनी तसे केलेसुद्धा. त्यात कित्येक बंडखोर रक्ताच्या थारोळ्यात पडले! उरलेले बंडखोर मग आता शिबिराच्या दिशेने पळाले.

मग समरपाल सिंग साहेबांनी आपल्या या नदी तीरावरल्या सैन्याला आदेश दिला… “तुम्ही गोळीबार थांबवा… आडोसा घ्या… आता आम्ही इकडून गोळीबार सुरू करतो!” मग… ‘एक गोली एक दुश्मन’ असा हिशेब सुरू होता तो पुढे सुरू झाला…. केवळ छत्तीस भारतीय जवानांनी अनेक बंडखोरांचा निकाल लावला होता…

शिबिरात असलेले अधिकारी, शरणार्थी जीव मुठीत धरून होते! मदत आली काही तासांनी, पण ती सुद्धा अगदी तुटपुंजी आणि अप्रशिक्षित सैनिकांची. 

इतका वेळ समरपाल साहेबांचे गाढे वीर खिंड लढवतच राहिले होते! या धुमश्चक्रीत आपले दोन वीर कामी आले! सुभेदार धर्मेश संगवान (८,राजपुताना रायफल्स) आणि आर्मी मेडिकल कोअरचे सुभेदार कुमार पाल सिंग हे ते दोन हुतात्मा जवान! अमेरिकन महिला लष्करी अधिकारी आणि आणखी काही जणांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

या प्रचंड संघर्षानंतर भारतीय तुकडीला माघारी फिरण्याचा आदेश मिळाला! आपले सैनिक शब्दाला, कर्तव्याला प्राणांची बाजी लावून जागले होते….. युद्ध कुठेही असो…. आमचा लढाऊ बाणा कायम असतो… हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाने भारतीय सैन्याचा नेहमीच गौरव केला आहे. काहीच काळापूर्वी आपल्या एक हजार जवानांना संयुक्त राष्ट्र संघाने खास स्मृतिचिन्हे देऊन त्यांना सन्मानीत केले आहे… आजही आपले शेकडो सैनिक आणि अधिकारी आंतरराष्ट्रीय शांतिसेनेमध्ये तैनात आहेत… तिथेही ‘भारत माता की जय!’ घोषणा गुंजत असतात! भारतीय सोनं जगातल्या कोणत्याही आगीत घातलं तरी तेजानेच चकाकतं!  

युद्ध भयावह असतं… पण त्याला सैनिकांचा इलाज नसतो… त्यांना फक्त कर्तव्य पार पाडणं माहित असतं.. नव्हे, त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिलेले असते. आणि याबाबतीत भारतीय सैनिकांची बरोबरी इतर फारसे कुणी करू शकत नाही… कारण आपले सैनिक एकमेवाद्वितीय आहेत… आपलं सैन्य देशाशी इमान राखणारं आहे…  प्राणांची आहुती देऊनही!

कॅप्टन हुद्द्यावरून नंतर मेजर हुद्दा प्राप्त समरपाल सिंग साहेब आता सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या आफ्रिकेतील अनुभवाविषयी इंटरनेटवर खूप काही वाचण्या, ऐकण्यासारखं, पाहण्यासारखं आहे.

मेजर गौरव आर्य (सेवानिवृत्त) नावाचे एक माजी लष्करी अधिकारी सुद्धा विडीओजच्या माध्यमातून आपल्या सैनिकांविषयी भरभरून आणि अभ्यासपूर्ण सांगत असतात.. धन्यवाद! 

इंग्लिश आणि हिंदीत असलेली ही माहिती आपल्या मराठी वाचकांसाठी मी जमेल तशी मराठीत लिहिली आहे… यात माझे स्वत:चे काही नाही. तपशील, नावे, घटनाक्रम, यांत काही तफावती असू शकतात…. पण त्यातील आशय नक्कीच महत्त्वाचा आहे. 

नऊ जुलै हा दक्षिण सुदानचा स्वातंत्र्यदिन…. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांविषयी या दिवसाच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख सविनय सादर. 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments