श्री सुहास रघुनाथ पंडित
इंद्रधनुष्य
☆ व्यक्ती… वल्ली… आणि स्टेटस् – भाग-२ – लेखक : अभय कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(पण माझा मुलगा मांचुरियन शिवाय काही खात नाही असे अभिमानाने सांगणारे महाभाग आपल्याला बरेच दिसतात.) इथून पुढे —–
हाच प्रकार डोमिनोज किंवा मॅकडॉनल्ड्स च्या बाबतीत. एक तर यांच्याकडे सगळं मटेरियल असतं ते फ्रोजन मध्ये. फ्रेश काहीही नसतं. फक्त हिट अँड इट या तत्वावर यांचे काम चालते. पिझ्झा म्हणजे अक्षरशः एका ब्रेडच्या लादीवर काही भाज्यांचे तुकडे आणि केवळ घातलय म्हणायला घातलेले चीज ….. आणि यासाठी आपण चारशे – पाचशे रुपये देतो आणि हा पिझ्झा तिथे सेंटरवर जाऊन खायचा नाही ….. तो होम डिलिव्हरी ने घरी मागवायचा…… म्हणजे आसपासच्या लोकांना कळतं यांच्याकडे पिझ्झा मागवतात , स्टेटस दाखवायचा हा ही एक प्रकार.
मॅकडॉनल्ड्स सुद्धा मुलांच्या मानसिकतेचा बरोबर विचार करून मार्केटिंग करत असते. उदाहरणार्थ हॅप्पी मिल ……एका हॅपी मिल बरोबर एक छोटे खेळणे मोफत आणि पालक सुद्धा माझ्या मुलाला ही वेगवेगळी खेळणी जमवायला आवडतात म्हणून हॅप्पी मिल खरेदी करत असतात. आता या मिल मध्ये एक बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि कोक असतो. कुठल्या अँगलने हे मिल होऊ शकते ? पण माझा मुलगा हट्टच करतो….. त्याला हेच आवडतं म्हणून सांगणारे खूप लोक आहेत आणि माझ्याकडे इतकी खेळणी जमा झाली आहेत असे फुशारकीने सांगणारी मुले …..
अजून लोकांचा एक प्रकार असतो तो म्हणजे ट्रीप ला जाणारी लोकं . ही लोकं उत्तर भारताच्या ट्रीपला गेली की इडली सांबार मिळत नाही म्हणून अस्वस्थ होतात आणि दक्षिण भारताच्या ट्रीपला गेली की यांना छोले,परोठे पाहिजे असतात .
आमचे एक शेजारी आहेत. ते एका नामांकित ट्रॅव्हल एजन्सी मार्फत काश्मिर ट्रीप ला गेले होते. आल्यावर ते अभिमानाने सर्वांना सांगत होते की ….. आम्हाला गुलमर्गमध्ये नाश्त्याला कांदे पोहे दिले आणि श्रीनगर मध्ये तर चक्क पुरणपोळीचे जेवण दिले . आता या माणसापुढे हसावे की रडावे हे कळेना. अरे बाबा आयुष्यभर कांदेपोहे आणि पुरणपोळी खातच जगला आहेस की …….. आता गेलाच आहेस काश्मीरला तर तेथील स्थानिक खाणे खा की ……… तिथला प्रसिद्ध कहावा पी …. शाकाहारी असशील तर कमल काकडी ची भाजी खा ……पराठे खा ….. छोले खा… राजमा खा … नॉनव्हेज खात असशील तर वाझवान पद्धतीचे नॉनव्हेज खा …. पण नाही ….. हे सगळीकडे वरण-भात आणि कांदे पोहे मागतच फिरणार.
जर तुम्ही दिल्लीत गेलात तर पहाडगंज, करोल बाग, जुनी दिल्ली आणि लाल किल्ला या परिसरात गेलात तर रोज एक नवीन पदार्थ ट्राय करायचा तर एक वर्ष पुरणार नाही एवढी व्हरायटी मिळते . एकंदरीतच दिल्लीच्या बाजूचे लोक खाण्यापिण्याचे शौकीन . साधे चाट खायचे म्हणले तरी कमीत कमी पन्नास प्रकारच्या व्हरायटी तुम्हाला मिळणार . …..
उदाहरण सांगायचे झाले तर राम लड्डू….. आता लड्डू म्हणल्यावर आपल्याला गोड पदार्थ आठवतो …. परंतु हा राम लड्डू म्हणजे मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ भिजवून व बारीक करून त्याच्यात बऱ्याच प्रकारचे मसाले घालून तळलेली मोठीच्या मोठी भजी …..त्याच्यावर बारीक कापलेला मुळा आणि कोबी … त्यावर मिरची – पुदिना चटणी आणि गोड चटणी घालून देतात ….. अत्यंत वेगळा असा हा पदार्थ ….
त्याच प्रमाणे राजकचोरी हा सुद्धा तिकडचा एक अत्यंत वेगळा प्रकार …. मोठ्या पुढच्या आकाराची ही कचोरी ….. त्यामध्ये दही भल्ला , उकडलेला बटाटा, उकडलेले छोले, आलू टिक्की, बारीक शेव, गोड तिखट चटणी आणि इतर अनेक मसाले घालून वरून भरपूर दही घालतात …. ही राजकचोरी एकट्या माणसाला संपवणे जवळपास अशक्य …..
तसेच अजून एक मिळणारा वेगळा पदार्थ म्हणजे दहीभल्ला …. आपल्याकडच्या दहीवड्याचा चुलत भाऊ म्हणलं तरी हरकत नाही ….. फक्त हा उडदाच्या डाळीची ऐवजी मुगाच्या डाळीपासून तयार केला जातो ….. असा हा दहीभल्ला ….. त्यावर तिखट आणि गोड चटण्या …. चाट मसाला आणि शेव ….. तसेच बेडमी पुरी , आलू पुरी, कांजी बडा, कचोरी , छोले भटूरे, कुलचे छोले, भीगा कुलचा, ईमरती … किती पदार्थ सांगू….
चांदणी चौकातल्या पराठेवाली गल्ली मध्ये तर जवळपास दीडशे प्रकारचे पराठे मिळतात ….. अगदी कारल्याचा पराठा ,पापड पराठा, रबडी पराठा, ड्रायफ्रुट पराठा, फ्रुट पराठा ,…..असे कितीतरी आपल्याकडं न मिळणारे प्रकार येथे मिळतात ……….पण नाही आम्हाला इथे वरण भातच पाहिजे…..
नागपूर म्हणजे ज्यांना झणझणीत खाणे आवडतं त्यांच्यासाठी तर स्वर्गच …… सकाळचा नाष्टा म्हणजे तर्री पोहे ….. कांदेपोह्या मध्ये हरभर्याची उसळ व वरून मस्तपैकी झणझणीत रस्सा ….. वरुन थोडासा मक्याचा चिवडा आणि चिरलेला कांदा ….. आणि नंतर गरमागरम चहा …… दिवसाची सुरुवात अशी झाली तर दिवस कसा जाईल हे वेगळे सांगायची गरज नाही….. नागपुरी वडा भात ही पण एक नागपूरची स्पेशल डिश …. गरमा गरम वाफाळता भात त्यावर डाळीचे वडे कुस्करून घातलेले आणि वरून घातलेली मिरचीची फोडणी ….. सोबत कढी… क्या बात है …… तसेच नागपूर साईड चे वांग्याचे भरीत सुद्धा आपल्यापेक्षा वेगळे असते ……. नागपूरची वांगीच वेगळी …. छान पैकी तुराट्या वर ठेवून ही वांगी भाजायची नंतर फोडणी करून त्याच्यामध्ये कांदा, भरपूर मिरची, भाजून बारीक केलेले वांगे घालायचे आणि छान पैकी परतायचे ….. परतून झाल्यावर त्यावर कांद्याची पात आणि तळलेले शेंगदाणे घालायचे …. हे भरीत तुम्हाला कळण्याच्या भाकरीबरोबर किंवा पुरी बरोबर मस्त लागते……. तसंच पाटवडी रस्सा, शेव भाजी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सांबारवडी …… आता या सांबारवडी चा आणि साऊथ इंडियन सांबार याचा काही संबंध नाही बर का …… नागपूर साईडला सांबार म्हणजे कोथिंबीर …… तर ही कोथिंबीरीची वडी ही सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीने करतात आणि नागपूर साईडला वेगळ्या पद्धतीने करतात ….. कोथिंबीर बारीक चिरून त्यामध्ये मिरची ,आलं, लसूण यांची पेस्ट, धने पूड, जिरे पूड, मीठ घालतात आणि नंतर हरभरा डाळीचे पीठ व गव्हाचे पीठ यांचे मिश्रण करून त्याची पोळी लाटतात व त्या पोळी मध्ये हे कोथिंबिरीचे मिश्रण भरतात आणि तळतात आणि ते तर्री किंवा कढी बरोबर खायला देतात .. हल्दीराम ची दुधी भोपळा आणि संत्र्याचा रस या पासून बनवलेली संत्रा बर्फी नागपुरात जाऊन खाल्ली नाही तर तुम्हाला शंभर टक्के पाप लागणार….. कारण का ही बर्फी जास्त काळ टिकत नसल्याने नागपूरच्या बाहेर फारशी कोठेही मिळत नाही. ….पण नाही ….. आम्हाला इथेही वरण-भातच पाहिजे ………
जसे उत्तरेकडील जेवण चमचमीत आणि झणझणीत तसेच दक्षिणेकडील जेवण एकदम सौम्य आणि सात्विक. आपल्याला वाटते दक्षिणेत काय फक्त इडली, डोसा आणि भात मिळणार……. पण नुसती इडली म्हणाल तर साधी इडली, रवा इडली ,बटन इडली, गुंटूर इडली, तट्टे इडली, कांचीपुरम इडली , पोडी इडली, रागी इडली , दही इडली , घी इडली ……. किती प्रकार सांगू….. याशिवाय उडीद वडा, डाळ वडा, मैसूर बोंडा , आलुबोंडा, साधा डोसा, मसाला डोसा, बेन्ने डोसा, नीर डोसा, रवा डोसा, कट डोसा, उत्तपा आणि भातात म्हणाल तर पुलियोगरे , बिशीबाळी, चित्रांन्ना, स्वीट पोंगल, पोंगल , लेमन राईस , टोमॅटो राईस, कर्ड राईस….. किती नाव सांगू. नुसत्या रस्सम आणि सांबारचेच दहा बारा प्रकार असतात .
हिरव्यागार केळीच्या पानावर वाढलेला उकड्या तांदळाचा वाफाळलेला भात ….. आणि त्यावर गरमागरम सांबार …… हे संपल्यावर पुन्हा भात आणि त्यावर गरमागरम रस्सम ……. आणि शेवटी दहिभात ……. सोबतीला पापड , केळाचे वेफर्स आणि लोणचे. …… वा… याशिवाय जगात दुसरे कोणते सुख असूच शकत नाही. ….. पण इथेही काही लोक छोले भटोरे, आलू पराठा आणि टोमॅटो सूप हुडकत फिरत असतात.
जाऊ दे …. गाढवाला गुळाची चव काय हे म्हणतात तेच खरं.
क्रमश : भाग दुसरा
लेखक : अभय कुलकर्णी, कराड
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈