इंद्रधनुष्य
☆ शेवटचे चौदा मीटर… लेखक : श्री कपिल काळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
उत्तराखंडमधील बारकोट ते सिलक्यारा ह्या बोगद्यात अडकलेले 41 कामगारांची सुटका होण्याकरिता आता फक्त 14 मीटर अंतर खोदायचे राहिले आहे !
12 नोव्हेंबर रोजी हे कामगार बोगदा कोसळल्याने अडकले त्यांना 10 दिवसात आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला आहे. शेवटचे 14 मीटर अंतर पार झाले की उद्यापर्यंत हे सगळे सुखरूप बाहेर पडलेले असतील.
हा आहे नवा भारत! तांत्रिक प्रगती आणि आत्मविश्वास ह्या बळावर हे साध्य झाले आहे.
चार धाम रस्ते प्रकल्पाअंतर्गत हा सिलक्यारा बारकोट बोगदा राष्ट्रीय महामार्ग 134 वरती यमुनोत्रीच्या बाजूला बनवला जात आहे.
काम सुरू असताना 12 नोव्हेंबर रोजी अचानक बोगद्यावरील जमीन माती कोसळून 41 कामगार आत अडकले. त्यानंतर सुरू झाला त्यांना सोडवण्याचा प्रयत्न !
1.नॅशनल हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,
2.टीहरी हायड्रोइलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, 3.सतलज जल विद्युत निगम,
4.ओएनजीसी आणि
5.रेल विद्युत निगम लिमिटेड
.. ह्या पाच सरकारी कंपन्या ह्याच परिसरात काही ना काही काम करत आहेत. त्यांना ह्या सुटकेच्या कामासाठी पाचारण केले गेले.
याकरिता एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला गेला. ह्यातील प्रत्येक कंपनीला त्यातील एकेक जबाबदारी दिली गेली.
- ह्यात बोगद्याच्या सिलक्यारा बाजूकडून साधारण 80 मीटर लांबीचा आडवा, 900 मिमी व्यासाचा बोगदा तयार करून त्यातून 800 मिमी व्यासाचे लोखंडी पाईपटेलिस्कोपिक पद्धतीने घालणे.ह्या 800 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून ह्या कामगारांना सोडवणे.
- बोगद्याच्या बारकोट बाजूने 480 मीटर लांबीचा आडवा बोगदा खोदणे.
- हा बोगदा ज्या टेकडी खालून जातो, तिच्या माथ्यावरून सुरुवात करून साधारण 90 मीटर खोलीचे विवर खोदून त्यातून कामगरापर्यंत पोचणे .
- बारकोट बाजूनेएक खोल विवर खोदणे.
- कामगारापर्यंतअन्नपाणी तसेच व्हिडिओ कॅमेरा पोचवण्याकरिता चार इंच पाईप लाईन बनवणे.
ह्या प्रत्येक कामगिरी वरील कंपन्यांना अनुक्रमे देण्यात आल्या.
ह्या कामाकरीता लागणारी अजस्त्र यंत्रसामग्री, खोदाई यंत्रे, युद्ध पातळीवर प्रयत्न करून परदेशातून मागवण्यात आली.
भारतात वेगवान माल वाहतुकीकरिता समर्पित रेल्वे परिवहन मार्ग बनवला गेला आहे. त्यावरून एक खास मालगाडी चालवून गुजरातमधील करंबेली ते ऋषिकेशपर्यंत सामग्री पोचवली गेली. ह्या मालगाडीने 1075 किमी अंतर 18 तासात पार केले.
सर्व पाचही कंपन्यांनी त्यांना नेमून दिलेले काम एकाच वेळी सुरू केले. जो पहिल्यांदा पोचेल तिथून कामगारांना बाहेर काढायचे ठरवले. ह्यासाठी अजस्त्र मालवाहू ट्रक ट्रेलर जातील असे रस्ते बनवण्यात आले.
अडकून 6 दिवस झाल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्याने, आतील कामगारांचे मनोधैर्य खचत चालले होते. बोगद्याच्या ज्या भागात कामगार अडकले होते त्याची लांबी 2 किमीआहे आणि त्या भागात सिमेंट काँक्रिट चे छत सुद्धा पूर्ण झाले आहे. त्यामुळे कामगार सुरक्षित असण्याबाबत खात्री होती. फक्त त्यांना बाहेर काढण्याकरिता नवा भारत कामाला लागला. नवीन भारताची इच्छाशक्ती आणि तांत्रिक प्रगती कामाला लागली.
18 नोव्हेंबर रोजी रेल विद्युत निगमला चार इंची पाईप कामगारांपर्यंत पोचवण्यात यश आले. त्यातून व्हिडिओ कॅमेरा टाकून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला. कामगारांच्या नातेवाईकांना त्यांच्याशी बोलायला दिले गेले. कामगारांना सहा दिवसानंतर काही पहिल्यांदाच काहीतरी खायला मिळाले. ह्यात सुकामेवा चॉकलेट पॉपकॉर्न असा आहार होता. एका मानसोपचार तज्ञ , योगा प्रशिक्षक ह्यांची नियुक्ती करून कामगारांचे मनोधैर्य खचणार नाही ह्याची काळजी घेतली गेली
त्यानंतर ह्या चार इंची पाईप लाईन च्या जागी सहा इंची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यातून खिचडी दलिया असे गरम अन्न कामगारांना देण्यात आले अडकल्यानंतर 7 दिवसांनी असे गरम अन्न त्यांनी खाल्ले. तसेच कामगारांना टूथ ब्रश, पेस्ट, टॉवेल, कपडे, अंडरगारमेंट, साबण असे अत्यावश्यक सामान सुद्धा ह्या नवीन पाइपलाइन द्वारे पोचवण्यात आले.
ह्यातील बरेच कामगार तंबाखू खाणारे आहेत , त्यांनी गेले दहा दिवस तंबाखू खाल्ला नाही, त्यामुळे त्यांना withdrawl symptom येऊ नयेत त्यातून मानसिक विकार होऊ नयेत म्हणून त्यांना तंबाखू सुद्धा पोचवण्यात आला.
त्यांच्या कुटुंब तसेच इतर बाहेरील कामगारांनी त्यांना सतत बोलत ठेवले जेणेकरून त्यांचे मनोधैर्य कायम राहील.
तारीख 19 नोव्हेंबर भारतीय वायू दलाने झारखंड येथील खाणीमधून काही महत्वाची यंत्रसामुग्री मालवाहू विमानाने आणली. तसेच अमेरिकेहून खास खोदाई मशीन आणण्यात आली. त्याने बचाव कार्याला अजून जोर प्राप्त झाला.
हे सगळे बचाव कार्य National Disaster Management Authority चे प्रमुख निवृत्त जनरल अता हसनैन ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.
त्यांनी एक गोष्ट फार उत्तम केली, की कोणत्याही चॅनलवाल्यांना बोगद्याजवळ येऊन बातम्या चालविण्यास आणि बचाव कार्याचे व्हिडिओ काढून ब्रेकिंग न्युज चालविण्यास मज्जाव केला. भारताच्या पंतप्रधान कार्यालयाकडून रोज आढावा घेतला जात होता.
तारीख 20 नोव्हेंबर रोजी जिनिव्हा येथील International Tunneling and Undergound Space Association चे प्रमुख अरनॉल्ड डिक्स ह्यांना सुद्धा बचाव कार्यासाठी आणण्यात आले. त्यांनी पंचसूत्री कार्यक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे बाचवपथकाला काही इजा झाल्यास किंवा तिथे जमीन खचल्यास , स्वतःच्या सुटकेचा कोणताही मार्ग नसल्याने काँक्रिट बॉक्स कल्वर्ट टाकून बचाव पथकाच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त करण्यात आला. अरनॉल्ड डिक्स ह्यांनी बारकोट टेकडीच्या माथ्यावर जाऊन तेथील विवर खोदणारे पथक( पंचसूत्री पैकी तिसरा पर्याय) पहिल्यांदा कामगारांपर्यंत पोचेल असा अंदाज बांधला.
तारीख 21 नोव्हेंबर, आज बोगद्याबाहेर 41 अँब्युलन्स 2 हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आली. कोविड करिता बनवलेले एक छोटे हॉस्पिटल पुन्हा धुवून पुसून स्वच्छ करण्यात आले. तिथे 15 डॉक्टर ची एक टीम तयार ठेवली गेली.
काल परवा पासून पंचसूत्री पैकी पर्याय क्रमांक 1 म्हणजे सिल्क्यारा बाजूने आडवा बोगदा खोदणाऱ्या टीमला भलतेच यश मिळाले त्यांनी अमेरिकन ऑगर ड्रिलचा वापर करत दोन दिवसात जबरदस्त प्रगती केली आणि कामगारांपासून फक्त 14 मीटर अंतरापर्यंत येऊन त्यांचे ड्रिल एका कठीण वस्तूला आदळले.
हे ड्रिल मशीन पुन्हा बाहेर काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आणि दुप्पट जोराने खोदाईचे काम सुरू केले गेले.
चिली देशात असेच एका खाणीत अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात 69 दिवस लागले होते. तेव्हा देखील आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रचंड मदत कार्य केले होते. थायलंड आणि म्यानमार सीमेवर एका गुहेत अडकून पडलेल्या मुलांना असेच दहा दिवसानंतर बाहेर काढण्यात आले होते.
हा लेख तुम्ही वाचेपर्यंत नॅशनल हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चमूला 900 मिमी व्यासाची पाइपलाइन आडव्या स्थितीत ड्रिल मारून कामगारांपर्यंत पोचण्यात यश आले असेल आणि शेवटचे 14 मीटर अंतर पार करून कामगार यशस्वी रित्या बाहेरदेखील आले असतील. ह्यामागे सर्वांची मेहनत फळाला येईलच !
हा आहे नवीन भारत, तांत्रिक प्रगती आणि इच्छाशक्तीच्या बळावर हा भारत कोणत्याही आव्हानाला सामोरा जाण्यास सक्षम आहे. ह्या बदलेल्या भारताचा मला अभिमान आहे!
लेखक : श्री कपिल काळे
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈