?इंद्रधनुष्य? 

☆ सारागढीची लढाई.. भाग 2 – श्री राजेश खवले ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(चौकीच्‍या तटबंदीवरून होणारा मारा इतका तीव्र होता की, अफगाणांना  सारागढीच्‍या तटापर्यंत पोहोचणे मुळीच जमत नव्‍हते.) इथून पुढे ——

थोडयाच वेळात ईश्‍वरसिंह गोळी लागुन गतप्राण झाला. हेलीकोग्राफ हाताळणारा गुरुमुखसिंह या सर्व घडामोडी लोखार्टच्‍या किल्‍ल्यावर स्थित कर्नल हटन याला कळवत होता.

वारंवार हल्‍ले करुनही अफगाण -पश्‍तूनांना यश येत नव्‍हते. आता शत्रुने एक आगळीच युक्‍ती लढविली. त्‍यांनी सारागढीच्‍या आजूबाजूला असणा-या झुडूपांना आग लावून दिली. त्‍यातून धुरांचे प्रचंड लोट निर्माण झाले. त्‍या धुरामध्‍ये स्‍वतःला लपवत दोन पश्‍तून सैनिक सारागढीच्‍या तटबंदीजवळ येवून पोहोचले. टोकदार अशा चाकुंनी त्‍यांनी तटबंदीचे दगड उकरून काढायला सुरुवात केली. भिंतीतला चुना उकरुन त्‍यांनी काही दगड मोकळे केले, लवकरच त्‍यांनी तटबंदीला भगदाड पाडले. तटबंदीला भगदाड पडल्‍यामुळे शीख सैनिकांना भगदाडाकडे वळावे लागले. दरवाजावरील सुरक्षा त्‍यामुळे कमकुवत झाली. शेवटी भगदाडातून शत्रुने चौकीत प्रवेश केला. शीख सैनिक प्राणपणाने लढत होते. त्‍यांनी हातघाईची लढाई सुरु केली. शत्रुचे सहाशेहून जास्‍त सैनिक मारल्‍या गेले. लढता लढता सर्व शीख सैनिक कामी आले. हेलीकोग्राफ हाताळणारा एकटा गुरुमुखसिंह तेवढा बाकी होता. त्‍याने कर्नल हटनकडून हेलीकोग्राफ बंद करण्‍याची परवानगी घेतली. संदेशवहनाची सामग्री एका चामडयाच्‍या पिश्‍वीत गुंडाळली. रायफलला संगीन लावून तो शत्रूवर तुटुन पडला. मृत्‍युने त्‍याला कवेत घेण्‍यापुर्वी त्‍याने शत्रुचे २० सैनिक ठार केले. ‘सवा लाखशे एक लढावू’ म्‍हणजे काय असते ते सारागढीच्‍या २१ शीख सैनिकांनी जगाला दाखवून दिले.

सारागढीच्‍या लढाईत सर्व २१ शीख सैनिक शहीद झाले. शत्रूने सारागढीला आग लावून दिली. सारागढी नष्‍ट केल्‍यानंतर अफगाणांनी आपला मोर्चा किल्‍ले गुलीस्‍तानकडे वळविला. पण तोपर्यंत अधिकची कुमक किल्‍ले गुलिस्‍तानपर्यंत पोहोचली होती. दोनच दिवसांनी म्‍हणजे १४ सप्‍टेंबर, १८९७ रोजी शीख रेजिमेंटने तोफांचा भयंकर मारा करून सारागढी पुन्‍हा जिंकून घेतली.

सारागढीची लढाई सामुहिक शौर्याचे अत्‍यंत प्रखर उदाहरण आहे. युनेस्‍कोने एकमताने ठरविलेल्‍या सामुहिक शौर्याच्या आठ घटनांमध्‍ये सारागढीच्‍या लढाईचा समावेश होतो. सारागढीच्‍या लढाईत प्राणांची आहूती देणारे सर्व २१ सैनिक पंजाबच्‍या (भारत) फिरोजपूर जिल्‍हयातील होते. या सर्व सैनिकांची नावे नूद असणारा स्‍तंभ सारागढी येथे उभारण्‍यात आला आहे. या सर्व सैनिकांना मरणोत्‍तर ‘इंडीयन ऑर्डर ऑफ मेरीट’ ने सन्‍मानीत करण्‍यात आले. हा सध्‍याच्‍या ‘परमवीरचक्र’ पुरस्‍काराच्‍या बरोबरीचा तत्‍कालीन सन्‍मान होता. एकाच लढाईतील सर्व सैनिकांना इतका मोठा सन्‍मान मिळाल्‍याची ही जगातील एकमेव घटना आहे. कमांडींग ऑफिसरने पंजाबच्‍या गव्‍हर्नरला या लढाईची हकिकत कळविली. अशा प्रकारे या लढाईची बातमी ब्रिटीश सरकारपर्यंत जावून पोहोचली. ब्रिटीश पार्लमेंटमध्‍ये जेव्‍हा सारागढीच्‍या लढाईची हकिकत सांगण्‍यात आली तेव्‍हा शहिदांच्‍या सन्‍मानार्थ सर्व सदस्‍य उभे राहिले होते.

आजच्‍या शिख रेजिमेंटद्वारा १२ नाव्‍हेंबर हा दिवस ‘रेजिमेंटल बॅटल ऑनर’ दिवस म्‍हणून पाळल्‍या जातो. थर्मापीलीच्‍या खिंडीत लढणारे ग्रिक सैनिक आणि सारागढी लढविणारे शिख सैनिक यांच्‍या शौर्याची धार सारखीच आहे. चुहार सिंह यांनी सारागढीच्‍या लढाईत शहिद झालेल्‍या शिख सैनिकांचा गौरव करणारी ‘खालसा बहादूर’ ही पोवाडयासारखी दिर्घ कविता पंजाबी भाषेत रचली आहे. 

आयुष्‍य म्‍हणजे एक लढाईच आहे. ही लढाई शौर्याने आणि धैर्याने लढावी लागते. सध्याच्या कोरोना विषाणूने ग्रासलेल्या वातावरणात याचा प्रत्यय सातत्याने येत आहे. आयुष्‍याच्‍या लढाईत ज्‍यांना यश प्राप्त करावयाचे आहे त्‍यांनी सारागढी लढविणा-या त्‍या एकविस शिख सैनिकांचा आदर्श आपल्‍या नजरेपूढे सतत ठेवला पाहिजे. सारागढीच्‍या शिख सैनिकांप्रमाणे जे लढतील ते आयुष्‍याच्‍या लढाईत निश्चितच विजयी होतील.

समाप्त 

श्री राजेश खवले 

संग्राहक : सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments