श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ व्यक्ती… वल्ली… आणि स्टेटस् – भाग-१ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
माझ्यासारखे काही लोक जसं खाण्यासाठी जगणारे असतात… तसे काही लोक हे दाखवण्यासाठी खाणारे असतात ………
आता हीच गंमत बघाना ….. कराड मधून खूप लोक गाडी घेऊन कायम पुण्याला जात असतात. कधीतरी गंमत म्हणून यांना विचारून बघा….. की पुण्याला जाताना किंवा पुण्याहून येताना तुम्ही चहा – नाश्ता घेण्यासाठी कुठे थांबता? 90 टक्के लोकांचे उत्तर येणार की….. हॉटेल विरंगुळा किंवा हॉटेल आराम…… कारण इथे थांबणे म्हणजे स्टेटस चे लक्षण ……. आमच्या चिंटूला ना विरंगुळा मधले थालपीठ खूप आवडते आणि आमच्या बायकोला ना आराम मधली भजी…….. खरंतर महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेलमध्ये जशी पदार्थांची चव असते त्याच सर्वसामान्य चवीचे इथले पदार्थ असतात…… इतर हॉटेलमध्ये मिळणारा दहा रुपयाचा चहा येथे वीस रुपये देऊन घ्यायचा आणि चाळीस रुपये चा डोसा शंभर रुपयाला घ्यायचा ……. कशासाठी ? तर स्टेटस दाखवण्यासाठी…..
एकदा मी व माझा मित्र किशोर पुण्याला निघालो असताना पाचवड पुलाखाली एका टपरीवजा हॉटेलमध्ये थांबलो होतो . तिथली मिसळ आणि मिसळ बरोबर ब्रेड च्या ऐवजी दिलेली गरमा गरम पुरी दिल खुश करून गेली. त्याचबरोबर एक प्लेट कांदा भजी…. आणि दोन कमी साखर स्पेशल चहा …… आणि एवढं सगळं फक्त शंभर रुपयात . आणि चवीच्या बाबतीत म्हणाल तर ही दोन्ही हॉटेल याच्या पासंगालाही पुरणार नाहीत….. इथे स्टेटस नाही….. भपका नाही …..पण चव मात्र नक्की आहे. माझ्या सारखी माणसे मात्र अशी ठिकाणे शोधत असतात .
पुण्यात गेल्यावर सुद्धा गंमत बघा ….. जे उच्च मध्यमवर्गीय आहेत किंवा नवश्रीमंत आहेत त्यांचे खाण्याबद्दल चे बोलणे कधीतरी ऐका …… मसाला डोसा ना मला वैशाली शिवाय कुठला आवडतच नाही …… आणि इडली खायची तर फक्त व्याडेश्वर मध्येच ……. चायनीज ना Menland China शिवाय कुठेच चांगले मिळत नाही …….. म्हणजेच याचा अर्थ आपण समजून घ्यायचा की…… मी दोनशे रुपये देऊन वैशाली मध्ये जाऊन मसाला डोसा खातो हे त्यांना सांगायचे आहे ………. काय खातो या पेक्षा कुठे खातो ते दाखवण्याची जास्त हौस.
पंजाबी जेवण जेवायचे असेल …..दोन-दोन तास नंबरला थांबून चांगले जेवण मिळते अशी भ्रामक समजूत करून घेतलेल्या लोकां बद्दल काय सांगायचे? …… खरंतर पंजाबी जेवण म्हणजे एक शुद्ध फसवणूक आहे …… आठवड्यातून एकदाच करून ठेवलेल्या तीन प्रकारच्या ग्रेव्हीज ……. लाल ग्रेव्ही, पिवळी ग्रेव्ही व पांढरी ग्रेवी याच्या जोरावर हे जेवण चालते. यामध्ये कौतुकाची फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे …… या तीन प्रकारच्या ग्रेव्ही पासून जवळपास 200 भाज्यांची नावे ज्यांने तयार केली असतील त्याला नोबेल पारितोषिक द्यायला हरकत नाही.
आता हेच बघा ना …. पिवळ्या ग्रेव्हीमध्ये हिरवे वाटाणे आणि पनीरचे तुकडे घातले की झालं मटर पनीर …… नुसतेच मटर घातले की झाला ग्रीनपीस मसाला…… नुसतं पनीर आणि वरून थोडे क्रीम घातलं की झाला पनीर माखनवाला …….. या ग्रेव्हीत काजू तळून घातले ती झाला काजू मसाला …….. लाल ग्रेव्हीत उकडलेला फ्लॉवर , वाटाणा, गाजर घातले की झाले मिक्स व्हेज…… याच मिक्स व्हेजला तिखट पूड घालून तडका मारला की झाले व्हेज कोल्हापुरी …… याच व्हेज कोल्हापुरी वर दोन हिरव्या मिरच्या तळून ठेवल्या की झाला व्हेज अंगारा……. मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला वाटतं अरे वा ….. काय व्हरायटी आहे इथं? खरंतर भाज्या दहा-बारा प्रकारच्याच असतात ….. पण नावं वेगवेगळी देऊन त्याच पुढे येतात. आता मला सांगा व्हेज दिलबहार किंवा व्हेज शबनम म्हणून तुमच्या पुढे काय येणार आहे हे तुम्हाला ती डिश समोर आल्याशिवाय काही कळणार आहे का? नाही . पण मी पैज लावून सांगतो की वर सांगितलेल्या भाज्या पैकीच कोणतीतरी भाजी तुमच्यासमोर नक्की येणार.
हॉटेलात जाऊन सुद्धा आपण कसे Health Cautious आहोत असे दाखवणार्यांची सुद्धा संख्या बरीच असते . गाजर ,काकडी, कांदा, मुळा आणि टोमॅटो यांच्या चार – चार चकत्या ….. की ज्याची किंमत पंधरा रुपये सुद्धा होणार नाही ते ग्रीन सॅलेड म्हणून प्लेटमध्ये सजवून दीडशे रुपयाला समोर येते….. तीच गोष्ट रोटीची….. बरेच जण आता रोटी मैद्याची आहे का आट्याची आहे हे विचारत असतात …… आता एवढ्या तेलकट आणि मसालेदार भाज्या , स्टार्टर्स आपण खात असतो पण आपण तब्येतीची काळजी घेतो हे दाखवायला रोटी मात्र आट्याची पाहिजे असते.
हीच गोष्ट पिण्याच्यापाण्याची. तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन टेबलवर बसला की वेटर तुम्हाला विचारतो पाणी कसले आणू ? साधे की बिसलेरी ? आता साधे पाणी आण म्हणून सांगण्याची लाज वाटते . मग आपोआप सांगितले जाते की बिसलेरीचे आण . बऱ्याच मोठ्या हॉटेलमध्ये बाहेर वीस रुपयाला मिळणारी पाण्याची बाटली पन्नास रुपयाला मिळते आणि आपण तेही निमूटपणे देतो. कारण काय तर स्टेटस …… हाच प्रकार वेटरला टीप देण्याच्या बाबतीत. खरे तर चांगली सर्विस देणं हे वेटरचे कामच आहे, आणि त्या साठीच त्याला पगार मिळतो. पण बऱ्याचदा कमी टीप ठेवली तर कसे दिसेल , म्हणून आपले स्टेटस दाखवायला मनात असो वा नसो भरघोस टीप ठेवली जाते.
अजून एक प्रकार म्हणजे अनलिमिटेड बार्बेक्यु किंवा बुफे. प्रत्येकी साधारण आठशे ते हजार रुपये यासाठी आकारले जातात. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्या गेल्या तुमच्यासमोर शेफ चा वेश केलेला एक माणूस येतो. तुम्हाला आदराने नमस्कार करतो. हॉटेलच्या मेनू मध्ये मध्ये आज काय काय स्पेशल आहे त्याची माहिती सांगतो आणि तुम्हाला स्टार्टरच्या काउंटरवर नेऊन सोडतो . या काउंटरवर पाणीपुरी, शेवपुरी ,आलू टिक्की, डोसा, पावभाजी, पकोडे ,दहिवडा अशा प्रकारचे पदार्थ ठेवले असतात. तेथे उभे असणारे कर्मचारी तुम्हाला आग्रहाने एक एक पदार्थ घ्या म्हणून खायला घालतात. हे स्टार्टर खाऊन होईपर्यंत तुमचे पोट बऱ्यापैकी भरलेले असते, त्यामुळे मेन कोर्स मध्ये एखाद दुसरी भाजी, एखादा फुलका आणि थोडासा राईस घेऊन तुमचे जेवण संपते. स्वीट्स मध्ये सुद्धा बरेच प्रकार ठेवलेले असतात. त्यातला एखादा तुकडा किंवा आईस्क्रीमचा एखादा स्कुप कसा तरी खाल्ला जातो आणि आपले जेवण संपते. आपण खाल्लेल्या पदार्थांचे जर वेगवेगळे असे बिल कॅल्क्युलेट केले तर अडीचशे तीनशे रुपये पेक्षा जास्त होणार नाही , पण त्यासाठी आपण जवळपास प्रत्येकी हजार रुपये मोजलेले असतात कशासाठी मी पोर्टिगोला किंवा बार्बेक्यू नेशन ला गेलो आहे हे सांगण्यासाठी.
हीच गोष्ट चायनीज खाण्याची. कोबी ,सिमला मिरची, गाजर, आलं, लसूण व हिरवी मिरची या मंडईत नेहमी मिळणाऱ्या भाज्या …… टोमॅटो, चिली आणि सोया हे तीन प्रकारचे सॉस, व्हीनेगर ची बाटली , शिजवलेला भात आणि शिजवलेल्या नूडल्स आणि सर्वात महत्वाचे म्हणजे …… तोंडाने चिनी माणसासारखा दिसणारा आचारी……. एवढं सामान जमवलं की झाला चायनीज चा सेट अप तयार.
लोखंडी चपटी कढई कि ज्याला वॉक म्हणायचे …..ती मोठ्या आचेवर ठेवून , त्यात भरपूर तेल घालून आलं ,लसूण, मिरची, कोबी ,गाजर, सिमला मिरची , इत्यादी सर्व घालायचे आणि परतायचे…. त्यात वर सांगितलेले सर्व सॉस घालायचे आणि त्यात शिजवलेला नूडल्स घातल्या की झाल्या हक्का नूडल्स तयार…….. नूडल्स च्या ऐवजी भात घातला की झाला फ्राईड राईस……. यातच जरा सिमला मिरची जास्त घातली कि झाला सिंगापुरी राईस ……. भाताचे ऐवजी कोबीची कॉर्नफ्लॉवर घालून तळलेली वातड भजी घातली की झालं व्हेज मंचुरियन. सगळ्यात वाईट म्हणजे या पदार्थात अजिनोमोटो नावाची एक पावडर वापरतात ….. याने तुमच्या जिभेवरील टेस्ट बडस उत्तेजित होतात आणि तुम्हाला या खाण्याची चटक लागते. हा अजिनोमोटो कॅन्सर Causing Agent आहे आणि त्यामुळे कॅन्सर होऊ शकतो. यावर जगात सगळीकडे बंदी आहे पण तो सर्रास चायनीज पदार्थात वापरला जातो ….. चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे सॉस म्हणजे फक्त केमिकल असतात. एकदा माझ्याकडून घरात व्हिनेगरच्या बाटलीतले व्हिनेगर फरशीवर सांडले. त्यावेळी फरशीवर पडलेला डाग दहा वर्षे झाली तरी तसाच आहे. म्हणजे या गोष्टी खाल्ल्यावर आपल्या पोटाची काय अवस्था होत असेल याचा विचार सुद्धा करवत नाही. पण माझा मुलगा मांचुरियन शिवाय काही खात नाही असे अभिमानाने सांगणारे महाभाग आपल्याला बरेच दिसतात.
क्रमश : भाग पहिला
लेखक : अभय कुलकर्णी, कराड
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈