डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-3 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

(त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.) इथून पुढे — 

पण अरबस्थानातील ज्यु टोळ्यांनी मुहम्मद पैगंबराला ज्युं धर्माचा पैगंबर म्हणून स्वीकारले नाही. या नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयातीमध्ये ज्यु लोकांविषयी अपशब्द येऊ लागले. मदिनेतील तीन ज्यु कबिल्यांना छोटी छोटी कारणे काढून मदिनेतून हाकलून देण्यात आले. नंतर उतरलेल्या कुराणाच्या आयतीमध्ये ज्यु लोकांचे समूळ उच्चटन करण्याचा आदेश मुसलमानांना दिल्याचे दिसते. 

ई स 632 मध्ये मुहंमद पैगंबर साहेबांचा मदिनेत मृत्यू झाला. त्यांच्या हयातीत त्यांच्या तलवारीच्या धाकाने संपूर्ण अरेबीया मुस्लिम झाला होता. परंतु पैगंबरांच्या मृत्यू नंतर बहुतेक सर्व अरब जमातांनी उठाव करून इस्लामचे जोखड टाकून दिले आणि ते परत आपल्या पूर्वज्यांच्या बहुईश्वरवादी धर्माकडे वळले. पैगंबरांच्या वारसदारांची पहिली दोन वर्ष हा उठाव दडपण्यात गेली. नंतर मुस्लिम अरब टोळ्यांनी अरबस्थानाच्या बाहेर प्रचंड वेगाने साम्राज्य विस्ताराला सुरुवात केली. वाळवंटातील प्रतिकूल हवामानात राहणाऱ्या अरब लोकांमध्ये कमालीचा काटकपणा आलेला होता.  क्रूरपणा नसेल तर वाळवंटासारख्या प्रतिकूल हवामानात जिवंत राहनेही शक्य नसते. वळवंटी भागात जिवंत राहण्यासाठी आवश्यक असलेला क्रूरपणा अरब लोकांमध्येही आलेला होता.  त्यात अरबांमध्ये नव्या धर्माच्या शिकवणी नुसार धार्मिक कडवेपणा निर्माण झालेला होते. धर्मवेडाने आंधळे झालेले अरब लढताना मरून जन्नतमध्ये जाण्यासाठी उतावळे झाले होते. त्यांनी निर्भीडपणे मोठमोठ्या फौजा अंगावर घेतल्या. अरब फौजांनी लवकरच आजूबाजूचे सर्व देश जिंकून घेतले. ई स 638 साली अरब मुसलमानांनी जेरूसलाम जिंकून घेतले. 

एकाच कुरैश काबील्यातील मुहम्मद पैगंबरांच्या हशीम या भावकीचे उम्मायद या भावकीशी पाच पिढ्याचे वैर होते. या उम्मयद या भावकीचा अबू सुफियान हा मुहम्मद पैगंबरांच्या आक्रमक धर्मप्रचारामुळे त्यांचा कट्टर शत्रू झाला होता. पुढे मदिनेला स्थलांतर केल्यावर मुहम्मद पैगंबरांची ताकत वाढत गेली. मुसलमानांनी मक्केच्या कुरैश लोकांच्या व्यापारी काफील्यांची लूटमार सुरु केली. त्यातून दोन्ही गटात संघर्ष होऊ लागले. मदिनेतील मुसलमाचे मक्केतील मूर्तिपूजक कुरैश लोकांसोबत झालेल्या प्रत्येक युद्धात अबू सुफियान मुसलमानांच्या विरुद्ध लढला होता. पुढे पैगंबर साहेबांनी मक्का जिंकल्यावर अबू सुफियानला नाविलाजास्तव मुसलमान व्हावे लागले होते. नंतर उमर खलिफा असताना या अबू सुफियानच्या मुलाला म्हणजे मुआवियाला सिरिया-पॅलेस्टीन या प्रभागाचा गव्हर्नर नेमले गेले. अबू सुफियान आणि त्याचे कुटुंबीय स्वतः होऊन मुसलमान झाले नव्हते. परिस्थिती समोर झुकत ते ”मरून मुटकुन मुसलमान’ झाले होते. त्यामुळे ते कधीच कडवे मुसलमान झाले नाहीत. मुआवियाची बायको ख्रिश्चन होती. त्याच्या सैन्यात सिरिअन ख्रिश्चन सैनिकच जास्त होते. या मुआवियाने पैगंबरांचा सख्खा चुलत भाऊ आणि लाडक्या लेकीचा नवरा असलेल्या अली विरुद्ध साफिनचे युद्ध केले. या युद्धात त्याने तीस हजार मुसलमान मारले. या मुआवियने मुहम्मद पैगंबरांच्या हसन(अली आणि फातिमाचा मुलगा) या नातवाकडून खलिफत काढून घेतली. याच मुआवियाने हसनला त्याच्याच बायकोमार्फत विष घालून मारले. या मुआवियाचा मुलगा याजिद हुसेन सोबत झालेल्या करारा विरुद्ध खलिफा झाला. त्याच्या आदेशानुसार मुहम्मद पैगंबराच्या हुसैन या दुसऱ्या नातवाला करबालाच्या युद्ध मैदानात ठार मारले गेले.

जिझिया कर मिळाला की मुआविया आणि इतर उम्मायद खलिफा धर्मनिरपेक्ष होते. झिजिया मिळणे कमी होऊ नये म्हणून एका उमायद खलिफाने इस्लामात धर्मांतर करण्यावर बंदी घातली होती. त्यांनी कुराणच्या आदेशा विरुद्ध अरब नसलेल्या नवमुस्लिमांवरील झिजिया बंद केला नाही. वरवर मुस्लिम असल्याने उम्मयदांच्या आधीपत्याखाली जेरूसलाम असल्याना ज्यु लोकांची फारशी कत्तल झाली नाही. पण मुस्लिम प्रशासनात शेतीवरील असलेल्या वाढीव करामुळे आणि जिझिया सारख्या जाचक करप्रणालीमुळे धरपरिवर्तन वा पलायन हेच मार्ग शिल्लक होते. धर्माच्या बाबतीत कट्टर असलेले ज्यु लोक परत मायाभूमीतून परगंदा होऊ लागले. त्यांचे परंपरिक शत्रू असलेल्या मूर्तिपूजक ग्रीक पॅलेस्टिनी लोकांनी इस्लामात धर्मपरिवर्तन करून घेतले. तरी काही ज्यु जास्तीचे कर भरून आपल्या मातृभूमीत पाय रोवून होते.

पुढे पोप अर्बन दुसरा याच्या प्रेरणेमुळे युरोपतील ख्रिश्चन सम्राज्यांनी येशूची पवित्र भूमी मुस्लिम लोकांपासून मुक्त करण्यासाठी धर्मयुद्ध पुकारले. क्रूसेडर फौजेने ई स 1099 साली जेरूसलाम जिंकून घेतले. शहरात असलेल्या सर्व मुस्लिम आणि ज्यु लोकांची सरसकट कत्तल झाली.

पुढे मायभूमीत ज्यु लोकांवर होणाऱ्या सततच्या अत्याचारांमुळे अनेक ज्यु युरोपातील धर्मनिरपेक्ष वातावरणात स्थायिक झाले. फ्रान्स आणि जर्मनीत स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना ॲश्कनाझी ज्यु म्हटले गेले. स्पेन आणि पोर्तुगाल मध्ये स्थायिक झालेल्या ज्यु लोकांना सफारडीक ज्यु म्हटले गेले. इजिप्त यमन आणि इराक मधील ज्यु लोकांना मिझराही ज्यु म्हटले गेले. मध्य आशिया आणि कोकसस पर्वत रांगामध्ये वसलेल्या ज्यु लोकांना बुखारान ज्यु म्हटले गेले. बाहेरून आलेले हे हुशार लोक कानामागून आले आणि तिखट झाले. कष्टाळूपणामुळे ते लवकरच श्रीमंत झाले तसेच मोठमोठ्या पदावर जाऊन बसले. त्यांच्या प्रगतीवर जाळणारे लोक वाढू लागले. मग त्यांच्या धार्मिक वेगळेपणावरून युरोपात ज्यु विरोधी वातावरण निर्माण केले जाऊ लागले. बरेच ॲश्कनाझी ज्यु सतराव्या आणि अठराव्या शतकात धर्मनिरापेक्ष असलेल्या अमेरिकेत स्थायिक झाले. 

ई स 1516 मध्ये जेरूसलाम ऑटोमन तुर्क सम्राज्याचा भाग झाले. ऑटोमन सम्राज्य जिझिया कर दिल्यानंतर तसे काही अंशी धर्मनिरपेक्ष होते. ते सुद्धा कुराणाप्रमाणे फारसे चालत नव्हते. अशा काहीश्या धर्मनिरापेक्ष वातावरणात जेरूसलाम मधील ज्यु लोकांनी परत कष्टाने आपली प्रगती केली. ज्यु लोकांनी व्यापारात प्रगती केली आणि मोठ्या प्रशासकीय पदांपर्यंत ज्यु पोहचले. 1492 नंतर पोर्तुगाल आणि स्पेन मधून हाकलून दिलेल्या सफारडीक ज्यु लोकांना ऑटोमन सम्राट बायझीड दुसरा याने त्यांना त्यांच्या मायाभूमीत स्थायिक होऊ दिले.

युरोपात राहणारे ज्यु लोक अतिशय हुशार आणि कष्टाळू होते. त्यांच्या प्रगतीचा तिरस्कार करणाऱ्यांचे प्रमाण युरोपात हळूहळू वाढू लागले होते.

1860 मध्ये ज्यूविश पत्रकार थिओडॉर हर्झ याने ‘डर जुडेनस्टेट’ अर्थात ‘ज्युंचे स्वतःचे राज्य’ नावाचे पत्रक काढले. ज्युसाठी त्यांच्या पारंपरिक मायाभूमीत स्वतःचे राज्य असावे आणि जगातील सर्व ज्यु लोकांनी तिथे राहायला जावे असा विचार त्याने मांडला. त्याला जगभरातील ज्यु लोकांनी पाठिंबा दिला. 1897 ला स्वित्झरलंड मधील बेझेल येथे पहिली झायोनिस्त परिषद भरली. ज्युसाठी स्वतःचे राज्य असावे यासाठी जगातील मोठया नेत्यांची मनधरणी सुरु झाली. पण त्याचा उपयोग झाला नाही. पण ज्यु लोकांनी आपला प्रयत्न सोडला नाही. पहिले महायुद्ध चालू असताना त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. 1917 साली ब्रिटिश सरकारचे परराष्ट्र सचिव अर्थर बालफोर यांनी जाहीरनामा काढून मध्यपूर्व भागात ज्यु लोकांना हक्काची मायभूमी असावी असे जाहीर केले.

1019 साली पहिले महायुद्ध संपले आणि ऑटोमन साम्राज्य नष्ट झाले. मध्यपूर्वचा हा भाग ब्रिटिशांच्या ताब्यात आला. त्या वेळी रोमन सम्राटाने मुद्दाम दिलेल्या पॅलेस्टीन या नावानेच ज्युंची मायभूमी ओळखली जाई. हा भाग ब्रिटिश अंमलाखाली आल्यावर जगभरातून लाखो ज्यु लोग या भागात स्थानांतरित झाले. स्थानिक अरब लोकांचा या स्थानांतराला विरोध असल्याने ज्यु लोकांचे अरब लोकांसोबत खटके उडू लागले. ज्यु लोकांनी आपल्या वस्त्यांची सुरक्षा करण्यासाठी 1920 साली हागानह (Defence) ही पॅरामिलिटरी संघटना सुरु केली. ज्यु लोकांचे होणारे स्थलांतरण आणि ब्रिटनचा त्याला न होणारा विरोध पाहून अरब लोकांनी 1936 ते 1939 या वर्षात मोठा हरताळ पाळला.

ब्रिटनने 1939 साली व्हाईट पेपर काढून जु आणि अरब लोकांचे वेगवेगळे राज्य व्हावे अशी फाळणीची योजना मांडली. अरब लोकांनी ती फेटाळली आणि उठाव केला. ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला. 

– क्रमशः भाग तिसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments